पांढऱ्या केसांवर मेंदीचा रंग चढत नाही? मिसळा 'या' ५ गोष्टी, घरच्या घरी बनवा नैसर्गिक कलर file photo
फीचर्स

How To Dye Hair Without Color : पांढऱ्या केसांवर मेंदीचा रंग चढत नाही? मिसळा 'या' ५ गोष्टी, घरच्या घरी बनवा नैसर्गिक कलर

आजकाल केसांच्या समस्यांमुळे अनेकजण त्रस्त आहेत. मग ती केस कोरडे आणि निर्जीव होण्याची समस्या असो किंवा कमी वयातच केस पांढरे होणे असो.

पुढारी वृत्तसेवा

Is henna not taking color on your grey hair? Mix in these 5 ingredients and create a natural hair color at home

पुढारी ऑपलाईन : How To Dye Hair Without Color : कमी वयातच पांढरे होणारे केस लपवण्यासाठी अनेकजण महागडे हेअर कलर आणि पार्लरचा आधार घेतात. मात्र, तुम्ही घरच्या घरी मेंदीच्या मदतीने नैसर्गिक हेअर कलर तयार करू शकता. यासाठी मेंदीमध्ये मेथीदाणे, लवंग, चहापत्ती, बीट आणि कॉफी यांसारख्या ५ गोष्टी मिसळा.

आजकाल केसांच्या समस्यांमुळे अनेकजण त्रस्त आहेत. मग ती केस कोरडे आणि निर्जीव होण्याची समस्या असो किंवा कमी वयातच केस पांढरे होणे असो. बिघडलेला आहार आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे आजकाल अनेकांचे केस लवकर पांढरे होऊ लागले आहेत. काहींच्या केसांमध्ये पांढऱ्या बटा दिसू लागतात, तर काहींच्या डोक्यावरील पांढरेपणा हळूहळू वाढू लागतो.

अशा वेळी पांढरे केस लपवण्यासाठी अनेकजण वारंवार पार्लरमध्ये जातात किंवा बाजारात मिळणाऱ्या हेअर कलरचा वापर करतात. हे कलर केसांना लगेच काळा रंग देतात; मात्र त्याचा केसांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे काहीजण केसांना रंग देण्यासाठी मेंदी लावतात. मात्र, मेंदी लावल्यानंतरही केसांना अपेक्षित काळा रंग मिळत नाही. तुमचीही अशीच समस्या असेल, तर काळजी करू नका.

मेंदीमध्ये काही घरगुती गोष्टी मिसळल्यास केसांना गडद रंग मिळण्यास मदत होऊ शकते. विशेष म्हणजे या सर्व गोष्टी जवळपास प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असतात. या सर्व गोष्टी एकत्र करून तुम्ही घरच्या घरी मेंदीचे वेगळे मिश्रण तयार करू शकता. यामुळे केसांना नैसर्गिक गडद रंगछटा मिळण्यास मदत होऊ शकते. जाणून घेऊया हे मिश्रण तयार करण्याची आणि वापरण्याची योग्य पद्धत.

मेंदीमध्ये मिसळा या ५ गोष्टी

पांढऱ्या केसांवर मेंदी लावण्यापूर्वी त्यामध्ये काही घरगुती गोष्टी मिसळता येतात. या गोष्टींमुळे मेंदीच्या रंगात आणि रंगछटेत बदल होण्यास मदत होऊ शकते.

मेथीदाणे : मेंदीच्या मिश्रणात एक चमचा मेथीदाणे वापरू शकता.

लवंग : ७ ते ८ लवंगा घातल्याने काढ्याला छान सुगंध येतो.

चहापत्ती : मिश्रणात दोन चमचे चहापत्ती घाला. यामुळे मेंदीचा रंग अधिक गडद होण्यास मदत मिळू शकते.

बीट : एक वाटी किसलेले बीट मिसळा. यामुळे केसांना हलकी लालसर छटा येऊ शकते.

कॉफी पावडर : मेंदीमध्ये थोडी कॉफी पावडर मिसळल्याने केसांच्या रंगाला तपकिरी छटा येऊ शकते.

घरच्या घरी अशा प्रकारे तयार करा नैसर्गिक हेअर कलर : सर्वप्रथम एका पॅनमध्ये दोन ग्लास पाणी घ्या. त्यामध्ये एक चमचा मेथीदाणे, ७ ते ८ लवंगा, दोन चमचे चहापत्ती आणि एक वाटी किसलेले बीट घाला. आता हे पाणी मंद आचेवर साधारण १० मिनिटे उकळू द्या. पाणी चांगले उकळल्यानंतर गॅस बंद करा आणि ते थंड होऊ द्या.

यानंतर हे पाणी गाळून वेगळे ठेवा. आता एका भांड्यात आवश्यकतेनुसार मेंदी पावडर घ्या आणि त्यात थोडी कॉफी पावडर मिसळा. तयार केलेला काढा हळूहळू मेंदीमध्ये घाला आणि चांगले एकजीव करत राहा. यामुळे घट्ट आणि गुळगुळीत पेस्ट तयार होईल.

लोखंडी भांड्यात ठेवल्यास रंग होऊ शकतो गडद

तुम्हाला मेंदीची रंगछटा अधिक गडद करायची असेल, तर तयार केलेली पेस्ट काही तास लोखंडी भांड्यात ठेवू शकता. त्यानंतर ही पेस्ट केसांना लावण्यासाठी वापरा. मात्र, मेंदीचा रंग केसांवर कसा येईल, हे प्रत्येक व्यक्तीच्या केसांचा नैसर्गिक रंग, केसांची स्थिती आणि मिश्रणाचे प्रमाण यावरही अवलंबून असते.

केसांना मेंदी लावण्याची योग्य पद्धत

मेंदी लावण्यापूर्वी केस चांगल्या प्रकारे धुऊन कोरडे करा. आता केसांचे छोटे-छोटे भाग करा आणि ब्रश किंवा हातांच्या मदतीने मेंदीची पेस्ट केसांच्या मुळांपासून ते लांबीपर्यंत लावा. केसांचा कोणताही भाग सुटणार नाही, याची काळजी घ्या. यानंतर मेंदी साधारण २ ते ४ तास केसांवर राहू द्या. ठरलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर केस साध्या पाण्याने चांगले धुऊन घ्या.

पहिल्यांदा वापरण्यापूर्वी हे काम नक्की करा

घरगुती पदार्थांपासून तयार केलेले मिश्रण प्रत्येकाच्या त्वचेसाठी सुरक्षित असेलच, असे नाही. त्यामुळे पहिल्यांदा हे मिश्रण लावण्यापूर्वी हातावर किंवा कानामागील त्वचेवर पॅच टेस्ट नक्की करा. खाज, जळजळ, लालसरपणा किंवा सूज यांसारखा त्रास जाणवल्यास त्याचा वापर करू नका.

एक महत्त्वाची गोष्ट : मेंदी आणि या घरगुती पदार्थांमुळे पांढऱ्या केसांच्या रंगछटेत बदल होऊ शकतो. मात्र, यामुळे केस पुन्हा नैसर्गिकरीत्या काळे होत नाहीत किंवा केस पांढरे होण्याची प्रक्रिया थांबत नाही. कमी वयात केस वेगाने पांढरे होत असतील, तर त्यामागे पोषणाची कमतरता किंवा इतर कारणे असू शकतात. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे अधिक योग्य ठरते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT