Parenting Tips
लहान मुलांचा सर्वांगीण विकास होत असताना सामाजिक कौशल्ये ही त्यांना आपोआप अवगत होत नाहीत. वाचन, लेखन किंवा गणिताची कोडी सोडवायला मुले जशी सरावातून शिकतात, अगदी त्याचप्रमाणे इतरांशी संवाद साधणे, नाते जोडणे आणि समोरच्या व्यक्तीला समजून घेणे या गोष्टीही त्यांना योग्य मार्गदर्शनातून शिकवाव्या लागतात. वयाच्या १० व्या वर्षापर्यंत मुलांमध्ये ही कौशल्ये विकसित होणे अत्यंत गरजेचे आहे; कारण या वयानंतर जर मुलाला मित्रमंडळीत किंवा समाजात मिसळताना अडचण आली, तर त्याचा थेट परिणाम त्यांच्या आत्मविश्वासावर होऊ लागतो.
मुलांना अधिक आत्मविश्वासू बनवण्यासाठी आणि त्यांना मित्रांमध्ये सहजपणे सामावून घेण्यासाठी वयाच्या १० व्या वर्षापूर्वी पुढील चार प्रमुख कौशल्ये शिकवणे गरजेचे आहे:
अनेकदा लहान मुलांना आधीच खेळत असलेल्या मुलांच्या घोळक्यात जाणे किंवा त्यांच्या खेळात सामील होणे मोठे आव्हानात्मक वाटते. अशा वेळी पालकांनी मुलांना सुरुवातीला थोडे थांबून निरीक्षण करायला शिकवावे. इतर मुले काय खेळत आहेत किंवा काय बोलत आहेत, याकडे लक्ष देण्यास त्यांना प्रवृत्त करावे. खेळात थेट "मी खेळू का?" असे विचारण्याऐवजी, "तुमचा खेळ खूप छान आहे, मी पण खेळू का?" अशा पद्धतीचा संवाद साधल्यास मुले सहजपणे इतरांमध्ये मिसळू शकतात.
लहान मुले अनेकदा खेळातील छोट्या-छोट्या मतभेदांना खूप मोठे स्वरूप देतात. खेळताना झालेले किरकोळ वाद म्हणजे मैत्रीचा शेवट, असा त्यांचा गैरसमज होतो. त्यामुळे मुलांना मतभेद आदरपूर्वक हाताळण्याची योग्य पद्धत शिकवणे गरजेचे आहे. दोन वेगवेगळ्या व्यक्तींची आवड-निवड वेगवेगळी असू शकते आणि मतभेद असूनही मैत्री टिकून राहू शकते, याची जाणीव त्यांना करून देणे आवश्यक आहे. याचा अर्थ मुलांनी वाद पूर्णपणे टाळावेत असा नाही, तर वादाचे रूपांतर भांडणात न करता आपले मत शांतपणे कसे मांडावे, हे त्यांना समजले पाहिजे.
केवळ शब्द समजणे पुरेसे नसते, तर समोरच्या व्यक्तीची देहबोली आणि सूक्ष्म संकेत ओळखणे हे एक अत्यंत महत्त्वाचे सामाजिक कौशल्य आहे. अनेकदा समोरच्याचा रस संपला तरी मुले आपलीच बडबड सुरू ठेवतात. अशा वेळी समोरची व्यक्ती वारंवार दुसरीकडे पाहत असेल, शरीर दूर वळवत असेल, खूप त्रोटक उत्तरे देत असेल किंवा अस्वस्थ दिसत असेल, तर हे संकेत ओळखून आपला संवाद थांबवणे किंवा बदलणे मुलांना शिकवले पाहिजे.
कधीकधी मुलांना आपल्या मनातल्या भावना समजत असतात, पण त्या व्यक्त कशा कराव्या हे सुचत नाही. अशा वेळी पालकांनी घरातच काही सोपी वाक्ये बोलण्याचा सराव करून घेतल्यास मुलांचे काम सोपे होते. जर एखाद्या गोष्टीसाठी मुलांवर चुकीचा दबाव येत असेल, तर त्यांनी "मला हे करायचे नाही" असे ठामपणे सांगायला शिकले पाहिजे. हे साधे पण खंबीर शब्द मुलांना लाचार किंवा हताश होण्यापासून वाचवतात.
सामाजिक कौशल्ये ही केवळ नवीन मित्र बनवण्यापुरती मर्यादित नसतात. मुलांची संवाद साधण्याची पद्धत, दैनंदिन समस्या सोडवण्याची क्षमता, भावनांवर नियंत्रण आणि सभोवतालच्या माणसांना समजून घेण्याची प्रगल्भता या सर्व गोष्टी या कौशल्यांवर अवलंबून असतात. ज्या मुलाला ऐकून घेणे, स्वतःचे मत मांडणे, सहकार्य करणे आणि मतभेद हाताळणे जमते, ती मुले भविष्यात कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्यासाठी सक्षम बनतात.
आपले मूल ग्रुपमध्ये पुढे होऊन बोलत नाही किंवा लगेच मित्र बनवत नाही, म्हणून अनेक पालकांना काळजी वाटते. परंतु, सामाजिक आत्मविश्वास एका रात्रीत निर्माण होत नाही. त्यासाठी मुलांना वेळ, प्रोत्साहन आणि वारंवार सराव करण्याची संधी मिळणे आवश्यक आहे. मुलाला 'लाजाळू' किंवा 'एककल्ली' असा शिक्का मारण्याऐवजी, त्याला नेमक्या कोणत्या कौशल्यात मदतीची गरज आहे हे ओळखून पालकांनी प्रेमळपणे मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.