टेक न्यूज: आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेने आपलं आयुष्य अनेक अंगांनी बदलून टाकलं आहे. माहिती शोधण्यापासून ते आपल्या कामाच्या नियोजनापर्यंत, AI सर्वत्र आपलं स्थान निर्माण करत आहे. पण आता हीच टेक्नॉलॉजी तुमच्या नोकरीच्या जबाबदाऱ्या बदलू शकते किंवा तुमची नोकरी पूर्णपणे काढून घेऊ शकते, असा इशारा एका नवीन अहवालातून देण्यात आला आहे.
मायक्रोसॉफ्टने नुकताच "वर्किंग विथ AI: मेजरिंग द ऑक्युपेशनल इम्प्लिकेशन्स ऑफ जनरेटिव्ह AI" नावाचा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात, विविध क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांकडून AI चा वापर कसा केला जात आहे आणि त्याचा त्यांच्या नोकऱ्यांवर काय परिणाम होऊ शकतो, याचं विश्लेषण करण्यात आलं आहे.
मायक्रोसॉफ्टच्या संशोधकांना असं आढळलं आहे की, अनेक डेस्क जॉब्स (बैठी कामं) धोक्यात आहेत, कारण AI त्यांच्या कामाचा मोठा भाग सहजपणे पूर्ण करू शकतं. यासाठी संशोधकांनी जानेवारी ते सप्टेंबर २०२४ दरम्यान अमेरिकेतील वापरकर्ते आणि मायक्रोसॉफ्टचा चॅटबॉट 'बिंग कोपायलट' यांच्यातील सुमारे 2 लाख संभाषणांचा अभ्यास केला.
अहवालात म्हटलं आहे, "आम्हाला असं आढळलं की, लोक माहिती गोळा करणे आणि लिखाण करणे यांसारख्या कामांसाठी AIची सर्वाधिक मदत घेतात. तर, AI स्वतः माहिती देणे, मदत करणे, लिखाण करणे, शिकवणे आणि सल्ला देणे यांसारखी कामं प्रभावीपणे करत आहे."
या अहवालात अशा नोकऱ्यांचाही उल्लेख आहे ज्या AIपासून सर्वात सुरक्षित आहेत. यामध्ये वैद्यकीय आणि शारीरिक श्रमाची गरज असलेल्या (ब्ल्यू-कॉलर) नोकऱ्या, फ्लेबोटोमिस्ट (रक्त नमुने घेणारे), नर्सिंग सहाय्यक, शिप इंजिनिअर आणि टायर दुरुस्त करणारे याचा समावेश आहे. दरम्यान खालील १० नोकऱ्या AI तंत्रज्ञानामुळे सर्वाधिक धोक्यात आहेत. यातील तब्बल ५ नोकऱ्या या ग्राहक सेवा क्षेत्राशी संबंधित आहेत. दुभाषी आणि अनुवादक (Interpreters and Translators): या नोकरीतील ९८% कामं ही को-पायलटच्या कामांशी मिळतीजुळती आहेत.
इतिहासकार (Historians)
प्रवासी परिचर (Passenger Attendants)
सेवा विक्री प्रतिनिधी (Sales Representatives of Services)
लेखक आणि ग्रंथकार (Writers and Authors)
ग्राहक सेवा प्रतिनिधी (Customer Service Representatives)
कॉम्प्युटर न्यूमेरिकल कंट्रोलर (CNC) टूल प्रोग्रामर्स
टेलिफोन ऑपरेटर (Telephone Operators)
तिकीट एजंट आणि ट्रॅव्हल क्लर्क (Ticket Agents and Travel Clerks)
ब्रॉडकास्ट निवेदक आणि रेडिओ जॉकी (Broadcast Announcers and Radio DJs)
मायक्रोसॉफ्टच्या या अहवालाचा अर्थ असा नाही की, उद्या एखादा रोबोट तुमची नोकरी घेईल. पण, आजच्या बदलत्या जॉब मार्केटमध्ये टिकून राहायचं असेल, तर AI टूल्सबद्दल सर्व काही शिकून घेणं आणि त्याचा तुमच्या कंपनीला कसा फायदा होईल हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे, असं मत एनव्हिडियाचे (Nvidia) सह-संस्थापक आणि सीईओ जेन्सेन हुआंग यांनी व्यक्त केलं आहे. हुआंग म्हणतात, "तुमची नोकरी AI मुळे जाणार नाही, तर तुमची नोकरी AI वापरणाऱ्या व्यक्तीमुळे जाईल."
शॉपिफाय (Shopify), ड्युओलिंगो (Duolingo) आणि फायव्हर (Fiverr) सारख्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामात AI वापरण्यास प्रोत्साहित केलं आहे किंवा काही ठिकाणी ते अनिवार्यही केलं आहे. पण अशा जगात जिथे चॅटबॉट्स माणसांची अनेक कामं करू शकतात, तिथे काही कौशल्यं अशी आहेत जी फक्त माणसांकडेच असू शकतात. यामध्ये सहानुभूती, जिज्ञासा, सामाजिक आणि भावनिक बुद्धिमत्ता, नेतृत्व आणि संबंध निर्माण करण्याची कला यांचा समावेश आहे. स्टॅनफोर्ड बिझनेस स्कूलचे लेक्चरर रॉबर्ट ई. सीगल यांच्या मते, AI च्या युगात यशस्वी होण्यासाठी ही मानवी कौशल्ये जोपासणं आवश्यक आहे.
सीगल म्हणतात, "AI क्रांती ही एक वास्तविकता आहे आणि त्याला घाबरण्याऐवजी, आपण याकडे प्रगती आणि विकासाची संधी म्हणून पाहिलं पाहिजे. मानवी कौशल्ये जोपासून, बदलांना स्वीकारून आणि नातेसंबंधांवर लक्ष केंद्रित करून, तुम्ही AI च्या युगात केवळ टिकून राहणार नाही, तर यशस्वी देखील व्हाल."