मिरा रोड (ठाणे) : व्हिसा, विमानांचे तिकीट देतो सांगत पावणे चार लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. तक्रारदारांनी ओमानला जाण्यासाठी पर्यटक व्हिसा व विमानांच्या तिकिटाची व्यवस्था करण्याची जबाबदारी कंपनीच्या चालक मालक यांना दिली होती. मात्र त्यांनी तिकिटाची व्यवस्था न करता पावणे चार लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी मिरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार यांनी सिलचर पोलीस ठाणे, जि. काचरा, आसाम येथील पोलीस ठाण्यात झिरो एफआयआरनुसार तक्रार दिली होती. त्यानुसार झिरो एफआयआरने दाखल होऊ न मिरा रोड पोलीस ठाण्यात आला आहे.
तक्रारदार वजाहतुल्ला तमीलउददीन, रा- श्रीकोन यांनी टॅव्हल्सचे चालक, मालक यांच्याकडे ओमानला पर्यटक व्हिसा आणि विमानांचे तिकीटाची व्यवस्था करण्याची जबाबदारी दिली होती. 15 मे ते 4 जुलै दरम्यान कंपनीच्या मालकाने तक्रारदार यांच्याकडून यु.पी.आय द्वारे 3,77,916 रुपये घेतले.
दरम्यान संबंधितांनी पाठवलेले पर्यटनाचे व्हिसा आणि विमानांची तिकीटे ही वैध नसल्याचे तक्रारदार यांना समजले तेव्हा तक्रारदार यांनी एअरलाईन अधिकार्याशी सपंर्क साधला. याबाबत चौकशी केली असता त्यावेळी पाठवलेले व्हिसा व विमानाची तिकिटे खोटी असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकरणातील तक्रारदार यांनी कंपनीचे चालक, मालक युसुफ यांच्याशी संपर्क केला असता त्याने खोटे आश्वासन दिले व फोन बंद करून तक्रारदार याची फसवणूक केली. याप्रकरणी युसुफ यांच्या विरुद्ध मिरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि संतोष सांगविकर हे करत आहेत.