विमानाच्या खिडक्या गोलच का असतात? आणि मॉलमध्ये घड्याळे का नसतात? जाणून घ्या रहस्य! file photo
फीचर्स

विमानाच्या खिडक्या गोलच का असतात? आणि मॉलमध्ये घड्याळे का नसतात? जाणून घ्या रहस्य!

विमानातील गोल खिडक्या आणि मॉलमधील खिडक्या-घड्याळांचा अभाव... यामागचं खरं कारण काय?

पुढारी वृत्तसेवा

why are airplane windows round and why dont shopping malls have clocks or windows interesting facts

पुढारी ऑनलाईन : तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का की विमानाच्या खिडक्या नेहमी गोल किंवा अंडाकृतीच का असतात? आणि दुसरीकडे, शॉपिंग मॉलमध्ये खिडक्या किंवा भिंतीवर घड्याळ का दिसत नाही? या दोन्ही गोष्टींच्यामागे महत्त्वाची कारणे दडलेली आहेत. चला, ती सोप्या भाषेत जाणून घेऊया.

बहुतेकांनी आयुष्यात कधीतरी विमानप्रवास केला असेल आणि अनेकांना विंडो सीटवर बसायला आवडते. कारण खिडकीतून बाहेरचे सुंदर दृश्य पाहण्याचा अनुभव वेगळाच असतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की विमानाच्या खिडक्या चौकोनी नसून गोल किंवा अंडाकृतीच का असतात?

त्याचप्रमाणे, कपडे, बूट, किराणा किंवा इतर वस्तू खरेदी करण्यासाठी आपण मॉलमध्ये जातो. पण एकदा मॉलमध्ये प्रवेश केल्यानंतर वेळ कसा निघून जातो, हे अनेकदा कळतही नाही. कारण तिथे ना खिडक्या दिसतात, ना घड्याळ. यामागेही एक खास कारण आहे.

विमानाच्या गोल खिडक्यांमागचं रहस्य

विमान हजारो फूट उंचीवर उड्डाण करत असते. त्या उंचीवर बाहेरील हवेचा दाब (एअर प्रेशर) जमिनीपेक्षा खूप कमी असतो. त्यामुळे प्रवाशांना आरामात श्वास घेता यावा म्हणून विमानाच्या आत कृत्रिम हवेचा दाब (कॅबिन प्रेशर) तयार केला जातो. यामुळे विमानाच्या आत आणि बाहेरच्या दाबामध्ये मोठा फरक निर्माण होतो.

प्रत्येक उड्डाणादरम्यान विमानाचा सांगाडा (फ्युसेलाज) किंचित फुगतो आणि आकुंचन पावतो. त्यामुळे त्यावर सतत ताण निर्माण होत असतो. हा ताण लक्षात घेऊन विमानातील प्रत्येक भागाची रचना केली जाते.

गोल खिडक्या अधिक सुरक्षित का असतात?

तज्ज्ञांच्या मते, चौकोनी खिडक्यांच्या कोपऱ्यांवर जास्त ताण निर्माण होतो. जर खिडकीचे कोपरे टोकदार असतील तर तिथून भेगा पडण्याची शक्यता वाढते. या भेगा वाढल्यास खिडकी तुटण्याचा आणि त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याचा संभव असतो.

याउलट, गोल किंवा अंडाकृती खिडक्यांना टोकदार कोपरे नसतात. त्यामुळे आत-बाहेरचा दाब समान प्रमाणात वितरित होतो आणि भेगा पडण्याचा धोका खूप कमी होतो.

विशेष म्हणजे, 1950 पूर्वी काही विमानांमध्ये चौकोनी खिडक्या असायच्या. मात्र, अशा खिडक्यांमुळे काही गंभीर अपघात घडल्याचे समोर आल्यानंतर विमान उद्योगाने गोल आणि अंडाकृती खिडक्यांचा स्वीकार केला.

मॉलमध्ये खिडक्या आणि घड्याळ का नसतात?

तुम्ही कधी अनुभवले असेल की मॉलमध्ये गेल्यानंतर तासन्‌तास कसे निघून जातात, हे समजत नाही. शॉपिंग, खाणे-पिणे, फिरणे आणि मित्र-मैत्रिणींशी गप्पा यामध्ये वेळ कसा जातो, याची जाणीव होत नाही.

यामागे एक व्यावसायिक रणनीती असते. मॉलमध्ये खिडक्या किंवा घड्याळ नसल्यामुळे ग्राहकांना बाहेरची वेळ किंवा हवामान याची जाणीव होत नाही. परिणामी ते अधिक वेळ मॉलमध्ये थांबतात आणि खरेदी करण्याची शक्यता वाढते.

मॉलमध्ये विशेष प्रकारच्या तेजस्वी आणि एकसमान प्रकाशयोजनेचा वापर केला जातो. त्यामुळे आत नेहमी दिवस असल्यासारखे वातावरण तयार होते. बाहेरचे दृश्य दिसत नसल्याने ग्राहकांचे लक्ष दुकानांमधील वस्तू, आकर्षक डिस्प्ले आणि विविध ऑफर्सकडे अधिक केंद्रित होते.

संगीत आणि मॉलची रचना यांचाही परिणाम

मॉलमध्ये सतत वाजणारे शांत आणि सुखद पार्श्वसंगीतही ग्राहकांच्या वर्तनावर परिणाम करते. अशा वातावरणामुळे लोक निवांत फिरतात, जास्त वेळ थांबतात आणि अधिक खरेदी करतात.

याशिवाय, अनेक जण मॉलमध्ये केवळ खरेदीसाठीच नव्हे, तर मित्र-परिवारासोबत वेळ घालवण्यासाठीही येतात. त्यामुळे वेळ कसा जातो, हे समजत नाही.

मॉलमध्ये मोठ्या खिडक्या असतील तर बाहेरील सूर्यप्रकाश आणि उष्णता आत येईल. त्यामुळे वातानुकूलनाचा खर्च वाढेल आणि काही वस्तूंवरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणूनच बहुतांश आधुनिक मॉलमध्ये खिडक्या आणि भिंतीवरील घड्याळे मुद्दाम ठेवली जात नाहीत.

आता पुढच्या वेळी तुम्ही मॉलमध्ये गेलात, तर एकदा नीट निरीक्षण करून पाहा. तिथे खिडक्या आणि घड्याळे का दिसत नाहीत, यामागचं कारण तुम्हाला नक्की आठवेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT