बेभरवशाचा बल्ब बदलला जातो... वारंवार दांड्या मारणारा कर्मचारीही! 
फीचर्स

Workplace Culture |बेभरवशाचा बल्ब शेवटी बदललाच जातो!

Workplace Culture | फॅक्टरीत दोन माणसं सगळ्यांच्या लक्षात राहतात. एक मशीन बंद पाडणारा... आणि दुसरा ते पुन्हा सुरू करणारा! ही गोष्ट आहे अशाच एका मेंटेनन्सवाल्याची.

पुढारी वृत्तसेवा

(सौ. अनुराधा चंद्रशेखर भडसावळे anu.bhadsavle@gmail.com)

फॅक्टरीत दोन माणसं सगळ्यांच्या लक्षात राहतात. एक मशीन बंद पाडणारा... आणि दुसरा ते पुन्हा सुरू करणारा! ही गोष्ट आहे अशाच एका मेंटेनन्सवाल्याची.

एका फॅक्टरीमध्ये एक तरुण मुलगा मेंटेनन्स विभागामध्ये अप्रेंटिस म्हणून काम करत होता. त्या विभागाचे प्रमुख "काका" तिथल्या सर्व कामगार व अधिकाऱ्यांना अतिशय प्रिय होते. कारण त्यांचं काम चोख होतं आणि स्वभाव मनमिळाऊ.

नवख्या मुलाला त्यांनी हाताशी धरलं. कोणतं मशीन कसं उघडायचं, कुठे हात घालायचा, कुठे अजिबात घालायचा नाही, कोणता आवाज म्हणजे काय बिघाड... सगळं शिकवलं. फॅक्टरीतल्या वेगवेगळ्या मशीनच्या दुरुस्तीची नेमकी माहिती करून दिली. त्याच्या हातून काही चूक राहून तर जात नाही ना, यावर बारकाईने लक्ष ठेवले. उत्तम काम नेमक्या वेळेत कसं करायचं, याचे धडे दिले.

शेवटी म्हणाले, "ऐक माझं... कमी बोल आणि जास्त काम कर. दांड्या मारू नकोस. नवीन मशीन आलं की घाबरू नकोस. 'हे माझं काम नाही' असं म्हणणारा माणूस तिथेच थांबतो. 'चल, शिकून बघू' म्हणणारा पुढे जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे... जे काम करशील ते मनापासून कर."

नवीन मुलगा कामात चांगलाच वाकबगार झाला. कुणाचं मशीन बंद पडलं की हा हजर. उत्पादन थांबायच्या आत मशीन सुरू. रात्र असो, रविवार असो... हा माणूस हजर.

काही वर्षांनी काका निवृत्त झाले. या चुणचुणीत मुलाची बढती होऊन तो ज्युनियर टेक्निशियन झाला. कंपनीतील सर्व मशीनचं मेंटेनन्स तो पाहू लागला. काम वाढलं... जबाबदारी वाढली... पण पगार आणि पद मात्र तितक्याच संथ गतीने पुढे सरकत होते.

दोन वर्षांनी वैतागून तो काकांकडे गेला.

"काका, जीव तोडून काम करतो. सुट्टी घेत नाही. फॅक्टरीतलं एकही मशीन माझ्यासाठी नवीन नाही. कोणाचं काम क्षणभरही बंद पडू देत नाही. अधिकारी माझ्यावर विश्वास ठेवतात. पण प्रमोशनची वेळ आली की माझा कोणी विचारच करत नाही."

काकांनी थोडा विचार केला.

"तू असं कर... एक दिवसाची रजा घे. बायको-मुलांना घेऊन फिरून ये."

काकांच्या बोलण्याचा अर्थ त्याने आपल्या मनानेच लावला. दुसऱ्याच दिवशी रजा घेतली आणि कुटुंबासोबत सहलीला गेला.

कामावर परत आल्यावर प्रत्येकजण म्हणू लागला,

"अरे, काल कुठे होतास? मशीनने आमचं नाकी नऊ आणलं. तुझ्याशिवाय काहीच सुचेना!"

ही गोष्ट मॅनेजरपर्यंत पोहोचली. त्याने त्याला बोलावलं, कौतुक केलं आणि प्रमोशन दिलं.

झालं!

या तरुणाला वाटलं, बढतीचं गुपित आता सापडलं.मग जरा नाराजी वाटली की रजा... थोडा राग आला की रजा... कामाचा ताण आला की रजा...

एक दिवस तो सुट्टीवरून परत आला तर सिक्युरिटी गार्डनेच त्याला गेटवर अडवलं.

"तुम्हाला आत जाता येणार नाही."

"का?"

"तुमची सेवा संपवण्यात आली आहे."

तो थेट काकांकडे गेला.

"काका, तुम्ही सांगितल्याप्रमाणेच करत होतो. मग नोकरी का गेली?"

काका शांतपणे म्हणाले,

"तू माझं अर्धंच वाक्य ऐकलंस. पुढचं ऐकायलाच थांबला नाहीस."

तो गोंधळला.

"मग पुढे काय सांगणार होता?"

काका म्हणाले,

"अंधाऱ्या खोलीत बल्ब रोज पेटत असतो. म्हणून त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. पण एक दिवस तो बंद पडला की त्याचं महत्त्व सगळ्यांना कळतं.

पण तोच बल्ब पुन्हा पुन्हा बंद पडू लागला, तर लोक त्याला जपून ठेवत नाहीत. सरळ नवीन बल्ब लावतात. कारण बेभरवशाच्या बल्बवर किती दिवस विसंबून राहणार?

तू पहिल्यांदा रजा घेतलीस, तेव्हा तुझ्या कामाची किंमत सगळ्यांना कळली. म्हणून तुला बढती मिळाली.

दुसऱ्यांदा लोक तयारीत होते.

तिसऱ्यांदा त्यांनी पर्याय शोधायला सुरुवात केली.

आणि चौथ्यांदा... त्यांना पर्याय मिळालाही."

तो काही बोलला नाही.

कधी कधी आपल्याला वाटतं, 'आपण नसलो की सगळ्यांना आपली किंमत कळेल.'

हो... कळतेही . पण अशी परिस्थिती किती वेळा येऊ द्यायची, यालाही मर्यादा असते.

संस्थेने आपल्या माणसांची दखल योग्य वेळी घेतली, तर नाराजी साचत नाही. आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या महत्त्वाची जाणीव करून देण्यासाठी वारंवार अनुपस्थिती, कामबंद किंवा संपाची टोकाची भूमिका घेण्याऐवजी संवादाचा मार्ग निवडला, तर नातं टिकून राहतं.

कारण कोणताही प्रकल्प मशीनमुळे यशस्वी होत नाही...

तो यशस्वी होतो विश्वासार्ह माणसांमुळे. आणि विश्वास... हा रोज कमवावा लागतो.

तो थोडा वेळ शांत राहिला. मग हळूच म्हणाला,

"काका, एकेकाळी मशीन बंद पडलं की मी दुरुस्तीसाठी धावत जायचो. पण माझंच मन कधी नाराज होऊन मी स्वार्थी होत गेलो, ते मला कळलंच नाही. मी कामाची अवास्तव किंमत मागत बसलो, आणि विश्वास गमावून बसलो."

काकांच्या खांद्यावर हात ठेवत तो उठला, आता दुरुस्त करायचं मशीन बाहेर नव्हतं, ते त्याच्या आतच होतं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT