'गुलाबी गंडा'...! पैसा तो पैसा गेला आणि शेवटी हाती काय..?  pudhari photo
क्राईम डायरी

'गुलाबी गंडा'! पैसा तो पैसा गेला आणि शेवटी हाती काय? प्रेमाच्या बनवाबनवीपासून सावध राहा

Valentine Day : 'गुलाबी गंडा'...! पैसा तो पैसा गेला आणि शेवटी हाती काय..?

पुढारी वृत्तसेवा

आशिष शिंदे, कोल्हापूर

व्हॅलेंटाईन आठवडा सुरू झाला की, सिंगल मंडळींना जणू एक नवीन उमेद मिळते. अनेकांच्या मनात निदान यंदा तरी कुठं ना कुठं आपलं ‘सेटिंग’ होईल, अशी गुलाबी आशा पिंगा घालू लागते. परिणामी, गुलाब दिनाच्या आदल्या रात्रीपासूनच डेटिंग अ‍ॅप्सवर चहल-पहल वाढते. प्रत्येक जण आपल्या ‘परफेक्ट मॅच’च्या शोधात असतो; पण प्रेमाच्या या ऑनलाईन दुनियेत फक्त गुलाबच नाहीत, तर फसवणुकीचे अपरंपार काटेसुद्धा पसरलेले आहेत, याची अनेक ‘गुलाबरावांना’ आणि ‘गुलाबोंना’ माहितीच नसते. अशा डेटिंग अ‍ॅप्सवर चॅटिंगमधून सेटिंगच्या मोहात अनेक तरुण-तरुणी अडकत चालल्या आहेत. प्रेमाचं गाजर दाखवून लाखो रुपयांचा गंडा घातला जात आहे. पैसा तो पैसा गेला आणि शेवटी हाती काय..? यामुळे या आभासी जगात प्रेमाच्या बनवाबनवीपासून जरा सावधच राहा.

झपाट्याने ऑनलाईन झालेल्या या जगात आता चोर्‍याही ऑनलाईन होऊ लागल्या आहेत. सध्या सायबर गुन्हेगारीचा अक्षरशः सुळसुळाट सुरू आहे. यात प्रेम तरी कसे मागे राहील. ऑनलाईन प्रेमाच्या बहाण्याने हजारो तरुण-तरुणींना लाखोंचा गंडा घातला जात आहे. परिणामी, या गंडलेल्या प्रेमीजनांना डिप्रेशनचा सामना करावा लागत आहे. सध्या ऑनलाईन अनेक डेटिंग अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. या अ‍ॅपच्या आकर्षक जाहिरातींना तरुण-तरुणी भुलतात आणि एक टच वर फोनमध्ये अ‍ॅप डाऊनलोड होते. मग सुरू होतो, सुपर लाईक, स्वाईप राईट आणि हाय ब्युटिफुलचा खेळ. यामध्ये काहींना खरंच चांगले मित्र किंवा पार्टनर भेटतातही; पण काहींच्या वाट्याला येतो फक्त आणि फक्त स्कॅम.

आता हे घडतं कसं तर, या अ‍ॅप्सवर एखादे आकर्षक प्रोफाईल दिसते. मग काय... प्रोफाईलमधील फोटो लाईक मारले जातात, गुलाबाची ईमोजी पाठवली जाते. काही वेळातच आकर्षक प्रोफाईल कडूनही इमोजीने मेसेजला रिप्लाय येतो. अशावेळी वाटते बस्स! खेळ जमला! पण हळूहळू ती व्यक्ती तुम्हाला ऑनलाईन स्कॅममध्ये अडकवत असते. अगदी थोडं चॅटिंग झालं की, कोणत्या ना कोणत्या बहाण्यांनी पैसे मागायला सुरुवात होते. फोन बिघडला आहे, रिचार्ज करायचाय, घरच्यांना मदत करायची आहे, एक गिफ्ट घ्यायचंय; पण कार्ड ब्लॉक झालंय. तुम्ही त्यावर विश्वास ठेवता आणि ऑनलाईन मदत करता. याच विश्वासाचा फायदा घेऊन काही दिवसांनी एक लिंक पाठवली जाते, या लिंकवर क्लिक करून माझ्या त्या फॉर्मचे पैसे पाठव, असे सांगितले जाते. रक्कम ही अगदी थोडक्यात असते. यामुळे तुम्ही चटकन लिंक वर क्लिक करता आणि पैसे पाठवता; पण या लिंकवर क्लिक करून पैसे पाठवताच तुमच्या बँक खात्याची तुमच्या यूपीआय पिनसह सर्व माहिती त्याच्याकडे पोहोचते आणि तुमचे अकाऊंट शून्य होते !

याशिवाय ऑनलाईन डेटिंग अ‍ॅपवर फेक प्रोफाईलचा फंडा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. काही स्कॅमर्स सुंदर मुलींचे किंवा हॅण्डसम मुलांचे फोटो वापरून प्रोफाईल बनवतात. मग प्रेमाच्या गोष्टी सुरू होतात. या प्रेमाच्या गोष्टी क्षणार्धात न्यूडीटीकडे वळतात. स्क्रीन रेकॉर्डिंगच्या साह्याने आपला व्हिडीओ रेकॉर्ड केला जातो. फोन ठेवताच आपलाच न्यूड व्हिडीओ आपल्यालाच पाठवला जातो. इतके-इतके पैसे दे, नाहीतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली जाते आणि लाखो रुपयांचा गंडा घातला जातो. अशा प्रकारांना शहरातील अनेक तरुण-तरुणी बळी पडले आहेत.

हे’ करणे टाळाच!

फेक प्रोफाईल ओळखा. त्या प्रोफाईलचे फोटो गुगलवर रिव्हर्स सर्च करून पाहा. मोजकेच फोटो आणि माहिती नसलेल्या प्रोफाईल्सपासून सावध राहा. एखादी व्यक्ती लवकरच लव्ह इमोजी पाठवत असेल, तर जरा जपूनच. पैसे मागण्यासाठी कोणती लिंक पाठवली असल्यास अशा लिंकवर कधीही क्लिक करू नका. प्रेमाचा गुलाब देताना, फसवणुकीचे काटे टोचणार नाहीत, इतकीच काळजी घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT