WhatsApp Paid Subscription: आज जवळपास प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असलेल्या व्हॉट्सॲपसाठी आपल्याला पैसे मोजावे लागणार आहेत, अशी चर्चा सुरु आहे. कारण, कंपनी सबस्क्रिप्शन मॉडेल आणण्याच्या तयारीत आहे. म्हणजेच, व्हॉट्सॲप वापरताना जाहिराती पाहायच्या नसतील, तर युजर्सला पैसे मोजावे लागू शकतात.
गेल्या वर्षी मेटा कंपनीने व्हॉट्सॲपच्या स्टेटस आणि चॅनेल्समध्ये जाहिराती सुरु करण्यासाठी काही टेस्ट केल्या होत्या. या निर्णयावर अनेक युजर्सनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र टीकेनंतरही कंपनीने माघार घेतली नाही. उलट, आता जाहिराती दिसू नये म्हणून सबस्क्रिप्शनचा प्लॅन कंपनी आणत आहे.
अलीकडेच व्हॉट्सॲपच्या व्हर्जन 2.26.3.9 च्या कोडमध्ये काही नवीन स्ट्रिंग्स आल्या आहेत. या स्ट्रिंग्समधून असं दिसतय की, स्टेटस आणि चॅनेल्समध्ये दिसणाऱ्या जाहिराती बंद करण्यासाठी Ad-Free सबस्क्रिप्शन आणलं जाऊ शकतं. सध्या कंपनीकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली, तरीही रिपोर्ट्सवरून व्हॉट्सॲप या दिशेने काम करत असल्याचं स्पष्ट होत आहे.
जर युजरने सबस्क्रिप्शन घेतलं नाही, तर त्यांना व्हॉट्सॲपच्या स्टेटस आणि चॅनेल्समध्ये वारंवार जाहिराती पाहाव्या लागू शकतात. मात्र जे युजर्स पैसे देऊन सबस्क्रिप्शन घेतील, त्यांना जाहिरातमुक्त (Ad-Free) व्हॉट्सॲप वापरता येईल.
महत्त्वाचं म्हणजे, सध्या हे सबस्क्रिप्शन फक्त स्टेटस आणि चॅनेल्समध्ये दिसणाऱ्या जाहिरातींसाठीच असण्याची शक्यता आहे. म्हणजेच, चॅट्स किंवा कॉलिंगसारख्या इतर फीचर्समध्ये जाहिराती येण्याची शक्यता कमी आहे.
आतापर्यंत
– सबस्क्रिप्शनची किंमत किती असेल,
– जाहिराती बंद करण्याव्यतिरिक्त आणखी कोणते फीचर्स मिळतील,
– आणि हे सबस्क्रिप्शन कधीपासून लागू होईल,
याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
एवढं मात्र नक्की की, व्हॉट्सॲप आता हळूहळू जाहिरात आणि सबस्क्रिप्शन आधारित मॉडेलकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे भविष्यात मोफत व्हॉट्सॲपचे मॉडेल बदलू शकते.