राजधानी दिल्लीसह देशाच्या अनेक भागांमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने उकाड्यापासून दिलासा मिळायला आहे. अनेकांसाठी तो डोकेदुखीही ठरला आहे. विशेषतः जे लोक बाहेर होते आणि त्यांचे स्मार्टफोन पावसात भिजले, त्यांची चिंता वाढली आहे. तसेच संपूर्ण पावसाळ्यात अनेकांचे फोन पावसात भिजू देखील शकतात. त्यामुळे पावसाळ्यात स्मार्टफोन भिजलाच तर काय काळजी घ्यावी, हे नक्की वाचा.
पावसाळ्यात बहुतांशी लोकांचे स्मार्टफोन भिजू शकतो. असे झाल्यास ते घाबरून फोन ताबडतोब चालू करतात किंवा सुकवण्याचा प्रयत्न करतात ही एक मोठी चूक ठरू शकते. तुमची एक छोटीशी घाई महागड्या फोनला कायमचे निकामी करू शकते. म्हणूनच, जर तुमच्या डिव्हाइसमध्ये पावसाचे पाणी गेले असेल, तर या ५ चुका करणे टाळा.
१. घाई घाईत फोन चालू करू नका
पावसात भिजल्यानंतर अनेकजण आपला फोन व्यवस्थित काम करतोय की नाही, हे तपासण्यासाठी तो लगेच चालू करतात. मात्र, ही सर्वात मोठी चूक आहे. ओल्या फोनमध्ये वीजप्रवाह सुरू झाल्यास शॉर्ट सर्किट होऊन फोन कायमचा बंद पडू शकतो. त्यामुळे फोन भिजल्यास तो सुरू करण्याची घाई अजिबात करू नका.
२. चार्जिंगला लावू नका
काही लोक फोन भिजल्यावर तो लवकर सुरू व्हावा, या आशेने थेट चार्जिंगला लावतात. पण हे अत्यंत धोकादायक आहे. पाणी आणि वीज यांचा संपर्क आल्यास फोन आणि चार्जर दोन्हीमध्ये शॉर्ट सर्किट होऊन तुमचा महागडा फोन खराब होऊ शकतो.
३. हेअर ड्रायर किंवा हीटर वापरू नका
फोन सुकवण्यासाठी काहीजण हेअर ड्रायर किंवा हीटरचा वापर करतात. मात्र, यातून निघणारी उष्णता फोनच्या अंतर्गत भागांना (internal components) मोठे नुकसान पोहोचवू शकते. यामुळे फोनमधील संवेदनशील भाग वितळू शकतात आणि स्क्रीन व बॅटरीलाही धोका निर्माण होऊ शकतो.
४. फोन झटकणे टाळा
फोन झटकल्याने पाणी बाहेर निघेल, असा अनेकांचा समज असतो. पण असे केल्याने पाणी फोनच्या इतर भागांमध्ये, जसे की स्पीकर, मायक्रोफोन आणि चार्जिंग पोर्टमध्ये पसरते आणि त्यांना अधिक नुकसान पोहोचवते. त्यामुळे ही चूक करणे टाळा.
५. तांदळात ठेवण्याचा प्रयोग नको
फोन भिजल्यावर तो तांदळाच्या डब्यात ठेवल्यास लवकर सुकतो, असा एक लोकप्रिय समज आहे. मात्र, यामुळे फोनमधील ओलावा पूर्णपणे निघत नाही. उलट, अनेकदा तांदळाचे कण चार्जिंग पोर्टमध्ये अडकून बसतात. खुद्द स्मार्टफोन कंपन्याही असे न करण्याचा सल्ला देतात.