नाशिक : अगोदर खोटे दस्तऐवज तयार करून बेकायदेशीर निविदा प्रक्रिया राबवत एक कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्याविरुद्ध भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी प्रदीप रतन अहिरे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार तत्कालीन कार्यकारी अभियंता शैलजा नलावडे यांनी बांधकाम विभागात कार्यरत असताना कार्यालयातील इतरांच्या मदतीने ४ डिसेंबर २०२४ ते ५ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत शासन निर्णय (डीटीएस २०२४/०६/प्र.क्र.१२०/पर्यटन-१ चा) ८ ऑगस्ट २०२४ हा बनावट तयार केला. त्याद्वारे एक काेटी रुपयांची पर्यटनस्थळ पायाभूत सुविधा पुरविण्यासाठीच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे भासवून सदरचा बनावट शासन निर्णय बेकायदेशीरपणे शासकीय दस्तांवर नोंदवून खोटे दस्तऐवजज तयार केले. तसेच त्याची निविदा प्रसिद्ध करून शासकीय अधिकाऱ्यांची दिशाभूल व फसवणूक करून बेकायदेशीरपणे निविदा प्रक्रिया राबविली. कनिष्ठ प्रशासन अधिकारी प्रदीप अहिरे यांनी बुधवारी (दि. १८) रात्री याबाबतची फिर्याद भद्रकाली पोलिसांत दाखल केली असून, पाेलिसांनी कार्यकारी अभियंता शैलजा नलावडे यांच्याविराेधात फसवणूक व बनावट दस्तऐवज तयार करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक मोहिते तपास करीत आहेत. दरम्यान, यापुढेही जिल्हा परिषदेत शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने काम केल्याचे आढळल्यास संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली.
जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्रमांक तीनच्या वादग्रस्त कार्यकारी अभियंता नलावडे यांना मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी जि. प. सेवेतून कार्यमुक्त करीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मूळ प्राधिकरणाकडे पाठवले होते. नलावडे यांनी खोट्या प्रशासकीय मान्यतेची खातरजमा न करता तांत्रिक मान्यता देणे, टेंडर प्रक्रिया राबवणे या कारणांमुळे जिल्हा परिषदेने त्यांच्या निलंबनाची कारवाई प्रस्तावित करून त्यांचे अधिकार काढून घेतले होते.