पुणे : ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग अॅप्टिट्यूड टेस्ट अर्थात गेट परीक्षेचा निकाल आयआयटी रुरकीने जाहीर केला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थ्यांना त्यांचे गुणपत्रक थेट gate2026.iitg.ac.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना त्यांचा लॉगिन तपशील टाकून गुणपत्रक पाहता येणार आहे. गुणपत्रकात विद्यार्थ्याचे नाव, पालकाचे नाव, गेट २०२६ चे गुण, परीक्षेची तारीख, श्रेणी, अखिल भारतीय रँक आदी तपशील देण्यात आला आहे. यावर्षी, गेट परीक्षा आयआयटी रुरकीद्वारे ७, ८, १४ आणि १५ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात आली होती.
अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी गेट ही परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा दरवर्षी घेण्यात येते. या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एम.टेक, एम.ई. आणि पीएचडी यांसारख्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश दिला जातो. प्रवेश रँकच्या आधारावर दिला जातो. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाइट gate2026.iitg.ac.in ला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
गेट 2026 चा निकाल तपासण्यासाठी, सर्वप्रथम gate.iitr.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. वेबसाइटच्या होम पेजवर, 'कँडिडेट लॉगिन' या लिंकवर क्लिक करावे, यानंतर मागितलेला तपशील प्रविष्ट करून सबमिट करावे लागेल. आता गुणपत्रक स्क्रीनवर उघडेल, ते विद्यार्थ्यांना तपासता तसेच डाउनलोड करता येणार आहे.