Relationship Tips : जोडप्यामधील प्रेम जितकं गहिरे असतं, तितकाच त्यांच्यातील वादही नैसर्गिक मानला जातो. दोन भिन्न व्यक्तींमध्ये विचारांची भिन्नता असणं साहाजिकच आहे. मात्र, बऱ्याचदा याच छोट्या-मोठ्या मतभेदांमधून होणारे वाद एका सुंदर नात्याचा अंत करतात. म्हणूनच, जोडीदारासोबतचे वाद कसे मिटवावेत? याविषयी नातेसंबंधांचे अभ्यासक आणि प्रख्यात मानसशास्त्रज्ञ डॉ. मार्क ट्रॅव्हर्स यांनी ‘CNBC’ वर लिहिलेल्या लेखात मार्गदर्शन केले अहो. त्यांनी नात्यातील तणाव हाताळण्यासाठी महत्त्वाचे सल्ले दिले असून, याविषयी सविस्तर जाणून घेवूया...
डॉ. मार्क ट्रॅव्हर्स म्हणतात, नातं म्हटलं की कधी ना कधी वाद होणारच; पण अनेकदा साध्या कारणावरून सुरू झालेला वाद वाढतो. जोडीदारातील दौघांपैकी एक जण ण एखादी विशिष्ट गोष्ट बोलत असतो. यातून विषयाला फाटे फुटतात आणि चर्चा मूळ मुद्यावरून बाजूला सारून थेट एकमेकांवर आरोप करणे सुरु होते. दोघे मिळून काही मिनिटांपूर्वी एखादी समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत असतात. पुढच्याच क्षणी आपण दोघेही खोलीत कोण अधिक ‘समजूतदार’ आहे हे सिद्ध करण्यासाठी एकमेकांसोबत स्पर्धा करू लागतो. एकदा का वाद या पातळीवर पोहोचला, की तो कधीच मिटत नाही; कारण त्यानंतर आरोप-प्रत्यारोप करण्यासाठी मुद्दे आणि शब्दांची कमतरता भासत नाही.
जोड्यांचा अभ्यास करणाऱ्या मानसशास्त्रज्ञाच्या दृष्टीने सांगायचे तर, या अनावश्यक वादांना वेळीच रोखणारा एक सोपा उपाय उपलब्ध आहे. मी याला ‘अंशतः चूक मान्य करणे’ असे म्हणतो. यामुळे वाद भरकटण्यापासून वाचतात. तसेच , ज्या मुद्द्यासाठी खरोखर आपली चूक आहे, ती गोष्ट तो विषय समोर आल्याबरोबर लगेच आणि स्पष्टपणे मान्य करणे. मात्र, याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमची संपूर्ण बाजू किंवा इतर सर्व मुद्दे सोडून दिले आहेत. हे ऐकायला अगदी साधे-सोपे वाटते; पण प्रत्यक्ष वास्तवात आणण्यास कठीण आहे.
जोडप्यामधील वाद हा विसंवादानेच होतो हे सांगयाची गरज नाही. त्यामुळे जोडफ्यांनी खालील तीन वाक्य लक्षात ठेवावी असे डॉ. मार्क ट्रॅव्हर्स सांगतात, तुमचे संवादाची हतोटी बदला...
“तुझं म्हणणं बरोबर आहे, ती माझी चूक होती.”
“हे पटण्यासारखं आहे, मी खरंच सांगायला विसरलो.”
“तुला विश्वासात न घेता मी तो निर्णय घ्यायला नको होता.”
तुम्ही असा संवाद केला तर यचा अर्थ असा नाही की तुम्ही प्रत्येक बाबतीत चुकीचे आहात. पण जोडीदाराला ती चूक तुमच्याकडून वटवून घेण्यासाठी किंवा ओरबाडून घेण्यासाठी ताटकळत न ठेवता, तुमची जी वस्तुस्थितीतील चूक आहे ती तुम्ही स्वतःहून प्रामाणिकपणे कबूल करता. माझ्या अनुभवानुसार, वाद मिटवण्यासाठी यापेक्षा दुसरा कोणताही झटपट उपाय नाही, असेही डॉ. मार्क ट्रॅव्हर्स सांगतात.
जोडीदार तुम्हाला जाब विचारतो, तेव्हा नकळतपणे त्यांच्या मनाची अशी तयारी झालेली असते की, तुम्हाला पटवून देण्यासाठी त्यांना बरीच मेहनत घ्यावी लागेल. याच मानसिक ताणामुळे त्यांचे आवाज चढतात आणि ते जुनी उदाहरणे काढू लागतात. त्यांचा उद्देश तुम्हाला दुखावण्याचा नसतो; तर त्यांना फक्त एवढंच वाटत असतं की आपण सांगतोय ते समोरच्याने समजून घ्यावं, पण ती प्रक्रिया कठीण असेल असा त्यांचा समज असतो. ‘पार्शियल यील्ड’ मुळे वादाची वाफ निघून जाते, अन्यथा मोठा वाद पेटवण्यासाठी कारणीभूत ठरत असते. याचा परिणाम जवळपास तात्काळ दिसून येतो. यामुळे कोणाचाही अवमान झाल्यासारखे वाटत नाही. तुमच्या जोडीदाराला ज्याची प्रतीक्षा होती ती दाद मिळून जाते आणि संपूर्ण नात्याला बगल न देता, तुम्ही तुमच्या मर्यादित चुकीची प्रामाणिक कबुली देऊ शकता.
संपूर्ण माफी मागण्यापेक्षा ही पद्धत अधिक सोपी असते. आपण अनेकदा लहान-सहान चुका सहज का स्वीकारत नाही? कारण आपल्याला असं वाटत असतं की एक चूक मान्य केली, तर आपण सर्वच गोष्टींमध्ये चुकलो असा त्याचा अर्थ काढला जाईल. त्यामुळे सगळंच अंगाशी येण्यापेक्षा आपण काहीच मान्य न करणे पसंत करतो.
जेव्हा तुम्ही ‘पार्शियल यील्ड’ हा पर्याय वापरत नाही, तेव्हा काय होते याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तुम्ही त्या क्षणी आपली जबाबदारी स्वीकारली नाही, तर ती समस्या सहजासहजी सुटत नाही. जोडीदार ती गोष्ट लक्षात ठेवतो आणि मनात साठवून ठेवतो. कदाचित आजपासून तीन आठवड्यांनी पूर्णपणे वेगळ्या विषयावर भांडण सुरू असताना ते ही जुनी गोष्ट मध्येच काढू शकतात. वरवर पाहता हा जुन्या गोष्टींचा हिशोब काढल्यासारखा वाटतो, पण बहुतांश वेळा ती अशी जुनी खंत असते जिला कधीच दाद मिळालेली नसते आणि जी योग्य संधी मिळाल्यावर बाहेर येते. ज्या जोडीदारांमध्ये लहान-सहान चुकांची कबुली देण्याची सवय असते, त्यांच्याकडे अशा साठवून ठेवलेल्या जुन्या तक्रारींचा साठा नसतो. परिणामी, त्यांचे वाद नेमक्या त्याच मुद्द्यापुरते मर्यादित राहतात ज्यावरून ते सुरू झाले होते.
खऱ्याखुऱ्या ‘पार्शियल यील्ड’मध्ये आणि दिखाऊ मान्य करण्यात काही महत्त्वाचा फरक असतो; नेमकी कोणती चूक आहे ते स्पष्ट सांगा: “तुझं बरोबर आहे, तुझ्या आईसमोर मी तशा शब्दांत बोलायला नको होतं,” हे योग्य ठरते. याउलट, “बरं बाबा, मीच चुकलॊ!” असे गोलगोल किंवा उडवाउडवीचे बोलणे म्हणजे नाईलाजाने माघार घेतल्यासारखे वाटते आणि जोडीदारालाही ते तसेच जाणवते. त्यात ‘पण’ किंवा ‘परंतु’ जोडू नका: “तुझं बरोबर आहे, तो माझा भाग होता, पण तू सुद्धा…” असे म्हटल्यास आधी सांगितलेला सगळा प्रभाव नाहीसा होतो. जर तुमच्याकडेही एखादा प्रतिवाद असेल, तर तो पुढील ९० सेकंदातही टिकून राहील. आधी ती कबुली स्वतंत्रपणे आणि पूर्ण होऊ द्या.
एकदा समोरच्या व्यक्तीने आपल्या जुन्या तक्रारींची यादी वाचायला सुरुवात केली, की या पद्धतीचे महत्त्व बऱ्यापैकी कमी होते. जेव्हा तुम्हाला पहिल्यांदाच जाणवते की तुम्ही एखाद्या छोट्या बाबतीत तांत्रिकदृष्ट्या चुकला आहात, तीच ती अचूक वेळ असते. सहसा आपल्याला वाटते त्यापेक्षा खूप आधी आलेली असते.तुम्ही बहुतांश वेळा बरोबर असाल, तरीही हे करा: विशेषतः अशा वेळी तर नक्कीच करा. “मी बऱ्याच अंशी बरोबर होतो,” हाच असा मुद्दा आहे ज्यामुळे लोक कोणतीही चूक कबूल करण्यास ठामपणे नकार देतात .माझ्या अनुभवानुसार, खऱ्या अर्थाने ‘पार्शियल यील्ड’ वापरणारे जोडपे आणि केवळ एकमेकांवर कुरघोडी करण्यात वेळ घालवणारे जोडपे यांच्यातील हाच मुख्य फरक असतो, असेही मानसशास्त्रज्ञ डॉ. मार्क ट्रॅव्हर्स आपल्या लिखाणात नमूद करतात.