Diwali 2026 : Buying Clay Lamps for Diwali? Be sure to check these 5 things to avoid fraud!
पुढारी ऑनलाईन : दिवाळीच्या सणासाठी मातीचे दिवे खरेदी करणार असाल, तर काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी नक्की घ्या. अनेकदा दिवे दिसायला सुंदर असतात; मात्र त्यांची गुणवत्ता खराब असते. त्यामुळे दिवे खरेदी करताना काही गोष्टी तपासणे गरजेचे आहे.
धनत्रयोदशी, दिवाळी आणि भाऊबीज या सणांच्या निमित्ताने मातीचे दिवे लावण्याची परंपरा आहे. दिवाळीच्या आठवडाभर आधीपासूनच बाजारात दिवे खरेदी करण्यासाठी गर्दी होऊ लागते. आजही अनेकजण साधे तसेच रंगीबेरंगी, आकर्षक रंगांनी सजवलेले मातीचे दिवे आवर्जून खरेदी करतात.
दिवाळीमध्ये दिवे लावणे शुभ मानले जाते. त्यामुळे तुम्हीही दिवे खरेदी करण्यासाठी बाजारात जाणार असाल, तर फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या. अनेकदा दिवे दिसायला चांगले असतात; पण त्यांना बारीक तडे गेलेले असतात किंवा त्यांची गुणवत्ता खराब असते. असे दिवे व्यवस्थित जळतही नाहीत. त्यामुळे दिवे खरेदी करण्यापूर्वी त्यांची गुणवत्ता तपासून घेणे महत्त्वाचे आहे. चला तर जाणून घेऊया, चांगल्या आणि मजबूत मातीच्या दिव्यांची ओळख कशी करावी.
चांगल्या आणि मजबूत मातीच्या दिव्यांची ओळख कशी करावी?
सर्वप्रथम दिव्याला तडे गेले आहेत का ते तपासा
मातीचा दिवा खरेदी करताना सर्वप्रथम त्याचा पृष्ठभाग काळजीपूर्वक तपासा. दिव्याला कोणत्याही प्रकारचे तडे, तुटलेला भाग किंवा कडांना तुकडे निघालेले नसावेत. अनेकदा दिव्याला अतिशय बारीक तडे गेलेले असतात, जे पहिल्या नजरेत सहज दिसत नाहीत. अशा दिव्यांमधून तेल गळण्याची किंवा वापरताना दिवा फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे नेहमी तडे नसलेले आणि व्यवस्थित असलेले दिवेच खरेदी करा.
दिव्याचा तळ सपाट असावा
दिवा खरेदी करताना त्याचा तळ म्हणजेच खालचा भागदेखील तपासून पाहा. दिव्याचा तळ सपाट असणे आवश्यक आहे. त्यामुळे तो जमिनीवर किंवा इतर कोणत्याही पृष्ठभागावर ठेवल्यानंतर डगमगणार नाही. वाकडा किंवा असमान तळ असलेले दिवे सहज कलंडू शकतात. त्यामुळे पेटता दिवा पडून अपघात होण्याचा धोका असतो.
दिवा व्यवस्थित भाजलेला असावा
मातीचा दिवा खरेदी करताना त्याच्या मजबुतीकडे विशेष लक्ष द्या. चांगल्या प्रकारे भाजलेला दिवा सामान्यतः मजबूत असतो. याउलट, कमी भाजलेला दिवा कमकुवत आणि ठिसूळ असू शकतो. असे दिवे लवकर तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे दिवा खरेदी करण्यापूर्वी त्याची बनावट आणि फिनिशिंग नीट तपासा. खूप कमकुवत किंवा हाताळताना मातीचा चुरा निघणारे दिवे खरेदी करू नका.
जास्त रंग आणि चमक असलेले दिवे खरेदी करणे टाळा
रंगीबेरंगी आणि चमकदार दिवे दिसायला खूप आकर्षक असतात. मात्र, ते खरेदी करताना त्यावर लावलेल्या रंगाच्या थराकडे लक्ष देणे गरजेचे आहे.विशेषतः दिव्याच्या आतील बाजूस पेंट, ग्लिटर किंवा कोणत्याही प्रकारचा चमकदार थर नसावा. तेल किंवा तूप घालून दिवा लावण्यासाठी नैसर्गिक, रंग न लावलेले मातीचे दिवे खरेदी करणे अधिक योग्य ठरते.
पाण्यात भिजवून दिव्याची गुणवत्ता तपासा
दिवे खरेदी करून घरी आणल्यानंतर त्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी एक सोपा उपाय करता येतो. एका टबमध्ये पाणी घेऊन त्यात दिवे अर्धा तास भिजत ठेवा. जर दिवा कमी पाणी शोषत असेल, तर तो चांगल्या गुणवत्तेचा असल्याचे मानले जाते. मात्र, दिवा जास्त पाणी शोषत असेल, तर तो कमी दर्जाचा असू शकतो. अशा दिव्यांमध्ये तेलही अधिक प्रमाणात शोषले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे दिवे खरेदी करताना या सर्व गोष्टींची खात्री करूनच योग्य आणि चांगल्या दर्जाचे मातीचे दिवे निवडा.