Meta VR Glasses File Photo
फीचर्स

Meta VR Glasses: मेटाने लाँच केला जादूई चष्मा; घरबसल्या IMAX थिएटरची मजा, व्हिडिओ कॉलमध्ये समोर दिसेल जिवंत माणूस!

मेटा कंपनीने नवीन 'मेटा व्हीआर ग्लासेस' लाँच केला आहे. आधीचे हेडसेट खूप जड असायचे, पण हा चष्मा अत्यंत हलका असून अगदी रोजच्या वापरातही तो आरामात वापरता येईल.

मोहन कारंडे

Meta VR Glasses

नवी दिल्ली: मेटा कंपनीने नवीन 'मेटा व्हीआर ग्लासेस' लाँच केला आहे. आधीचे हेडसेट खूप जड असायचे, पण हा चष्मा अत्यंत हलका असून अगदी रोजच्या वापरातही तो आरामात वापरता येईल. या नवीन गॅझेटमुळे युजर्सना घरबसल्या IMAX थिएटरसारखा अनुभव मिळणार आहे, तसेच व्हिडिओ कॉल करताना समोरची व्यक्ती जणू आपल्यासमोरच बसली आहे, असा 'होलोग्राम' अनुभव येईल. अमेरिकेत या चष्म्याची विक्री २०२७ मध्ये सुरू होणार असून, भारतीय रुपयांमध्ये याची किंमत सुमारे १.२५ लाख रुपये (१,२९९.९९ डॉलर) असणार आहे.

फक्त १०० ग्रॅम वजन आणि 'स्प्लिट आर्किटेक्चर'

मेटाचे हे व्हीआर ग्लासेस फक्त १०० ग्रॅम वजनाचे आहेत. कंपनीचे मालक मार्क झुकरबर्ग यांच्या मते, चष्म्याचे वजन कमी ठेवण्यासाठी 'स्प्लिट आर्किटेक्चर' नावाची नवीन टेक्नॉलॉजी वापरली आहे. यामध्ये प्रोसेसर, बॅटरी आणि स्टोरेज यांसारखे जड भाग चष्म्यात न ठेवता एका छोट्या बॉक्समध्ये दिले आहेत. हा बॉक्स युजर आपल्या खिशात किंवा बॅगेत सहज ठेवू शकतो, ज्यामुळे चेहऱ्यावर कोणताही भार पडत नाही.

जबरदस्त डिस्प्ले आणि सिनेमाचा अनुभव

या चष्म्यात मायक्रो-OLED पॅनेल असलेला दमदार 5K डिस्प्ले दिला आहे. यात अगदी बारीक मजकूर आणि बारीक-सारीक तपशीलही एकदम स्पष्ट दिसतात. तसेच, चष्मा दिसायला छोटा राहावा म्हणून 'पॅनकेक लेन्स' वापरले आहेत. याशिवाय, सिनेमासारखा आवाज मिळण्यासाठी डॉल्बी व्हिजन आणि डॉल्बी ॲटमॉसचा सपोर्ट दिला आहे. थोडक्यात सांगायचे तर, मेटा याला फक्त व्हीआर डिव्हाइस नाही, तर खिशात घेऊन फिरता येईल असा छोटा सिनेमा थिएटर म्हणून बाजारात आणत आहे.

आवाज, डोळे आणि हाताच्या इशाऱ्यांनी चालणार चष्मा

या डिव्हाइसमध्ये मेटा एआय थेट इन-बिल्ट दिले आहे. त्यामुळे युजरला बटण दाबायचीही गरज पडणार नाही; केवळ आवाजाने, डोळ्यांच्या हालचालींनी आणि हाताच्या साध्या इशाऱ्यांनी हा संपूर्ण चष्मा कंट्रोल करता येईल. यात क्वालकॉमचा पॉवरफुल प्रोसेसर दिला असून, चित्रपट पाहत असताना याची बॅटरी सुमारे तीन तास चालते. तसेच यामध्ये ४५ वॉटचे फास्ट चार्जिंग देखील मिळते.

व्हिडिओ कॉलमध्ये दिसणार हुबेहूब ‘होलोग्राम’

मेटाने या व्हीआर ग्लासेसमध्ये होलोग्राम टेक्नॉलॉजी आणली आहे. कंपनीच्या सांगण्यानुसार, यामुळे वापरकर्त्याची हुबेहूब डिजिटल प्रतिमा तयार होते, ज्यामध्ये चेहऱ्यावरील हावभाव आणि हसणे-रुसणे अगदी खरेखुरे वाटते. व्हिडिओ कॉल करताना हा होलोग्राम समोरच्या व्यक्तीच्या समोर जिवंत असल्यासारखा उभा राहतो. विशेष म्हणजे, समोरची व्यक्ती साध्या फोन किंवा कॉम्प्युटरवरून जरी बोलत असली, तरी तिलाही हा होलोग्राम स्पष्ट दिसेल. व्हॉट्सॲप आणि झूम सारख्या अनेक लोकप्रिय ॲप्सवर हे फिचर काम करणार आहे.

२०२७ पासून बाजारात उपलब्ध होणार

तंत्रज्ञान फक्त शक्तिशाली बनवणे हा उद्देश नसून ते लोकांच्या दैनंदिन आयुष्यात वापरण्यास सोपे आणि आरामदायी बनवणे हा मेटाचा उद्देश आहे. मेटाचे हे व्हीआर ग्लासेस २०२७ च्या सुरुवातीला अमेरिकेत विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. मात्र, भारतात हा चष्मा कधी येणार, याबद्दल कंपनीने अजून कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT