YouTube Down Pudhari
तंत्रज्ञान

YouTube Down: यूट्यूब अचानक ठप्प! भारतासह जगभरातील कोट्यवधी युजर्सनी केली तक्रार; अ‍ॅप आणि वेबसाईट दोन्ही बंद

YouTube Down: आज सकाळी यूट्यूब अचानक जगभर ठप्प झाल्याने कोट्यवधी युजर्सना व्हिडिओ पाहण्यात अडचणी आल्या. भारतासह अमेरिका आणि अनेक देशांत अ‍ॅप व वेबसाईटवर “Something went wrong” असा एरर दिसत होता.

Rahul Shelke

YouTube Down: जगातील सर्वात लोकप्रिय व्हिडिओ प्लॅटफॉर्म YouTube आज सकाळी अचानक ठप्प झालं. या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील कोट्यवधी युजर्सना व्हिडिओ पाहण्यात अडथळे आले. मोबाईल अ‍ॅप आणि वेबसाईट या दोन्ही माध्यमांवर यूट्यूब उघडताना “Something went wrong” असा एरर मेसेज दिसत होता.

सकाळपासूनच अनेक युजर्सनी सोशल मीडियावर तक्रारी करायला सुरुवात केली. काहींना होमपेज उघडत नव्हतं, तर काहींचे व्हिडिओ लोडच होत नव्हते. काही वेळातच मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X वर #YouTubeDown ट्रेंड होऊ लागला.

यूट्यूबच्या टीमने X वर पोस्ट करत सांगितलं की, “जर तुम्हाला यूट्यूब वापरताना अडचण येत असेल, तर तुम्ही एकटे नाही आहात. आमची टीम यावर काम करत आहे. लवकरच सेवा पूर्ववत केली जाईल.” त्यानंतर काही तासांतच कंपनीने तांत्रिक त्रुटी दूर करत यूट्यूबची सेवा पुन्हा सुरू केली.

या आउटेजचा परिणाम केवळ एका देशापुरता मर्यादित नव्हता. तर अमेरिकेत तब्बल 2 लाख 83 हजारांहून अधिक युजर्सनी ‘डाउन डिटेक्टर’वर तक्रारी नोंदवल्या, तर भारतातही 18 हजारांपेक्षा जास्त लोकांनी तक्रारी नोंदवल्या. आकडेवारीनुसार, भारतातील सुमारे 74 टक्के युजर्सना यूट्यूब अ‍ॅप चालवताना अडचणी आल्या, 16 टक्के लोकांना व्हिडिओ स्ट्रीमिंगमध्ये समस्या जाणवली, तर 10 टक्के युजर्सना वेबसाईट उघडतानाच अडथळे आले.

यामुळे अनेकांचे काम खोळंबले. कंटेंट क्रिएटर्सचे अपलोड थांबले, ऑनलाइन क्लासेसमध्ये व्यत्यय आला आणि मनोरंजनासाठी यूट्यूबवर अवलंबून असलेल्या लोकांचीही मोठी गैरसोय झाली.

दरम्यान, सेवा पूर्ववत झाल्यानंतर यूट्यूबने दिलासा देत सांगितलं की, सध्या प्लॅटफॉर्म पूर्वीसारखाच सुरळीत सुरू आहे. मात्र, नेमकी ही तांत्रिक अडचण कशामुळे निर्माण झाली, याबाबत कंपनीकडून सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT