WhatsApp Outage Pudhari
तंत्रज्ञान

WhatsApp Web warning : व्हॉट्सॲप वेब वापरताय? तुमचे चॅट्स आणि खाते हॅकर्सच्या ताब्यात जाऊ शकते; सायबर विभागाचा नवा अलर्ट

सरकारच्या सायबर गुन्हे विरोधी शाखेने दिला 'व्हॉट्सॲप वेब'बाबत नवीन सुरक्षा सल्‍ला

पुढारी वृत्तसेवा

WhatsApp Web warning : व्हॉट्सॲप वेब वापरणाऱ्यांसाठी सरकारच्‍या सायबर गुन्‍हे विरोधी शाखेने आज (दि. २३ नोव्‍हेंबर) एक नवीन सुरक्षा सल्‍ला दिला आहे. इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) अंतर्गत असलेल्या नॅशनल सायबर क्राईम थ्रेट ॲनालिटिक्स युनिटने (NCTAU) स्‍पष्‍ट केले आहे की, सक्रिय, प्रमाणित व्हॉट्सॲप वेब सेशन्सचा गैरवापर करून हॅकर्स तुमचे खाते हायजॅक करू शकतात, खासगी चॅट्स वाचू शकतात आणि फसवणूक करण्यासाठी तुमची ओळख धारण करू शकतात.

नेमका कोणता धोका?

'पीटीआय'ने दिलेल्‍या वृत्तानुसार, सायबर क्राईम थ्रेट ॲनालिटिक्स युनिटने दिलेल्‍या इशार्‍यात स्‍पष्‍ट केले आहे की, व्‍हॉटस ॲप हॅक केल्‍यानंतर वाईट हेतू असलेले लोक वैयक्तिक संदेश वाचू शकतात, संपर्क याद्या आणि ग्रुप चॅट्स पाहू शकतात, आणि खातेधारक असल्याचे भासवून संदेश पाठवू शकतात. पीडित व्यक्तीच्या विश्वासार्ह ओळखीचा फायदा घेऊन ते फसवणूक, फिशिंग आणि सोशल-इंजिनिअरिंगचे घोटाळे सुरू करू शकतात.

'ब्राउझर टॅब बंद करणे पुरेसे नाही'

ब्राउझर विंडो किंवा टॅब केवळ बंद केल्याने व्हॉट्सॲप वेब सेशन संपत नाही, यावर आय४सीने (I4C) विशेष भर दिला आहे. संगणकावर हा प्लॅटफॉर्म वापरून झाल्यानंतर वापरकर्त्यांनी प्रत्येक वेळी स्वतःहून लॉग आऊट करणे आवश्यक आहे. वापरकर्त्यांना, विशेषतः कार्यालयातील संगणक, शेअर्ड सिस्टम्स, सार्वजनिक संगणक किंवा इतरांच्या हाती लागू शकतील अशा उपकरणांवर व्हॉट्सॲप वेब वापरताना काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे."

व्हॉट्सॲप वेबवर संवेदनशील काम करणे टाळावे

"व्हॉट्सॲप वेबवर अधिकृत किंवा संवेदनशील काम करणे टाळावे. शासकीय, संस्थात्मक, आर्थिक, गोपनीय किंवा इतर संवेदनशील माहिती संगणकावरील व्हॉट्सॲप वेब सेशन्सद्वारे पाठवणे शक्यतो टाळावे," असा इशाराही देण्यात आला आहे.

सल्ल्यातील महत्त्वाच्या सुरक्षा टिप्स खालीलप्रमाणे...

व्हॉट्सॲप खाती अनधिकृत ताब्यात जाण्यापासून रोखण्यासाठी आय४सीने (I4C) पुढील खबरदारी घेण्याची केलेल्‍या शिफारसी खालीलप्रमाणे ....

  • सायबर कॅफेमधील संगणक, सार्वजनिक किऑस्क, हॉटेलमधील बिझनेस सेंटर्स, दुसऱ्याकडून घेतलेले लॅपटॉप्स किंवा इतर अनोळखी व सार्वजनिक उपकरणांवर व्हॉट्सॲप वेबवर लॉग इन करणे टाळा.

  • शेअर्ड सिस्टम्सवर लॉग इन करणे अपरिहार्यच असल्यास, ब्राउझरचा इन्कॉग्निटो किंवा प्रायव्हेट ब्राउझिंग मोड वापरा; मात्र त्यानंतर स्वतःहून लॉग आऊट करायला विसरू नका.

  • तुमच्या नंबरवरून अनपेक्षित मेसेज जाणे, कॉन्टॅक्ट्सकडून विचित्र प्रतिसाद येणे किंवा कोणतीही अनाकलनीय हालचाल दिसणे, अशा खात्यातील असामान्य गोष्टींकडे बारकाईने लक्ष ठेवा.

  • तुमची उपकरणे, ऑपरेटिंग सिस्टम्स, ब्राउझर्स आणि सुरक्षा सॉफ्टवेअर्स अद्ययावत (अपडेटेड) ठेवा, तसेच संशयास्पद डाऊनलोड्स, अनोळखी फाइल्स आणि क्रॅक केलेल्या सॉफ्टवेअर्सपासून दूर राहा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT