Marathi Theatre Revolution, Pudhari
फीचर्स

History of Theatre : फिरत्या रंगमंचला 63 वर्षे, अशी सुचली संकल्पना; नाट्यक्रांतीचा इतिहास वाचा

मराठी रंगभूमीवर 'तो मी नव्हेच' या प्रसिद्ध नाटकाद्वारे ८ ऑक्टोबर १९६२ रोजी पहिल्यांदाच फिरत्या रंगमंचाचा वापर करण्यात आला,

पुढारी वृत्तसेवा

Marathi Theatre Revolution

अंजली राऊत

नाशिक : मराठी रंगभूमीवर 'तो मी नव्हेच' या प्रसिद्ध नाटकाद्वारे ८ ऑक्टोबर १९६२ रोजी पहिल्यांदाच फिरत्या रंगमंचाचा वापर करण्यात आला, कोल्हापूरच्या म्हादबा मिस्त्री यांनी हा रंगमंच बनवला होता. नाटक सुरू असताना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी, विशेषतः फ्लॅशबॅक तंत्रासाठी फिरता रंगमंचा वापर केला गेला, ज्यामुळे दृश्यबदल करणे वेगवान झाले. हे तांत्रिकदृष्ट्या प्रगत तंत्रज्ञान मराठी नाट्यसृष्टीत मैलाचा दगड ठरला आहे. ज्यामुळे 'तो मी नव्हेच' आणि मराठी नाट्यविश्वातील फिरत्या रंगमंचाचा ऐतिहासिक क्षण बनला आहे. त्यावेळी पंचवीस हजार प्रेक्षकांनी हा 'फिरता रंगमंच' पाहून आश्चर्यचकित होऊन टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला.

नाटक चालू असताना एका ठिकाणातून दुसर्‍या ठिकाणावर जाणे व क्षणार्धात एका रंगमंचावर अनेक रंगमंचाच्या प्रतिकृती उभ्या करणे, हे फिरत्या रंगमंचाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. पूर्वी फिरत्या रंगमंचाचा व्यास हा तब्बल सव्वीस फूटांचा होता. त्याला बेचाळीस चाके लावलेली असायची. त्यासाठी राईस मिलचे शंभरसव्वाशे किलोचे लोखंडी छोटे व्हिल वापरत असत. रंगमंचावर तीन भाग करून तीन वेगवेगळी दृश्ये दाखवण्यासाठी त्यांचा वापर केला जात असे. तो रंगमंच दृश्यबदल दाखवण्यासाठी फिरवण्यास तीन माणसांची गरज असायची. काही वर्षांनंतर त्यात थोडा बदल करून, व्यासाचा आकार कमी करून चोवीस फूटांचा करण्यात आला. आता लोखंडी चाकांऐवजी रबरी चाके वापरण्यात येतात. त्यामुळे दृश्यबदल करण्यासाठीचा त्रास थोडा कमी झाला आहे.

या नाट्यासाठी वापरला गेला फिरता रंगमंच

'तो मी नव्हेच', 'अश्रूंची झाली फुले', 'माझं कुंकू मीच पुसलं', 'आत्महत्या', 'नवरे झाले बावरे' अशा नाटकांसाठी फिरता रंगमंच वापरल्याची माहिती प्रा. सदानंद बोरकर यांनी दिली.

असा आहे उपयोग

- नाविन्यपूर्ण दृश्यांची निर्मिती व वेगवान दृश्यबदल.

- एकाच वेळी अनेक जागा प्रेक्षकांच्या नजरेसमोर आणणे शक्य.

- यांत्रिक सोयीमुळे नाट्यप्रयोगाचे स्वरूप अधिक भव्य झाले.

- 'तो मी नव्हेच' मध्ये पाच वेगवेगळ्या भूमिका आणि कोर्टाचे दृश्य दाखवण्यासाठी या तंत्राचा प्रभावीपणे वापर झाला.

झाडीपट्टीतही करण्यात आले नाट्यप्रयोग

झाडीपट्टीतील एकमेव फिरता रंगमंच प्रा. सदानंद बोरकर यांच्या व्यंकटेश नाट्य रंगभूमी (नवरगाव) यांनी तयार केलेला आहे. फिरत्या रंगमंचाची संकल्पना पस्तीस ते चाळीस वर्षांपूर्वीची असल्याचे ते सांगतात. छोटुभाई मिस्त्री यांनी त्या रंगमंचाचे काम केले, तर दागोबाजी लोखंडे यांनी त्याचे लाकडी काम केले होते. फिरता रंगमंच मराठी रंगभूमीच्या इतिहासात तांत्रिक प्रगतीचे प्रतीक मानला जातो.

फिरता रंगमंचसाठी अशी सुचली संकल्पना

नाटकातील 'फ्लॅश-बॅक' तंत्रासाठी एका स्टेजचे दोन भाग करून अर्धगोलाकार पडद्यांचा उपयोग केला जायचा. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवता येणारा 'पोर्टेबलट' रंगमंच त्याकाळी जगात कुठेच नव्हता. प्रभाकर पणशीकरांनी नेपथ्यभीष्म पु. श्री. काळे यांना अशा 'पोर्टेबल' फिरत्या रंगमंचाची कल्पना सांगितली. ते तसे जुन्या जमान्यातले असले तरी त्यांना नावीन्याचं कुतूहल अन् कौतुक होते. थोडा विचार करून ते म्हणाले, 'साधारण २२ फुटांच्या परिघाचं स्टेज बनवलं तर ते कुठेही लागू शकेल.' पणशीकरांनी दुसऱ्याच दिवशी मुंबईच्या चोरबाजारांत एक फेरी मारली. जुगारात वापरला जाणारा गोलाकार पुठ्ठा, खेळण्यातल्या गोलाकार फिरणाऱ्या रेल्वेचे रूळ, हॉस्पिटलमध्ये वापरल्या जाणाऱ्या ट्रेखालची दहाबारा छोटी चाकं, काही नट-बोल्ट्स, आस करण्याकरता लागणारा छोटा अर्धा इंच जाडीचा रॉड अशी सामग्री जमवून पणशीकर घरी आले. एका मोठ्या पाटावर ते सारं मनातल्या कल्पनेप्रमाणे फिट केलं, अन् हँडलने फिरवल्यावर गोलाकार पुठ्ठा जात्यासारखा गोलाकार फिरू लागला!

फिरता रंगमंच असा प्रत्यक्षात अवतरला

मुंबईतल्या काही इंजिनीयर्सना ते 'मॉडेल' दाखवलं. 'पूर्वी कधी न झालेलं कसं जमणार अशी शंका मनात घेऊन आचार्य अत्रे कोल्हापूर येथील 'विश्वास इंजिनीयरिंग' मध्ये ते मॉडेल घेऊन गेले. फिरत्या रंगमंचाची ही किमया मुंबईत भल्याभल्यांना जमली नाही, ती कोल्हापूरच्या म्हादबा मिस्त्रींच्या 'विश्वास इंजिनियरिंग वर्क्स'ने केली. म्हणून अत्र्यांनी या सर्वार्थानं 'फिरत्या' रंगमंचाचं नामकरण केलं 'विश्वास रंगमंच'! या कामाचा 'विश्वास इंजिनियरिंग वर्क्'ने एक पैसाही न घेता त्यांनी तो रंगमंच अत्रे यांना भेट म्हणून दिला.

