Normal vs Wireless Charging Canva
तंत्रज्ञान

Normal vs Wireless Charging | नॉर्मल चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगमध्ये काय आहे फरक? जाणून घ्या तुमच्यासाठी कोणता पर्याय बेस्ट

Normal vs Wireless Charging | या दोन्ही पद्धतींचा वेग, सोय, खर्च आणि बॅटरी हेल्थवर होणारा परिणाम वेगवेगळा आहे.

पुढारी वृत्तसेवा

Normal vs Wireless Charging

आजच्या काळात मोबाईल हे केवळ संवादाचे साधन राहिलेले नाही, तर दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. मोबाईलचा वापर इतका वाढला आहे की त्याची बॅटरी किती लवकर संपते आणि ती किती पटकन चार्ज होते हे आता प्रत्येकासाठी महत्त्वाचा प्रश्न ठरला आहे. त्यामुळे चार्जिंगच्या पद्धतींबाबत ग्राहकांमध्ये अनेकदा संभ्रम निर्माण होतो. सध्या बाजारात दोन प्रमुख पर्याय उपलब्ध आहेत, नॉर्मल (वायर्ड) चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंग. या दोन्ही पद्धतींचा वेग, सोय, खर्च आणि बॅटरी हेल्थवर होणारा परिणाम वेगवेगळा आहे.

नॉर्मल (वायर्ड) चार्जिंग

नॉर्मल चार्जिंग ही सर्वात जुनी आणि पारंपरिक पद्धत आहे. यामध्ये मोबाईलला चार्जरच्या मदतीने थेट विजेचा पुरवठा केला जातो.

  • या पद्धतीत चार्जिंगचा वेग अधिक असतो.

  • आजकाल जवळपास सर्वच कंपन्या फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी वापरतात. काही मोबाईल तर फक्त अर्ध्या ते एका तासात पूर्ण चार्ज होतात.

  • वीजेचा अपव्यय कमी होतो, त्यामुळे ही पद्धत अधिक कार्यक्षम मानली जाते.

  • मात्र सतत चार्जिंग पोर्टमध्ये केबल जोडणे आणि काढणे यामुळे पोर्ट सैल होण्याची समस्या उद्भवते.

  • कधी कधी बनावट किंवा जास्त व्होल्टेजचे चार्जर वापरल्यास बॅटरीवर वाईट परिणाम होऊ शकतो.

वायरलेस चार्जिंग

तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबत आलेला आधुनिक पर्याय म्हणजे वायरलेस चार्जिंग. यामध्ये चार्जिंग पॅडवर मोबाईल ठेवला की तो इंडक्शन तंत्रज्ञानाद्वारे चार्ज होतो.

  • या पद्धतीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे केबल लावण्याची गरज नाही.

  • ऑफिस टेबल, बेडसाईड किंवा कारमध्ये बसविलेल्या वायरलेस पॅडवर मोबाईल ठेवला की चार्जिंग आपोआप सुरू होते.

  • मात्र या पद्धतीत चार्जिंगचा वेग कमी असतो. नॉर्मल चार्जिंगच्या तुलनेत फोन चार्ज होण्यासाठी दुप्पट वेळ लागू शकतो.

  • वायरलेस चार्जिंगमध्ये उर्जेचा अपव्यय जास्त होतो, त्यामुळे वीजेचा वापर अधिक होतो.

  • फोन पॅडवर नीट ठेवला नसेल तर चार्जिंग तुटक-फुटक सुरू होते.

  • सतत उष्णता निर्माण झाल्याने काही वेळा बॅटरीची हेल्थ बिघडू शकते.

कोणता पर्याय तुमच्यासाठी योग्य?

  • जर तुम्ही दिवसभर व्यस्त असता आणि फोन पटकन चार्ज होणे गरजेचे असेल, तर नॉर्मल (वायर्ड) फास्ट चार्जिंग हा उत्तम पर्याय आहे.

  • जर तुम्हाला वारंवार फोन चार्जिंगला लावावा लागत असेल आणि केबल हाताळणे त्रासदायक वाटत असेल, तर वायरलेस चार्जिंग सोयीचे ठरते.

  • तज्ज्ञांच्या मते, बॅटरीचे दीर्घकालीन आरोग्य टिकवण्यासाठी वायर्ड चार्जिंग अधिक चांगले आहे.

  • वायरलेस चार्जिंग हे प्रामुख्याने सुविधेसाठी, तर नॉर्मल चार्जिंग हे कार्यक्षमता आणि बॅटरी हेल्थसाठी फायदेशीर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT