AI Created Viruses: कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आता केवळ लिहिणे, चित्र तयार करणे किंवा कोडिंगपुरती मर्यादित राहिलेली नाही. आता प्रथमच शास्त्रज्ञांनी AI च्या मदतीने पूर्णपणे नवीन प्रकारचे विषाणू (Virus) तयार करण्यात यश मिळवले आहे. या संशोधनामुळे भविष्यात औषधनिर्मिती, लस आणि जनुकीय उपचारांच्या क्षेत्रात मोठी क्रांती घडू शकते. मात्र दुसरीकडे, याच तंत्रज्ञानाचा गैरवापर करून धोकादायक जैविक शस्त्रे तयार होण्याची शक्यताही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
हे महत्त्वाचे संशोधन 'सायन्स' (Science) या प्रतिष्ठित वैज्ञानिक नियतकालिकात प्रकाशित झाले आहे. हे संशोधन अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील आर्क इन्स्टिट्यूट (Arc Institute) आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठाशी संबंधित संशोधकांनी केले आहे.
आजपर्यंत शास्त्रज्ञ नैसर्गिक विषाणूंच्या जनुकांची (Genome) प्रतिकृती तयार करू शकत होते. त्याचा उपयोग लस, औषधे आणि विषाणूंचा अभ्यास करण्यासाठी केला जात होता. मात्र या नव्या संशोधनात AI ला निसर्गातील डीएनएच्या रचनांमधील नमुने (Patterns) ओळखण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
संशोधकांनी 'Evo' नावाचे AI मॉडेल विकसित केले. हे मॉडेल काही प्रमाणात ChatGPT प्रमाणेच कार्य करते. जसे ChatGPT शब्दांची रचना समजून नवीन मजकूर तयार करते, त्याचप्रमाणे Evo ने डीएनएमधील अब्जावधी जनुकीय अनुक्रमांचा अभ्यास करून नवीन जनुकीय रचना तयार करण्यास सुरुवात केली.
यासाठी AI ला प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव आणि विषाणूंच्या सुमारे 9 ट्रिलियन न्यूक्लियोटाइड्सचा डेटा शिकवण्यात आला.
संशोधकांनी AI ने तयार केलेल्या जनुकीय आराखड्यांपैकी 285 डीएनए प्रयोगशाळेत तयार केले. हे डीएनए जीवाणूंमध्ये (Bacteria) टाकण्यात आले.
या प्रयोगांदरम्यान 285 पैकी 16 डीएनएनी पूर्णपणे कार्यक्षम नवीन विषाणू तयार केले. हे विषाणू प्रयोगशाळेतील जीवाणूंना संसर्ग करू शकले, म्हणजेच ते जैविकदृष्ट्या सक्रिय असल्याचे सिद्ध झाले.
मात्र संशोधकांनी स्पष्ट केले की, हे विषाणू मानवांसाठी धोकादायक नाहीत. ते Phi X-174 नावाच्या अशा विषाणूवर आधारित आहेत, जो केवळ E. coli या जीवाणूंनाच संसर्ग करतो.
तज्ज्ञांच्या मते, हे संशोधन भविष्यात अनेक महत्त्वाच्या वैद्यकीय तंत्रज्ञानासाठी उपयोगी ठरू शकते.
जनुकीय आजारांवर उपचार करण्यासाठी आजही काही उपचारपद्धतींमध्ये विषाणूंचा वापर 'वाहक' (Vector) म्हणून केला जातो. AI च्या मदतीने अधिक सुरक्षित आणि परिणामकारक विषाणू तयार करता आले, तर जीन थेरपी, कर्करोग उपचार आणि नवीन लसी विकसित करण्याचे काम अधिक वेगाने होऊ शकते.
ऑक्सफर्ड विद्यापीठाचे प्रोटीन रसायनशास्त्रज्ञ डॉ. ऑलिव्हर क्रूक यांच्या मते, AI ने तयार केलेले विषाणू नैसर्गिक विषाणूंच्या जैविक नियमांवर आधारित असले तरी ते प्रयोगशाळेतील संशोधनासाठी महत्त्वाचे ठरू शकतात.
या संशोधनामुळे वैज्ञानिकांमध्ये नवीन चर्चाही सुरू झाली आहे. AI चा वापर करून भविष्यात अधिक संसर्गजन्य किंवा अधिक घातक विषाणू तयार केले जाऊ शकतील का, असा प्रश्न अनेक तज्ज्ञांनी उपस्थित केला आहे.
जॉन्स हॉपकिन्स सेंटर फॉर हेल्थ सिक्युरिटीचे संशोधक डॉ. मॉरिट्झ हांके यांच्या मते, AI चा वापर करून जैविक शस्त्रे तयार होऊ नयेत यासाठी आवश्यक नियम आणि सुरक्षा चौकट अद्याप पुरेशी विकसित झालेली नाही.
त्यांच्या मते, विज्ञान वेगाने पुढे जात असताना त्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या धोरणांची गती मात्र तुलनेने कमी आहे.
या संशोधनातील महत्त्वाची बाब म्हणजे संशोधकांनी सुरुवातीपासूनच सुरक्षा लक्षात घेतली. त्यांनी Evo ला मानव, प्राणी, वनस्पती किंवा बुरशींना संसर्ग करणाऱ्या विषाणूंचा डेटा दिलाच नाही.
त्यामुळे हे AI मॉडेल मानवी आरोग्यास धोका निर्माण करणारे विषाणू तयार करू शकत नाही, असे संशोधकांनी स्पष्ट केले आहे.
स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे संशोधक डॉ. ब्रायन हाय यांनी सांगितले की, "आम्हाला अतिरिक्त काळजी घ्यायची होती. त्यामुळे सुरुवातीपासूनच आम्ही सुरक्षिततेला प्राधान्य दिले."
अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट्स ऑफ हेल्थने (NIH) नुकतेच जोखमीच्या जैविक संशोधनासाठी नवीन धोरण जाहीर केले आहे. मात्र AI च्या मदतीने संगणकावर तयार होणाऱ्या जनुकीय डिझाइनचे नियमन कसे करायचे, याबाबत अजूनही स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे नाहीत.
तज्ज्ञांच्या मते, या तंत्रज्ञानाचा वापर जबाबदारीने आणि कठोर सुरक्षा नियमांच्या चौकटीतच झाला पाहिजे. अन्यथा भविष्यात हेच तंत्रज्ञान मानवजातीसाठी धोकादायक ठरु शकते.