मोहन वाघ आणि प्रभाकर पणशीकर यांनी खऱ्या अर्थाने फिरत्या रंगमंचचा प्रभावीपणे वापर केला आहे. पण अनेकांनी फिरत्या रंगमंचसाठी काम करण्यास धाडस दाखविले नाही. नेताजी भोईर यांच्यासोबत काम केले, त्यावेळी आम्ही ट्राली लावून तो रंगमंच 'ठासून झालंच पाहिजे' असा एक गाव आणि तमाशा असा सेट लावून त्यावेळी आम्ही असे धाडस केले होते. पण प्रभाकर पणशीकर यांच्यासारखा तो प्रयोग आजपर्यंत कोणालाही करता आला नाही. त्यासाठी बेरींग आणि सरकवणारे लागणारे तंत्र खर्चिक वाटते. नाशिकमध्ये १९८४-८५ मध्ये सरकता रंगमंच, डबल मजली रंगमंच असे काही प्रयोग झाले, पण काही नाटकांना फिरता रंगमंचाचे हे तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ परवडणारे नसल्याने पुन्हा तसे काम होऊ शकले नाही, त्यामुळे पणशीकर यांच्या त्या नाट्यासाठी खरोखर सलाम आहे.
- श्याम लोंढे, कलादिग्दर्शक
साठ वर्षांपूर्वी प्रभाकर पणशीकर यांनी आणलेल्या फिरत्या रंगमंचाचा जोरदार स्वागत झाले. क्षणात सेट बदलून दृश्यबदल व्हायचा. फिरत्या रंगमंचाची संकल्पनाच खूपच चांगली होती. १९८४-८५ मध्ये जागरण गोंधळातील 'खंडोबाचं लगीन' हे नाटक सादर केलं होतं. पण त्यावेळी आम्ही विविध स्थळ दाखवण्यासाठी वेगवेगळे पडद्यांचा वापर केला होता. जसे की, खंडोबा पहाडवरची देवळी, जंगल, बानूबाईचा वाडा, धनगरवाडा हे सगळे प्रसंग वाघ्या मुरळी सादर करताना पडदे वापरण्यात आले होते. 'खंडोबाचं लगीन' या नाटकाला तीस वर्षे पूर्ण झाली असून नाशिक मायकोच्या कलावंतांसोबत राज्यनाट्यमध्ये सादर करण्यात आले होते. प्राथमिकपासून तर कामगार आणि महाराष्ट्र नाट्यपर्यंत प्रथम क्रमांकासोबत खूप गाजले. त्यानंतर या २० वर्षात तर मी फिरता रंगमंच बघितलेलाच नाही.
- प्रा रवींद्र कदम, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नाशिक
बाबूराव पेंटर यांनी फिरता रंगमंच वापरलेला आहे. 'तो मी नव्हेच' त्यानंतर 'संत गोरा कुंभार' या नाटकामध्ये फिरता रंगमंच हा 'गिमिक' म्हणून वापरला. चमत्कृतीपूर्ण प्रसंगांसाठी 'गिमिक' वापरले जाते, त्यानंतर मुंबईच्या कमर्शियल नाटकासाठी तसेच १९८५-८६ नाशिकमध्ये कालिदास येथे वि. वा. शिरवाडकर लिखित 'आनंद' हे नाटक सादर करण्यात आले होते. त्यामध्ये मी काम केले आहे, तेव्हा पणशीकर यांनी वापरलेला फिरता रंगमंच हा मुंबई येथून मागवून वापरला गेला होता. त्यानंतर नॉव्हेलटी ड्रॅमॅटीक्सने नाटक सादर करताना कै. विवेक पाटणकर आणि नाना वडनगरे यांनी मिळून तयार केलेला फिरता रंगमंच वापरला होता. नाशिकमध्ये नेताजी भोईर यांनी देखील स्वत: फिरता रंगमंच तयार करुन वापरला होता. त्यावर आजही मुंबईसह विविध ठिकाणी प्रयोग सादर केले जात आहेत. पूर्वी मॅन्यूअली फिरवायला लागायचे आता मात्र मोटराईज्ड असणारे रंगमंच वापरले जात आहेत. 'सफरचंद' या नाटकामध्ये दोन फिरते रंगमंच वापरले गेले आहेत. नेपथ्य म्हणून फिरत्या रंगमंचाची गरज आता फारशा नाटकांमध्ये राहीलेली नाही. पूर्वी अनेक प्रसंगांची नाटके असल्याने सेट लावणे आणि काढणे ही गरज होती, म्हणून फिरत्या रंगमंचाची गरज निर्माण झाली होती.
- मुकुंद कुलकर्णी, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता आणि लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT