Relationships  file photo
फीचर्स

Relationship Tips: प्रेमात तुम्ही स्वतःला हरवून बसला आहात का? थेरपिस्टने सांगितलेली 'ही' ३ लक्षणे वेळीच ओळखा

तुम्ही प्रेमापोटी नकळत स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष तर करत नाही ना? एका प्रसिद्ध थेरपिस्टने अशी तीन लक्षणे सांगितली आहेत, जी तुम्ही दुसऱ्या व्यक्तीसाठी स्वतःकडे दुर्लक्ष करत असल्याचे दाखवतात.

मोहन कारंडे

Relationship Tips:

नात्यामध्ये तडजोड करणे, एकमेकांना सांभाळून घेणे आणि भावनिक आधार देणे स्वाभाविक आहे. परंतु, एखाद्यासोबत नाते टिकवून ठेवण्याच्या नादात हळूहळू स्वतःचे अस्तित्व हरवणे, यात फरक आहे. आपण प्रेमापोटी नकळत स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष तर करत नाही ना? थेरपिस्ट जेफ्री मेल्ट्झर यांनी एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये अशी तीन लक्षणे सांगितली आहेत, जी तुम्ही दुसऱ्या व्यक्तीसाठी स्वतःकडे दुर्लक्ष करत असल्याचे दाखवतात.

१. स्वतःकडे पार्टनरच्या नजरेतून पाहणे

तुम्हाला काय वाटते, तुमच्या भावना काय आहेत किंवा तुमच्यासाठी काय महत्त्वाचे आहे, याऐवजी समोरची व्यक्ती काय म्हणेल, याचाच विचार तुम्ही करू लागता. जेफ्री सांगतात, "सामान्यांपेक्षा वेगळे दिसण्याच्या किंवा पार्टनरला आवडणार नाही या भीतीने अनेकदा लोक कपड्यांची पद्धत बदलतात, स्वतःचे व्यक्तिमत्त्व लपवतात किंवा मते मांडणे बंद करतात." हळूहळू स्वतःच्या समाधानापेक्षा पार्टनरची पसंती अधिक महत्त्वाची वाटू लागते आणि माणूस स्वतःची मूळ ओळख गमावून बसतो.

२. मनातून 'नाही' म्हणायचे असतानाही तुम्ही 'हो' म्हणता

पार्टनर दुखावला जाईल किंवा नात्यात वाद नको, या भीतीने स्वतःच्या गरजा बाजूला सारून समोरच्या व्यक्तीच्या आनंदाला महत्व देणे, हे धोक्याचे लक्षण आहे. एखादी गोष्ट तुम्हाला खटकत असतानाही तुम्ही गप्प राहता. तुम्ही स्वतःची समजूत काढता की, तुमच्या गरजांसाठी वाद घालणे योग्य नाही, हे घातक ठरू शकते.

परंतु, तुमच्या खऱ्या भावनांकडे वारंवार दुर्लक्ष केल्याने स्वतःशी असलेल्या तुमच्या नात्यावर परिणाम होऊ शकतो. जेफ्री यांच्या मते, "जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या खऱ्या भावनांकडे दुर्लक्ष करता, तेव्हा तुमचा स्वतःवरील विश्वास थोडा कमी होतो." कालांतराने, यामुळे मनात नाराजी किंवा चीड निर्माण होऊ शकते, समोरच्या व्यक्तीबद्दलही आणि स्वतःबद्दलही, कारण तुम्ही तुमच्या खऱ्या गरजा व्यक्त केल्या नाहीत.

३. नाते हेच आयुष्यातील स्थैर्याचे एकमेव साधन बनणे

नात्यात एकमेकांवर अवलंबून असणे हे निरोगी नात्याचे लक्षण आहे. परंतु, जेव्हा तुमचे भावनिक स्थैर्य, तुमची ओळख आणि सुरक्षिततेची भावना ही पूर्णपणे पार्टनरवरच अवलंबून राहते, तेव्हा समस्येला सुरुवात होते. जेफ्री यांच्या मते, केवळ पार्टनरला जपण्यासाठी लोक वैयक्तिक ध्येये सोडून देतात, मैत्री आणि इतर नातेसंबंधांकडे दुर्लक्ष करतात.

एखाद्या निरोगी नात्यात, स्वतःपासून तुटल्यासारखे न वाटताही तुम्हाला समोरच्या व्यक्तीशी जवळीक साधता आली पाहिजे. नात्यात तडजोड करणे स्वाभाविक असले, तरी स्वतःची ओळख, वैयक्तिक सीमा आणि गरजा यांचा सतत बळी दिल्यास, नात्यात येण्यापूर्वी तुम्ही जसे होतात, त्या स्वतःच्या मूळ रूपापासून तुम्ही अधिकाधिक दूर गेल्यासारखे वाटू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT