India Destination of the Year 2027: भारताची ‘डेस्टिनेशन ऑफ द इयर’ म्हणजे वर्षातील सर्वोत्तम पर्यटन स्थळ म्हणून निवड करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटन मासिक Travel + Leisureने भारताला हा बहुमान दिला आहे. हे मासिक जगभरातील पर्यटनस्थळे, हॉटेल्स, खाद्यसंस्कृती, निसर्ग, ऐतिहासिक वास्तू आणि प्रवासाच्या अनुभवांबाबत माहिती प्रसिद्ध करते. २०१४ पासून हे मासिक दरवर्षी एका देशाची ‘Destination of the Year’ म्हणून निवड करत आहे. २०२७ साठी भारताची निवड करण्यात आली आहे.
२०२७ च्या निवडीची घोषणा मासिकाच्या मुख्य संपादक जॅकी गिफर्ड यांनी केली आहे. त्यांनी भारतातील विविधता, खाद्यसंस्कृती, ऐतिहासिक वारसा, वन्यजीव, पर्यटनासाठी उपलब्ध असलेल्या सुविधा आणि आदरातिथ्य यांचा विशेष उल्लेख केला आहे. महत्त्वाचे म्हणजे, ही निवड जगभरातील पर्यटकांनी मतदान करून केलेली नाही. मासिकाच्या संपादकीय निर्णयातून भारताची निवड झाली आहे.
भारतातील निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक ठिकाणे, विविध संस्कृती, खाद्यपरंपरा आणि स्थानिक जीवनशैली यामुळे जगभरातील पर्यटकांचे लक्ष भारताकडे आहे. मात्र, भारतात प्रवास करताना केवळ प्रसिद्ध पर्यटनस्थळांपुरतं मर्यादित न राहता देशातील वेगवेगळ्या भागांचा अनुभव घेणेही महत्त्वाचं असल्याचं पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
भारताची ओळख जगभरात विविधतेने नटलेला देश अशी आहे. येथे एका बाजूला हिमालयातील बर्फाच्छादित पर्वतरांगा आहेत, तर दुसऱ्या बाजूला समुद्रकिनारे, घनदाट जंगले आणि ऐतिहासिक वास्तू आहेत. भारतातील धार्मिक परंपरा, सण-उत्सव, खाद्यसंस्कृती आणि स्थानिक राहणीमान पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचा विषय ठरले आहेत.
मात्र, भारताबद्दल परदेशात अनेकदा काही संकुचित कल्पना तयार झालेल्या असतात. प्रत्यक्ष भारतात फिरताना या कल्पनांपेक्षा वेगळे अनुभव येऊ शकतात. विशेषतः महिला पर्यटकांसाठी प्रवास करताना सुरक्षितता, स्वच्छता आणि राहण्याच्या सोयी यांचा विचार करावा लागतो.
मासिकातील एका लेखात तीन महिलांनी भारतातील त्यांच्या प्रवासाचे अनुभव सांगितले आहेत. या अनुभवांमधून भारतातील पर्यटनाची वेगळी बाजू समोर आली आहे.
लेखिका शिव्या नाथ यांच्यासाठी हिमाचल प्रदेशातील तीर्थन खोऱ्यातील ट्रेकिंगचा अनुभव अत्यंत खास ठरला. त्यांनी स्थानिक महिलांच्या एका गटासोबत हा प्रवास केला होता.
ट्रेकिंग आणि गिर्यारोहणाच्या क्षेत्रात पुरुषांचे प्रमाण अधिक आहे. अशा परिस्थितीत महिलांचा गट घेऊन जंगलातून प्रवास करण्याचा अनुभव त्यांच्यासाठी वेगळा होता. या मोहिमेत सहभागी झालेल्या काही महिलांना दोन दिवस राहण्यासाठीसुद्धा कुटुंबाची परवानगी घ्यावी लागली होती.
या प्रवासात त्यांनी ग्रेट हिमालयन नॅशनल पार्कमधील घनदाट जंगलातून पायपीट केली. जुन्या पुलांवरून प्रवास केला. खळखळ वाहणाऱ्या नद्यांचे सौंदर्य अनुभवले. आजूबाजूला पक्ष्यांचा किलबिलाट आणि निसर्गाचे आवाज याशिवाय दुसरे काहीही ऐकू येत नव्हते.
प्रवासादरम्यान त्यांनी जंगलात मिळणारी 'लिंगडी' ही रानभाजी गोळा केली. त्यानंतर नदीकाठी तंबू उभारून त्याच भाजीचा स्वयंपाक केला. दुसऱ्या दिवशी धबधब्यापर्यंत पायपीट केली. पाण्याच्या प्रवाहात असलेल्या मोठ्या खडकावर सर्व महिला एकत्र उभ्या राहिल्या.
निसर्गाची आवड असलेल्या महिलांसोबत असा प्रवास करणे हा आयुष्यातील अत्यंत सुंदर अनुभव असल्याचे शिव्या नाथ यांनी सांगितले.
बंगळुरूमधील कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या अफ्शा सेठी यांचाही भारतातील प्रवासाचा एक वेगळा अनुभव आहे. शाळेत असताना एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांना कर्नाटकातील कारकोल्ली गावातील शेतकरी कुटुंबासोबत एक आठवडा घालवण्याची संधी मिळाली होती. हे कुटुंब भात आणि सुपारीची शेती करत होते.
या काळात त्यांनी गावातील स्थानिक जीवन जवळून अनुभवले. दररोज हिरव्यागार जंगलातून फिरणे आणि धबधब्यांचा आनंद घेणे हा त्यांच्या दिनक्रमाचा भाग होता. जंगलातून फिरताना त्यांच्या पायांना जळवा चिकटत असत. त्या काढण्यासाठी पायांवर मीठ लावावे लागत असे, अशी आठवण त्यांनी सांगितली.
या प्रवासात त्यांना स्थानिक समाजातील काही वेगळ्या प्रथा आणि परंपराही समजल्या. मासिक पाळीबद्दल घरातील महिलांना सांगितल्यानंतर त्यांच्या राहण्याची व्यवस्था अंगणात करण्यात आली होती. सुरुवातीला हा अनुभव वेगळा वाटला. मात्र, हवामान छान असल्यामुळे रात्री आकाशातील तारे पाहत गप्पा मारण्याचा आनंद मिळाला.
भारताच्या वेगवेगळ्या भागांत राहणीमान आणि सामाजिक परंपरा वेगवेगळ्या असतात. प्रवास करताना या गोष्टी समजून घेण्याची संधी मिळते, असे अफ्शा यांनी सांगितले.
भारतामध्ये पर्यटनाचा वेगाने विस्तार होत आहे. विशेष म्हणजे देशांतर्गत पर्यटनात मोठी वाढ झाली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये भारतात जवळपास २९५ कोटी देशांतर्गत पर्यटक भेटींची नोंद झाली. २०२३ च्या तुलनेत ही वाढ १७.५ टक्के होती. २०२६ च्या ट्रॅव्हल अँड टुरिझम डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये भारताने ३१ वे स्थान मिळवले आहे.
परदेशातून भारतात येणाऱ्या पर्यटकांमध्ये महिलांचे प्रमाणही लक्षणीय आहे. एकूण परदेशी पर्यटकांपैकी ४३ टक्के महिला असल्याची नोंद आहे.
मात्र, पर्यटन वाढत असताना काही समस्या देखील निर्माण होत आहेत. त्यामध्ये सोशल मीडियामुळे वाढणारी गर्दी ही एक मोठी समस्या आहे.
शिव्या नाथ यांच्या मते, एखादे सुंदर आणि कमी लोकांना माहीत असलेले ठिकाण सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले की तिथे अचानक पर्यटकांची गर्दी वाढते. त्यामुळे अशा ठिकाणांचे नैसर्गिक सौंदर्य आणि शांतता धोक्यात येते.
त्यांनी पर्यटकांना प्रवासादरम्यान प्रत्येक ठिकाणचे लोकेशन सोशल मीडियावर शेअर न करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच स्थानिक लोकांच्या मालकीच्या पर्यटन व्यवसायांना प्राधान्य द्यावे, असेही त्या सांगतात. यामुळे पर्यटनातून मिळणारा आर्थिक फायदा स्थानिक लोकांपर्यंत पोहोचू शकतो.
गोव्यात राहणाऱ्या नयनिका गॅफिनो यांनाही सोशल मीडियामुळे पर्यटनस्थळांवर होणाऱ्या गर्दीचा अनुभव आला आहे. त्यांच्या मते, एखाद्या व्यक्तीने इन्स्टाग्रामवर एखाद्या सुंदर ठिकाणाचा फोटो किंवा व्हिडीओ टाकला की काही वेळातच तिथे पर्यटकांची गर्दी वाढते. मात्र, त्या ठिकाणी इतक्या लोकांची व्यवस्था करण्याची क्षमता आहे का, याचा विचार केला जात नाही. गर्दीमुळे गोव्यातील काही समुद्रकिनाऱ्यांवर जाणे त्यांनी टाळले आहे.
नयनिका या आपल्या मुलींसोबत प्रवास करत असल्यामुळे त्यांना काही अतिरिक्त गोष्टींचा विचार करावा लागतो. प्रवासादरम्यान स्वच्छ सार्वजनिक स्वच्छतागृहे, स्वच्छता आणि सुरक्षितता या गोष्टी त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असतात. त्यामुळे त्या कुटुंबासोबत राहण्यासाठी योग्य सोयी असलेल्या छोट्या आणि आरामदायी हॉटेल्सना प्राधान्य देतात.
महिलांनी एकट्याने प्रवास करताना अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे शिव्या नाथ सांगतात. त्या एकट्याने प्रवास करताना शक्यतो स्थानिक कुटुंबांकडून चालवल्या जाणाऱ्या होमस्टे किंवा गेस्ट हाऊसमध्ये राहणे पसंत करतात. त्यामुळे आपण एकट्याने प्रवास करत आहोत, याची तिथल्या लोकांना माहिती असते. गरज पडल्यास ते मदतही करू शकतात.
मात्र, भारतातील लोकांच्या पाहुणचाराची परंपराही तितकीच खास आहे. अनेक ठिकाणी अनोळखी लोकही आपुलकीने चहा किंवा जेवणासाठी आमंत्रित करतात. त्यामुळे भारतात प्रवास करताना सुंदर निसर्गासोबतच माणसांमधील आपलेपणाचाही अनुभव घेता येतो.
भारताला २०२७ मधील सर्वोत्तम पर्यटन स्थळाचा बहुमान मिळाल्यामुळे देशातील पर्यटनाला आणखी चालना मिळण्याची शक्यता आहे. मात्र, भारत समजून घ्यायचा असेल तर केवळ प्रसिद्ध पर्यटनस्थळांना भेट देणे पुरेसे नाही.
स्थानिक लोकांचे जीवन, त्यांच्या परंपरा, खाद्यसंस्कृती आणि निसर्गाशी असलेले नाते समजून घेणेही महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर आपण ज्या ठिकाणी फिरायला जातो, त्या ठिकाणचे पर्यावरण आणि स्थानिक संस्कृती जपण्याची जबाबदारीही पर्यटकांची आहे.
कारण एखाद्या ठिकाणाचे सौंदर्य अनुभवण्याइतकेच ते पुढील पिढ्यांसाठी टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे. भारताचा खरा अनुभव घ्यायचा असेल तर ठरावीक पर्यटनाच्या चौकटीबाहेर पडून देशातील विविधतेचा आनंद घेणे गरजेचे आहे.
या किताबाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या पर्यटनाला मिळणारी प्रसिद्धी.
परदेशी पर्यटकांची संख्या वाढू शकते : जगभरातील पर्यटकांना भारतातील नवीन पर्यटनस्थळांची माहिती मिळेल. त्यामुळे भारताला भेट देण्याबाबत त्यांची उत्सुकता वाढू शकते.
पर्यटन व्यवसायाला चालना मिळू शकते : हॉटेल्स, रिसॉर्ट्स, ट्रॅव्हल कंपन्या, टूर गाइड, स्थानिक वाहतूक आणि रेस्टॉरंट व्यवसायाला फायदा होण्याची शक्यता आहे.
लहान पर्यटनस्थळांना ओळख मिळेल : केवळ मुंबई, दिल्ली, गोवा किंवा ताजमहालच नव्हे, तर ईशान्य भारत, लक्षद्वीप, मध्य प्रदेश आणि ग्रामीण भागातील पर्यटनस्थळांकडेही परदेशी पर्यटकांचे लक्ष जाऊ शकते.
रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात : पर्यटक वाढल्यास स्थानिक मार्गदर्शक, हॉटेल कर्मचारी, वाहनचालक, हस्तकला व्यावसायिक आणि लहान व्यावसायिकांना रोजगार मिळू शकतो.
देशाच्या अर्थव्यवस्थेला मदत होऊ शकते : परदेशी पर्यटक भारतात खर्च करत असल्यामुळे पर्यटनातून परकीय चलन मिळण्यास आणि स्थानिक व्यवसायांची उलाढाल वाढण्यास मदत होते.
भारताला मिळालेला हा किताब म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीने देशाला मिळालेली आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी आहे. यामुळे भारतातील पर्यटनस्थळे, हॉटेल व्यवसाय, स्थानिक खाद्यसंस्कृती आणि ग्रामीण पर्यटनाला जागतिक स्तरावर ओळख मिळण्याची संधी निर्माण झाली आहे.