आज परदेशी कंपन्या भारतात ठिकठिकाणी आपली शाखा उघडत आहेत. या ठिकाणी क्लिनिकल रिसर्चमध्येदेखील डीफार्म झालेल्या विद्यार्थ्याची मोठी मागणी आहे.
औषधांच्या वितरणापासून पंकिंग, व्यवस्थापन, निर्मिती या सर्व गोष्टी फार्मास्युटिकल क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वाच्या बनल्या आहेत. या क्षेत्रात भारताची भागीदारी महत्त्वाची असून, जास्तीत जास्त कंपन्यांना येथे आपला उद्योग वाढवण्याची संधी मिळत आहे. दिवसेंदिवस या क्षेत्राचा विस्तार होत आहे. तसतशी या क्षेत्रात औषध विशेषज्ञ आणि औषध निर्मिती क्षेत्राशी निगडित लोकांची मागणी वाढतच आहे. ही गरज लक्षात घेऊन देशभरात कुशल आणि दक्ष फार्मासिस्ट तयार करण्यासाठी ठिकठिकाणी फार्मसी कॉलेजेस उघडले जात आहेत. यामध्ये पदवी, पदविका या अभ्यासक्रमासोबतच संशोधनाचे कामही अतिशय मोठ्या पातळीवर केले जात आहे.
कुठले औषध कुठल्या रोगाच्या इलाजासाठी प्रभावी ठरेल आणि त्याचा किती डोस घ्यावा लागेल, याबद्दलची माहिती डॉक्टरांना द्यावी लागते, हे काम विक्री आणि विपणनाशी निगडित असणारे या क्षेत्रातील विद्यार्थी अतिशय उत्तम पद्धतीने करत असतात, आज औषधांची निर्मिती करण्याचे काम वेगाने वाढत आहे. यामध्ये सामान्यपणे फार्मसीमधील पदवीका घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रोडक्शन सुपरवायजर म्हणून नोकरी मिळते. त्यांना क्वालिटी कंट्रोल मॅनेजर आणि प्रॉडक्शन मॅनेजर म्हणून काम करण्याची संधी दिली जाते. सरकारी आणि खासगी हॉस्पिटल, दवाखाने, नर्सिंग होम, यापासून हेल्थ सेंटरमध्येदेखील फार्मासिस्टचे काम याच विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. हे विद्यार्थी प्रमुख फार्मासिस्टदेखील बनू शकतात.
फार्मसी उद्योगामध्ये विपणन, विक्री, रिसर्च, निर्मिती आणि शास्त्रज्ञांची भूमिका दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणूनच नोकरीच्या चांगल्या संधी मिळाव्यात, यासाठी फार्मसी अभ्यासक्रमामध्ये विशेष प्रावीण्य मिळणेदेखील गरजेचे आहे. डीफार्म किंवा बीफार्म केल्यानंतर मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम करून औषधांच्या विपणनापासून वितरणापर्यंत आपली भूमिका निभावण्यासाठी येथे असंख्य संधी उपलब्ध आहेत. यामध्ये वैयक्तिक पातळीवर घाऊक दुकान सुरू करून चांगले उत्पन्न मिळवता येऊ शकते. बाजारपेठेत स्वतःचे विशिष्ट स्थान बनवण्यासाठी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आणि मार्केटिंग ऑफिसर या स्वरूपातदेखील काम करता येते. फार्मसी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून देखील उच्च स्तरावर काम करण्याची संधी या विद्याध्यर्थ्यांना मिळू शकते.
फार्मा क्षेत्रात प्रवेश घ्यायचा असल्यास दहावीपासूनच स्वतःला वैचारिक दृष्टीने तयार करावे लागते. कारण यामध्ये बारावीतील गुणांच्या आधारावरच प्रवेश दिला जातो. बारावीमध्ये जीवशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र इत्यादी विषय असणे आणि त्यामध्ये कमीत कमी ५० टक्के गुण असणे गरजेचे आहे. फार्मासी या क्षेत्राशी निगडित असणारा पदवीका अभ्यासक्रम हा दोन वर्षांचा आहे; तर बीफार्म हा पदवी अभ्यासक्रम बारावीनंतर चार वर्षाचा आहे.
पदव्युत्तर पातळीवर एमफार्म करताना त्यात स्पेशलायझेशन सुरू होते. यामध्ये विद्यार्थ्यांना फार्माकोलॉजी, फार्मास्युटीकल्स, हॉस्पिटल फार्मासी, क्वालिटी एन्शुरन्स, फार्मासिटीक्युल केमिस्ट्री क्लिनिकल रिसर्च, क्वालिटी इम्यूमेंट प्रोग्राम, फार्मासिटिकल मॅनेजमेंट आणि हर्बल ड्रग टेक्नॉलॉजी या क्षेत्रात विशेष रूपाने अधिक दक्ष आणि सक्षम बनवले जाते. पीएचडीमध्ये औषधे आणि इतर तत्सम निर्मितीसाठी संशोधनाचे काम करावे लागते.