Pakistani women beauty treatment File Photo
फीचर्स

Pakistani women beauty treatment: पाकिस्तानी मुली अधिक सुंदर दिसण्यासाठी तुर्कीला का जात आहेत? जाणून घ्या तिथे असे काय आहे?

पाकिस्तानात सध्या स्वतःला अधिक सुंदर आणि आकर्षक दाखवण्याचे प्रमाण वेगाने वाढत असून, उपचारांसाठी पाकिस्तानी तरुणींचा ओघ आता तुर्कस्तानकडे वाढल्याचे समोर आले आहे.

पुढारी वृत्तसेवा

Pakistani women beauty treatment

कराची: पाकिस्तानात सध्या स्वतःला अधिक सुंदर आणि आकर्षक दाखवण्याचे प्रमाण वेगाने वाढत असून, यासाठी सौंदर्योपचार अर्थात ब्युटी ट्रीटमेंट्सवर भरमसाठ पैसा खर्च केला जात आहे. 'डॉन' वृत्तपत्रातील एका अहवालानुसार, पाकिस्तानात कॉस्मेटिक उपचारांचा व्यवसाय दरवर्षी तब्बल ४० टक्क्यांच्या दराने वाढत आहे. विशेष म्हणजे, केवळ देशांतर्गतच नव्हे, तर दर्जेदार आणि किफायतशीर उपचारांसाठी पाकिस्तानी तरुणींचा ओघ आता तुर्कस्तानकडे वाढल्याचे समोर आले आहे.

पाकिस्तानात सौंदर्योपचारांचा वाढता बाजार

पाकिस्तानात गेल्या काही काळात बोटॉक्स, फिलर्स, हायड्राफेशियल, लेजर हेअर रिमूवल, स्किन टायटनिंग, केमिकल पील आणि हेअर ट्रान्सप्लांट यांसारख्या प्रक्रियांना कमालीची लोकप्रियता मिळाली आहे. तरुण वर्ग आणि विशेषतः तरुणी अशा उपचारांना प्राधान्य देत आहेत, ज्यात कमी वेळ लागतो.

उद्योग क्षेत्रातील अंदाजानुसार, सध्या पाकिस्तानात सुमारे २ लाख लोक नियमितपणे क्लिनिक्समध्ये जात असून जवळपास १० हजार कॉस्मेटिक प्रॅक्टिशनर्स या क्षेत्रात कार्यरत आहेत. महसूल मंडळाच्या आकडेवारीनुसार, या क्षेत्रात ३५० नवीन सेवा पुरवठादारांची भर पडली असून दरमहा सुमारे ८ कोटी रुपयांची उलाढाल होत आहे. अनेक सेलिब्रिटींनीही उघडपणे ब्युटी ट्रीटमेंट्स घेतल्याचे मान्य केल्यामुळे या संस्कृतीला आणखी प्रोत्साहन मिळाले आहे.

तुर्कस्तान ठरतोय पसंतीचे केंद्र

ज्या नागरिकांकडे चांगल बजेट आहे, ते पाकिस्तानातून थेट तुर्कस्तानमध्ये जाऊन उपचार घेण्यावर भर देत आहेत. तुर्कस्तानची सरकारी संस्था 'USHAS'च्या आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये १५ लाखाहून अधिक आणि २०२५ मध्ये सुमारे १४ लाख लोकांनी आरोग्याशी संबंधित सेवांसाठी तुर्कस्तानला भेट दिली. केवळ २०२५ मध्येच तुर्कस्तानने हेल्थ टुरिझमच्या माध्यमातून ३.०२ अब्ज अमेरिकी डॉलरचा व्यवसाय केला आहे.

पाकिस्तानी तरुणी तुर्कस्तानमध्येच का जातात?

पश्चिमी देश किंवा पाकिस्तानमधील काही व्हीआयपी रुग्णालयांच्या तुलनेत तुर्कस्तानमधील उपचार ५० ते ७० टक्क्यांपर्यंत स्वस्त पडतात. यात हॉटेल आणि व्हीआयपी ट्रान्सपोर्टचा खर्चही समाविष्ट असतो. इंटरनॅशनल सोसायटी ऑफ एस्थेटिक प्लास्टिक सर्जरीच्या अहवालानुसार, जगभरात कोट्यवधी एस्थेटिक प्रोसिजर्स केल्या जातात. यात तुर्कस्तान हे परदेशी रुग्णांसाठी एक जागतिक केंद्र म्हणून उदयास आले आहे. पाकिस्तानात तुर्कस्तानच्या ब्युटी उपचारांचा इतका प्रभाव पडला आहे कि, आता पाकिस्तानातच अनेक क्लिनिक्स आपल्या पॅकेजेससोबत 'तुर्कस्तान'चे नाव जोडून ग्राहकांना आकर्षित करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT