सिडको (नाशिक) : दारू पिण्यासाठी पैसे दिले नसल्याने घर जाळल्याची धक्कादायक घटना सिडकोतील उत्तमनगर येथील भगवती चौकात घडली. याप्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयिताला ताब्यात घेतले आहे. आरोपीचे नाव सुरेश पांडूरंग काळे (वय ४५) असे आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मंदाकिनी संतोष काळे (वय ४३) यांचे उत्तमनगरात भगवती चौकात दोन मजली घर आहे. तळमजल्यावर दिर संशयित सुरेश काळे हा एकटाच राहतो. तर फिर्यादी पहिल्या मजल्यावर राहतात. संशयित सुरेश हा दारू पिण्यासाठी कायम पैसे मागायचा.
सोमवारी (दि.4) सुरेश दुपारी साडेतीनच्या सुमारास वरच्या मजल्यावर येत त्याने दारूसाठी पैसे मागितले. पैसे देण्यास नकार देताच तो खाली उतरला व घरासमोर दुचाकीत असलेले पेट्रोल काढून घराला आतुन आग लावली व कुलूप लावून बाहेर निघुन गेला. घरातून धुर बाहेर पडल्यानंतर घटनेची माहिती अग्निशामक दल व पोलिसांना देण्यात आले. अग्निशामक दलाने धाव घेत आग विझवली. परंतु आगीत घरातील सोपा, फर्निचर, कपाट, कपडे, गादया जळून नुकसान झाले. याप्रकरणी अंबड पोलिसांनी संशयित सुरेश काळेवर गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रताप गिरी करत आहेत.