Shocking! online gambling among teenage students
नाशिकरोड : मोबाइल अॅपवर ऑनलाइन जुगार खेळताना पैसे हरल्याच्या नैराश्यात नाशिकरोडला एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने बुधवार (दि.9) सकाळी ८.३०च्या सुमारास घरातच गळफास घेत जीवनयात्रा संपवल्याची धक्कायदायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्टिलरी सेंटर रोडजवळील डायमंडनगर परिसरात राहणाऱ्या सम्राट संदीप भालेराव (वय 16) हा मुलगा गेले काही महिने मोबाइलमध्ये ऑनलाइन ॲपवर जुगार खेळत होता. या खेळामध्ये पैसे हरल्यामुळे तो गेल्या दोन-तीन दिवसांपासून तणावात होता. सकाळी आई बाहेर गेलेली होती. तसेच्या त्याच्या दोन बहिणीही बाहेर गेल्या असताना त्याने बेडरूममध्ये फॅनला गळफास घेत आत्महत्या केली. काका ज्ञानेश्वर आनंद भालेराव घरी आले असता त्यांना तो बेशुध्दावस्थेत आढळला. त्यांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात तो आईच्या मोबाइलवर ऑनलाइन गेम खेळायचा. तो त्यात सतत हरत गेल्याने तणावात होता. पैसे गमावल्यानंतर याची माहिती घरातील कोणालाही मिळू नये, म्हणून तो त्यातील ऑनलाइन माहिती सतत डिलीट करायचा. पोलिसांनी तपासासाठी हा मोबाइल ताब्यात घेतला असून, त्याने किती पैसे गमावले आणि केव्हापासून हा गेम खेळत होता, याचा तपास सुरू केला आहे. हा संपूर्ण डेटा मिळविण्यासाठी किमान दोन दिवस लागतील, अशी माहिती उपनगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयंत शिरसाठ यांनी दिली. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.Online Gambling
सम्राट हा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झालेले आहे. गरीब कुटुंबाच्या भविष्याचा आधारच हरपल्याने भालेराव कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अल्पवयीन मुलांमध्ये सध्या मोबाइल गेम्स आणि ऑनलाइन जुगाराचे व्यसन झपाट्याने वाढत असून, याचे गंभीर परिणाम आता दिसू लागले आहेत. ऑनलाइन जुगाराच्या आहारी गेलेल्या सम्राटला जेव्हा आर्थिक नुकसान सहन करावे लागले, तेव्हा त्याने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला. 'ऑनलाइन गेमच्या आड जुगार खेळवणाऱ्या अॅप्सवर बंदी का घातली जात नाही?', असा संतप्त सवाल सम्राटच्या नातेवाइकांनी यावेळी केला आहे.
सध्या झटपट पैसे कमवण्यासाठी मुले व सुशिक्षित तरुण हे ऑनलाइन गेमकडे वळत आहेत. अभ्यासाच्या नावाखाली मोबाइल घेऊन ते पालकांची दिशाभूल करतात आणि सर्रासपणे जुगार खेळतात. जुगार हारल्यानंतर नैराश्यातून चोरी, लूटमार, लबाडी असे दुर्गुण त्यांना लागतात. पालकांनी आपल्या मुलांमुलींवर सतत लक्ष ठेवणे अतिशय गरजेचे आहे.जयंत शिरसाठ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, उपनगर, नाशिक