जगातील सर्वात मोठी टेक कंपनी Google ने तब्बल 10 वर्षांनंतर आपल्या प्रसिद्ध 'G' लोगोमध्ये बदल केला आहे. अनेक वर्षांपासून Google चे युजर्स असलेल्यांनी नवीन लोगोमध्ये झालेला बदल लक्षात घेतलाच असेल. सध्या हा लोगो काही बीटा युजर्सना दिसत आहे, पण लवकरच तो सर्व डिव्हाइसेसवर लागू होण्याची शक्यता आहे.
गुगलने आपल्या ब्रँड ओळखीतील पारंपरिक चार रंग – निळा, लाल, हिरवा आणि पिवळा – टिकवले आहेत. पण यावेळी रंग ब्लॉक शैलीऐवजी ग्रेडिएंट (हलक्या ते गडद शेड) स्वरूपात दिसत आहेत. त्यामुळे लोगोला अधिक आधुनिक आणि डायनॅमिक लुक मिळतो.
Google ने अधिकृतरित्या काहीही जाहीर केलेले नसले तरी तज्ज्ञांच्या मते, हा बदल कंपनीच्या तंत्रज्ञानातील बदलत्या दिशेचा संकेत आहे. विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या क्षेत्रातील गुगलच्या वाढत्या गुंतवणुकीचा प्रतिबिंब या नव्या लोगोमध्ये दिसतो.
नवीन G लोगो सध्या काही Apple डिव्हाइसेसवर गुगल सर्च अॅपमध्ये दिसतोय. तसेच, Android च्या बीटा वर्जन 16.8 मध्येही काही युजर्सना हा लोगो दिसला आहे. मात्र Gmail, Google Maps यांसारख्या इतर सेवा आणि बहुतांश वेब युजर्सना सध्या जुनाच लोगो दिसतो आहे.
Google I/O 2025 हे वार्षिक टेक इव्हेंट काही दिवसांवर आलेले आहे. त्यामुळे असा अंदाज वर्तवला जात आहे की, गूगल या इव्हेंटमध्ये नवीन लोगोच्या संकल्पनेमागील उद्दिष्ट आणि भविष्यकालीन दिशा स्पष्ट करणार आहे.
लोगो ही केवळ रचना नसते, ती कंपनीच्या विचारसरणीचे, भविष्यातील उद्दिष्टांचे आणि तंत्रज्ञानावरील दृष्टिकोनाचे प्रतीक असते. गुगलचा हा नवीन लोगो स्पष्टपणे दर्शवतो की कंपनी आता AI-केंद्रित, स्मार्ट आणि फ्यूचरिस्टिक ब्रँडिंगकडे वाटचाल करत आहे.