India's technology sector
मुंबई : भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्रात घसघशीत पगारवाढीमध्ये जनरेटिव्ह AI आणि MLOps तज्ज्ञांनी आघाडी घेतली आहे. भावी पिढीसाठी स्मार्ट सिस्टिम्स तयार करणं, त्यांना सुरक्षित ठेवणं आणि मोठ्या प्रमाणावर कौशल्यपूर्ण बनवणं, अशा व्यावसायिकांसाठी कंपन्या मोठी रक्कम मोजत आहेत. जनरेटिव्ह AI क्षेत्रातील वरिष्ठ तज्ज्ञांचे वार्षिक पॅकेज थेट 60 लाख रुपयांपर्यत पोहाचले आहे. तर मशीन लर्निंग ऑपरेशन्स (MLOps) तज्ज्ञ 58 लाख, सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट 55 लाखांवर आणि क्लाउड आर्किटेक्ट्स 45 लाखांपर्यंत वार्षिक पॅकेज पोहोचले असल्याची आकडेवारी TeamLease Digital च्या ‘डिजिटल स्किल्स आणि सॅलरी प्राइमर 2025-26’ या अहवालात समोर आली आहे.
'डिजिटल स्किल्स आणि सॅलरी प्राइमर 2025-26’च्या अहवालानुसार, मध्यम-कारकिर्दीतील व्यावसायिकांना GenAI आणि MLOps मध्ये 38-40 लाख, तर क्लाउड व सायबरसिक्युरिटीमध्ये 30-35 लाख रुपये वार्षिक पगार मिळतोय. या क्षेत्रात नुकतेच पदवी घेवून मार्कटमध्ये उतरलेल्या फ्रेशर्संनाही रोजगाराच्या उत्तम संधी असून, GenAI आणि MLOps मध्ये सुरुवातीचा पगार 12 लाख रुपये आहे. क्लाउड, डेटा किंवा सायबरसिक्युरिटीमध्ये 10-11 लाख रुपये,फुल स्टॅक किंवा API डेव्हलपमेंटमध्ये 8-10 लाख रुपये पगार मिळत आहे.
'डिजिटल स्किल्स आणि सॅलरी प्राइमर 2025-26’च्या अहवालानुसार, AI, MLOps, क्लाउड आणि सायबरसिक्युरिटी सारखी नवीन युगाशी निगडित कौशल्यं वेगाने वाढत आहेत. तर DevOps, फुल स्टॅक आणि API इंजिनिअरिंग ही क्षेत्रं स्थिर राहिले असल्याचे चित्र आहे. तोच लो-कोड डेव्हलपमेंटसारख्या क्षेत्रांमध्ये घट होण्याचे संकेत मिळत आहे. यामुळे नवीन तंत्रज्ञानावर आधारित कौशल्यांना अधिक मागणी असून आयटी क्षेत्रातील पारंपरिक भूमिकांचं महत्त्व कमी होत आहे.
कौशल्य आर्थिक वर्ष 25 आर्थिक वर्ष 27
जनरेटिव्ह AI ₹31.5 लाख ₹37.5 लाख
सायबरसिक्युरिटी ₹28 लाख ₹33.5 लाख
डेटा इंजिनिअरिंग ₹23 लाख ₹27 लाख
क्लाउड कंप्युटिंग ₹24 लाख ₹28 लाख