समुद्राचे गर्वहरण 
फीचर्स

समुद्राचे गर्वहरण

Best Story IN Marathi - समुद्राचे गर्वहरण

पुढारी वृत्तसेवा

समुद्रकिनाऱ्यावरील शुभ्र वाळूत, लाटांपासून थोड्याशा अंतरावर टिटवा-टिटवीचे एक जोडपे सुखाने राहत होते. टिटवीला अंडी घालण्याची वेळ जवळ आली. टिटवा म्हणाला, “हा समुद्रकिनारा किती सुंदर आहे! तू इथेच अंडी घाल.” टिटवी साशंकपणे म्हणाली, “हा समुद्र आहे. त्याचा काही भरवसा नाही. आपण दुसरे एखादे सुरक्षित ठिकाण शोधू.”

टिटवा हसत म्हणाला, “तुझी काळजी योग्य आहे. पण समुद्राची काय बिशाद आहे की तो आपली अंडी घेऊन जाईल? भगवंताने प्रत्येकाला मर्यादा आखून दिली आहे. तू निर्धास्तपणे इथेच अंडी घाल.” टिटवीने वाळूत छोटासा खळगा करून चार सुंदर ठिपकेदार अंडी घातली. त्या प्रदेशाचा अधिपती असलेला रत्नाकर सामर्थ्याच्या मदाने उन्मत्त झाला होता. अथांग जलराशीचा स्वामी आणि असंख्य जलचरांचा पोशिंदा असल्याचा त्याला विलक्षण अहंकार त्याच्या मनात घर करून बसला होता. दुसऱ्याच दिवशी दोघे अन्नाच्या शोधात गेले असताना भरती उसळली. गर्वाने उन्मत्त झालेल्या समुद्राने एका प्रचंड लाटेत ती अंडी आपल्या कुशीत घेतली. टिटवी नर मादी दुःखाने अगदी वेडेपिसे झाले. त्यांनी समुद्राला त्यांची अंडी परत देण्यासाठी खूप विनवणी केली. पण समुद्राने त्यांना धुडकावून लावले.

“तुम्ही माझ्या आश्रयाने राहता आणि माझाच अपमान करता? करा काय करता ते!” तो गुर्मीत म्हणाला. आता मात्र टिटव्यांनी तो समुद्र कोरडा करून अंडी परत मिळवण्याचा निश्चय केला. टिटव्याने सारस, बदक, मोर इत्यादी मित्रांना विनंती केली, “मित्रांनो! हा समुद्र सुकवून आमची अंडी परत आणण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करा!”

पक्षी म्हणाले, “समुद्र सुकवायची ताकद आमच्यात नाही.” टिटव्यांच्या त्या जोडीने आपल्या इवल्याशा चोचीने समुद्राचे पाणी उचलून आणून बाहेर वाळूत आणून टाकण्याचा सपाटा लावला. समुद्र हा त्यांचा तो शर्थीचा प्रयत्न पाहून मनातल्या मनात हसत होता. त्यांची ही चिकाटी पाहून इतर पक्षी त्यांचा राजा गरुडाकडे गेले. अन्यायाची वार्ता ऐकताच गरुड संतापला आणि त्याने सारा वृत्तांत भगवान श्रीविष्णूंना सांगितला. उन्मत्त समुद्राने केलेला हा अन्याय ऐकून प्रभूंनाही संताप आला. पितांबर परिधान केलेले, गळ्यात कौस्तुभमणी आणि वैजयंतीमाळा धारण केलेले, हाती सुदर्शनचक्र धारण केलेले भगवान श्रीविष्णू गरुडावर आरूढ होऊन समुद्रकिनारी आले. महासागर मनुष्य रूपामध्ये प्रभूंना सामोरा झाला. भगवंतांना शरण गेला.

श्रीविष्णू म्हणाले, “टिटवी लहान असली, सामान्य असली, तरी सुखाने जगण्याचा अधिकार तिलाही आहे. तिने तुझी काही आगळीक केली नव्हती. तिच्याकडून बोलण्यात एखादा प्रमाद झाला असेल, पण म्हणून अशी शिक्षा? तेही मी घालून दिलेली मर्यादा ओलांडून? चल, तिची अंडी तिला आताच्या आत्ता परत करून टाक. नाहीतर तुला सुकवून टाकायला मला वेळ लागणार नाही.”

भगवंतांचे हे शब्द ऐकताच समुद्राचा सारा गर्व क्षणार्धात विरला. त्याने आपली चूक मान्य केली आणि पुढच्याच लाटेने टिटवीची चारही अंडी सुखरूप तिच्या स्वाधीन केली. तेव्हा भगवान श्रीविष्णूंनी टिटव्यांना सांगितले, “थोर आणि सामर्थ्यवान व्यक्तीचा उपमर्द किंवा थट्टा कधीही करू नये.” आणि समुद्रालाही बजावले, “सामर्थ्याचा गर्व करून दुर्बलांवर अन्याय करणे हा धर्म नाही.” या गोष्टीतून पंडित विष्णुशर्मा एक महत्त्वाचा जीवननियम सांगतात- सत्ताधाऱ्यांनी सामन्यातल्या सामान्य व्यक्तीलाही नगण्य समजून त्याचा अपमान करू नये.

सातत्याने विरोध करत राहून ते आधिकारी व्यक्तीलाही जेरीस आणू शकतात. त्यांनाही त्राता मिळतो. अशा जीवनदृष्टी देणाऱ्या कथा आचार्य विष्णुशर्मा यांनी पंचतंत्र या अमर ग्रंथात गुंफल्या. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी दक्षिण भारतातील महिलारोप्य नगरीतील राजा अमरशक्तीच्या राजपुत्रांना व्यवहारज्ञान, नीती आणि शहाणपण शिकवण्यासाठी त्यांनी रचलेल्या या कथा आजही तितक्याच ताज्या, प्रेरणादायी आणि कालातीत वाटतात.

- सौ. अनुराधा चंद्रशेखर भडसावळे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT