इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲप (WhatsApp) सतत आपल्या युजर्सचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी नवनवीन फीचर्स आणत असते. याच पार्श्वभूमीवर, कंपनी आता एका अशा फीचरवर काम करत आहे, ज्यामुळे फोटो शेअर करण्याची पद्धत कायमची बदलून जाईल. फीचर ट्रॅकर WABetaInfo च्या अहवालानुसार, व्हॉट्सॲपच्या लेटेस्ट बीटा व्हर्जनमध्ये हे नवीन फीचर दिसून आले असून, सध्या काही बीटा टेस्टर्ससाठी ते उपलब्ध झाले आहे. या फीचरच्या माध्यमातून युजर्स असे फोटो पाठवू शकतील, ज्यात फोटो क्लिक करण्याच्या आधीचे आणि नंतरचे काही क्षण व्हिडिओमध्ये कॅप्चर होतील.
WABetaInfo ने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटनुसार, मोशन फोटोसाठी एक नवीन आयकॉन (Icon) जोडला जाईल. यामध्ये प्ले बटणाच्या (Play Button) भोवती एक रिंग आणि एक लहान वर्तुळ असेल. हा आयकॉन इमेज सिलेक्शन इंटरफेसमध्ये दिसेल, जिथून युजर्स आपल्या गॅलरीमधून फोटो निवडून कोणत्याही व्यक्तीला किंवा ग्रुपला पाठवू शकतात.
फोटो निवडल्यानंतर, उजव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात दिसणाऱ्या या आयकॉनवर टॅप करून फोटो 'मोशन फोटो' म्हणून पाठवता येईल.
व्हॉट्सॲपने याची व्याख्या "एक असे रेकॉर्डिंग, ज्यात फोटो काढण्यापूर्वी आणि नंतरचे काही क्षण समाविष्ट असतात," अशी केली आहे.
सर्वात विशेष म्हणजे, या छोट्या व्हिडिओ क्लिपमध्ये ऑडिओचाही (Audio) समावेश असेल, ज्यामुळे आठवणी अधिक जिवंत वाटतील.
मोशन फोटोचे फीचर अनेक अँड्रॉइड स्मार्टफोन्समध्ये आधीपासूनच उपलब्ध आहे. सॅमसंग (Samsung) याला "Motion Photos" तर गुगल पिक्सेल (Google Pixel) याला "Top Shot" या नावाने सादर करते.
जर तुमच्या फोनमध्ये हे फीचर आधीपासूनच असेल, तर तुम्ही ते थेट व्हॉट्सॲपवरून पाठवू शकाल. पण जर तुमच्या फोनमध्ये ही सुविधा नसेल, तरीही काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही इतरांकडून आलेले मोशन फोटो पाहू आणि ऐकू शकाल.
सध्या हे फीचर अँड्रॉइडच्या 2.25.22.29 बीटा अपडेटमध्ये टेस्टिंग फेजमध्ये आहे आणि सर्व बीटा टेस्टर्सपर्यंत पोहोचायला काही दिवस लागू शकतात. व्हॉट्सॲपने अद्याप हे फीचर सर्वांसाठी कधी रिलीज केले जाईल, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, या फीचरच्या आगमनानंतर मोशन फोटो पाठवताना ते व्हिडिओ फाइलमध्ये रूपांतरित होण्याची समस्या दूर होईल आणि युजर्सना एक अखंड आणि चांगला अनुभव मिळेल.