Reduce Mobile Screen Time Tips : तुमच्या खिशातील स्मार्टफोन, त्यातील वेगवेगळी ॲप्स आणि त्यांचे अल्गोरिदम... हे सर्व तुम्हाला तुमच्या वास्तविक आयुष्यापासून दूर नेण्यासाठीच डिझाइन केलेले आहेत, हे आता सर्वसामान्यांनाही माहीत आहे. यासाठी विशेष तज्ज्ञ असण्याची गरज नाही. आपले लक्ष सतत स्क्रीनकडे खेचून घेण्यासाठी जगभरात अब्जावधी डॉलर्स खर्च केले जात आहेत. मात्र, हेच हरवलेले लक्ष आणि वेळ पुन्हा मिळवण्यासाठी तुम्हाला महागड्या डिजिटल डिटॉक्स कॅम्पची किंवा लाखो रुपये खर्च करण्याची मुळीच गरज नाही. 'वॉशिंग्टन पोस्ट'चे प्रसिद्ध स्तंभलेखक मायकल कोरेन यांनी आपल्या फोनपासून आणि स्क्रीनच्या पलीकडील जगात स्वतःचा वेळ कसा वाचवावा, याबाबत चार अत्यंत व्यावहारिक व सोपे मार्ग सुचवले आहेत. याविषयी जाणून घेऊया...
एका पीअर-रिव्ह्यूड अभ्यासानुसार, जवळपास १०,००० अमेरिकन प्रौढांवर संशोधन केले असता एक धक्कादायक बाब समोर आली आहे. एक सामान्य व्यक्ती दररोज सरासरी सहा तास फोन वापरण्यात घालवते. या हिशोबाने विचार केला, तर आपण आपल्या संपूर्ण आयुष्यभरात सुमारे १५ वर्षे फक्त स्क्रीनकडे पाहण्यातच वाया घालवतो.
स्क्रीन टाइम नियंत्रणात ठेवण्यासाठी कोरेन यांनी सुचवलेले ४ मुख्य पर्याय खालीलप्रमाणे ....
फोनचा वापर कमी करायचा असेल, तर सर्वात आधी घरातील वातावरण तसे तयार करणे गरजेचे आहे. कोरेन यांच्या मते, घरातील काही जागा या मानसिकदृष्ट्या अत्यंत 'पवित्र' मानल्या पाहिजेत. उदाहरणार्थ, जेवणाच्या टेबलावर फोन पूर्णपणे वर्ज्य असावा (फार तर आजी-आजोबांशी व्हिडिओ कॉल करायचा असल्यास अपवाद). तसेच सर्वात महत्त्वाचा आणि अभेद्य नियम म्हणजे, "फोन बेडरूमच्या बाहेरच ठेवायचा." रात्री किंवा मोकळ्या वेळेत फोन स्वयंपाकघरातच चार्जिंगला लावून ठेवण्याची सवय लावावी, जेणेकरून झोपण्यापूर्वी स्क्रीन पाहण्याचा मोह टाळता येईल.
आपल्या फोनच्या रचनेत काही छोटे बदल करून स्क्रीन टाइम कमी करता येतो. अभ्यासात असे दिसून आले आहे की, फोनचा डिस्प्ले 'ग्रेस्केल' (Grayscale) केल्याने स्क्रीन टाइममध्ये तात्काळ आणि लक्षणीय घट होते, कारण रंगीबेरंगी स्क्रीनचे आकर्षण कमी होते. याशिवाय, फेसबुक, इंस्टाग्राम, ईमेल किंवा टेक्स्टिंगसारखी वारंवार उघडावी वाटणारी 'आवेगपूर्ण' (Impulsive) ॲप्स होम स्क्रीनवरून हटवून फोल्डर्समध्ये लपवून ठेवावीत. यामुळे ॲप उघडण्यासाठी अतिरिक्त क्लिक करावे लागतात आणि नकळत होणारा फोनचा वापर टळतो.
आजकाल असे अनेक तंत्रज्ञानात्मक पर्याय उपलब्ध आहेत, जे विशिष्ट ॲप्स आणि सेवांवर घट्ट नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. उदाहरणार्थ, 'फ्लोरा' (Flora) सारखे ॲप्स फेसबुक, इंस्टाग्राम आणि गेम्ससारखे लक्ष विचलित करणारे घटक विशिष्ट वेळेसाठी ब्लॉक करतात. तसेच, ज्यांना अधिक कठोर पाऊल उचलायचे आहे, त्यांच्यासाठी 'फ्रीडम' (Freedom) सारखे ॲप्लिकेशन्स पूर्ण फोनवरील इंटरनेट ॲक्सेस काही काळासाठी पूर्णपणे बंद करून टाकतात.
स्क्रीन टाइम कमी करून मिळालेल्या मोकळ्या वेळेत काय करायचे, याचे नियोजन आधीच तयार असणे आवश्यक आहे. कोरेन सांगतात की, त्यांना ज्या गोष्टी करायला आवडतात, त्या सहज उपलब्ध राहतील असे वातावरण त्यांनी घरात तयार केले आहे. घरातील प्रत्येक खोलीत पुस्तकांची कपाटे ठेवणे, भिंतीवर गिटार टांगणे किंवा व्यायामाचे साहित्य समोर तयार ठेवणे यांमुळे स्क्रीन सोडून इतर गोष्टींकडे मन वळवणे सोपे जाते. घराबाहेर जाऊन धावणे किंवा पोहणे यांसारखे छंद लगेच जोपासता आले, तर फोन हाताळण्याचा प्रश्नच उरत नाही, असे मायकल कोरेन यांनी सुचवले आहे. तर आजपासून त्यांनी सुचवलेल्या सूचनांचे पालन करून स्मार्टफोनसाठी दिला जाणारा बहुमूल्य वेळ कमी करा.