एलन मस्क यांच्या SpaceX कंपनीची सॅटेलाईट इंटरनेट सेवा Starlink आता भारतातही सुरू होण्याच्या मार्गावर आहे. भारत सरकारने स्टारलिंकला सॅटेलाईट कम्युनिकेशन (SatComm) सेवा सुरू करण्यासाठी अधिकृत परवानगी दिली आहे. ही माहिती अद्याप अधिकृतरीत्या जाहीर झालेली नसली तरी PTIच्या सूत्रांकडून ही बातमी समोर आली आहे.
Starlink ही सॅटेलाईट इंटरनेट सेवा लो अर्थ ऑर्बिट (LEO) मधून कार्य करते, जिथे सॅटेलाईट पृथ्वीपासून सुमारे 550 किमी उंचावर असतात. ही सेवा ग्रामीण व दुर्गम भागांपर्यंतही हाय-स्पीड आणि कमी विलंब असलेली ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी देण्याची क्षमता ठेवते. त्यामुळे भारतात इंटरनेट पोहोच न झालेल्या कोपऱ्यांमध्ये ही सेवा क्रांती घडवून आणू शकते.
मिळालेल्या माहितीनुसार, स्टारलिंकचे इंटरनेट प्लान ₹850 पेक्षा कमी दराने सुरू होऊ शकतात. त्यात अनलिमिटेड डेटा देखील उपलब्ध असणार आहे. सुरुवातीच्या ऑफरमध्ये हे प्लान ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ठेवले जाणार आहेत. यामुळे हे जगातील सर्वात स्वस्त सॅटेलाईट इंटरनेट प्लान्सपैकी एक मानले जात आहे.
Starlink कंपनीने अद्याप लॉन्चची अचूक तारीख जाहीर केलेली नसली, तरी 15 दिवसांचे ट्रायल रन झाल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, जिओ आणि एअरटेल सोबत स्टारलिंकची भागीदारी झाली आहे. त्यामुळे या कंपन्यांच्या स्टोअरमध्येच Starlink चा अँटेना व सेटअप डिव्हाइसेस विक्रीसाठी उपलब्ध असतील.
Starlink भारतात १ कोटीहून अधिक वापरकर्ते जोडण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे. कमी किमतीत सेवा पुरवून कंपनी भारतातील स्पेक्ट्रमच्या उच्च खर्चाची भरपाई करण्याचा प्रयत्न करणार आहे.
Starlink ही SpaceX कंपनीची एक सॅटेलाईट इंटरनेट सेवा आहे. जगातील सर्वात मोठ्या LEO सॅटेलाईट नेटवर्कद्वारे ही सेवा दिली जाते. या नेटवर्कचा उद्देश म्हणजे जगभरातील कोपऱ्यात जलद आणि विश्वसनीय इंटरनेट सेवा पोहोचवणे – अगदी जिथे मोबाईल टॉवर नाहीत तिथेही.