Sam Altman Chatgpt News : येत्या ६ महिन्यांत 'चॅटजीपीटी'चे (ChatGPT) एक अत्यंत प्रगत रूप वापरकर्त्यांच्या भेटीस येऊ शकते, जे तुमच्या कॉम्प्युटरवरील सर्व घडामोडी, बैठका, संदेश आणि कागदपत्रांची माहिती ठेवून तुमच्यासोबत एक सहाय्यक म्हणून काम करेल, असा दावा ओपनएआयचे (OpenAI) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सॅम ऑल्टमन यांनी केला आहे.
'झेड फेलो'चे (Z Fellow) संस्थापक कोरी लेव्ही यांना दिलेल्या मुलाखतीत ऑल्टमन यांनी चॅटजीपीटीच्या भविष्यातील वाटचालीवर महत्त्वपूर्ण भाष्य केले. केवळ ई-मेल लिहिणे किंवा दस्तऐवजांचा सारांश तयार करणे एवढ्यापुरते मर्यादित न राहता, चॅटजीपीटी आता अधिक वैयक्तिक पातळीवर काम करेल.
ऑल्टमन यांच्या मते, भविष्यातील हे एआय मॉडेल तुमच्या संगणकाची स्क्रीन, तुम्ही उपस्थित असलेल्या बैठका आणि संभाषणे यावर 'सतत' लक्ष ठेवू शकेल. त्यामुळे वापरकर्ता कॉम्प्युटरवर नक्की काय काम करत आहे, हे समजून घेणे एआयला अधिक सोपे जाईल. याशिवाय ई-मेल, टेक्स्ट मेसेज, कागदपत्रे आणि 'स्लॅक' (Slack) यांसारखी माध्यमे थेट एआयशी जोडता येतील.
हे तंत्रज्ञान जेवढे उत्सुकता वाढवणारे आहे, तेवढेच देखरेखीच्या दृष्टीने भीतीदायकही वाटू शकते. मात्र, यावर स्पष्टीकरण देताना ऑल्टमन यांनी सांगितले की, "कोणत्या माहितीचा प्रवेश एआयला द्यायचा, याचा संपूर्ण अधिकार वापरकर्त्याकडेच असेल. एआय वापरकर्त्याच्या वतीने परस्पर निर्णय घेणार नाही, तर त्याच्यासोबत काम करून कामातील लहान-मोठ्या गोष्टींमध्ये मदत करेल." उदाहरणार्थ, एखादा विक्री प्रस्ताव (Sales Pitch) तयार करताना एआय संबंधित ग्राहकाचा जुना इतिहास, पूर्वीचे संभाषण आणि दस्तऐवज तपासून सुधारणा सूचवू शकेल. तसेच धोरणात्मक दस्तऐवज (Strategy Document) लिहित असताना एआय संभाव्य चुका दाखवून नवीन कल्पनाही मांडू शकेल. स्टार्टअपचे सीईओ किंवा ज्यांच्याकडे कामाचा प्रचंड ताण असतो, अशा लोकांसाठी हे तंत्रज्ञान एका अतिरिक्त सहाय्यकाप्रमाणे काम करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मॅक (Mac) प्रणालीवरील चॅटजीपीटी डेस्कटॉप ॲपसाठी नुकतेच 'कॉम्प्युटर हिस्ट्री' हे नवीन फिचर सादर करण्यात आले आहे. यामुळे एआय ठराविक ॲप्स आणि वेबसाईटवरील हालचालींवर लक्ष ठेवू शकते. हे फीचर स्क्रीनशॉटवर अवलंबून न राहता 'मॅक ओएस'च्याप्रवेश्यता वैशिष्ट्यांचा वापर करून क्लिक, टायपिंग आणि ॲप्समधील बदल टिपते.सध्या हे वैशिष्ट्य मर्यादित स्वरूपात उपलब्ध असले तरी, ऑल्टमन यांनी नमूद केलेल्या दिशेनेच ओपनएआयची वाटचाल सुरू असल्याचे स्पष्ट होते. पुढील ६ महिन्यांत हे एआय मॉडेल पूर्ण क्षमतेने प्रत्यक्षात येऊ शकते, असा विश्वास ऑल्टमन यांनी व्यक्त केला आहे.