Arattai app  
तंत्रज्ञान

WhatsAppला तगडी टक्कर! भारतीय 'Arattai' ॲपने प्ले स्टोरवर 'नंबर 1', जाणून घ्या काय आहे खास?

Arattai app number 1 Play Store: PM मोदींनी 'स्वदेशी वस्तूंचा वापर करा' असे आवाहन केल्यानंतर या ॲपच्या लोकप्रियतेला मोठी गती मिळाली आहे.

मोनिका क्षीरसागर

भारतात मेसेजिंगच्या जगात WhatsApp चे वर्चस्व आहे, पण गेल्या काही दिवसांपासून एका भारतीय मेसेजिंग ॲपने खळबळ उडवून दिली आहे. या ॲपचे नाव आहे Arattai (अरट्टई). लोकांमध्ये त्याची लोकप्रियता इतकी वाढत आहे की, अनेक जण WhatsApp वरून या ॲपवर शिफ्ट होत आहेत. 'अरट्टई' हे ॲप आता भारतात प्ले स्टोरवर नंबर 1 सोशल नेटवर्किंग ॲप बनले आहे.

Arattai (अरट्टई) चा अर्थ काय?

'अरट्टई' हा शब्द तमिळ भाषेतील असून त्याचा अर्थ गप्पा मारणे किंवा बातचीत करणे असा आहे. या ॲपची निर्मिती भारतीय कंपनी Zohoने केली आहे. हे ॲप फीचर्सच्या बाबतीत आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही परदेशी ॲपपेक्षा कमी नाही.

Arattai (अरट्टई) ॲपची वैशिष्ट्ये

Arattai (अरट्टई) हे एक इंस्टंट मेसेजिंग ॲप आहे. जे WhatsApp सारख्या विदेशी ॲप्सला स्वदेशी पर्याय म्हणून उपलब्ध आहे. Zoho कंपनीचा दावा आहे की, या ॲपमध्ये वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेची (Security) आणि गोपनीयतेची (Privacy) पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. या ॲपमध्ये खालीलप्रमाणे सुविधा मिळतात:

  • चॅटिंग (टेक्स्ट आणि व्हॉइस मेसेज)

  • फोटो, व्हिडिओ आणि डॉक्युमेंट शेअरिंग

  • व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल्स

  • ग्रुप चॅट आणि चॅनल्स

  • मीटिंग्ज शेड्यूल करण्याची सुविधा

  • स्टोरीज आणि लाईव्ह लोकेशन शेअरिंग

ॲप नंबर 1 कसे झाले?

पंतप्रधान मोदींनी 'स्वदेशी वस्तूंचा वापर करा' असे आवाहन केल्यानंतर, 21 सप्टेंबर रोजी या ॲपच्या लोकप्रियतेला मोठी गती मिळाली. 'आत्मनिर्भर भारत' उपक्रमांतर्गत भारतात विकसित झालेले हे ॲप सोशल नेटवर्किंग कॅटेगरीत नंबर 1 वर आले आहे. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही यापूर्वी Zoho कंपनीच्या उत्पादनांवर शिफ्ट होण्याची गोष्ट केली होती.

Arattai (अरट्टई) ॲप कसे वापरावे?

हे ॲप वापरणे खूप सोपे आहे. तुम्हाला फक्त प्ले स्टोर (Play Store) किंवा ॲप स्टोरवरून (App Store) Arattai ॲप डाउनलोड करायचे आहे आणि तुमच्या मोबाइल नंबरचा वापर करून लगेच वापरायला सुरुवात करायची आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT