डोंबिवली : भर रस्त्यावर गाठून लूटमार करण्याच्या घटना घडत असतानाच डोंबिवली पूर्वेकडील टिळक रोड या रहदारीच्या आणि गजबजलेल्या रस्त्यावर थरारक घटना घडल्याचे समोर आले आहे. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास दोघा लुटारूंनी एटीएममध्ये गेलेल्या एकाला चाकूचा धाक दाखवत, तसेच लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत लुटले. त्याला सोडविण्यासाठी मधे पडलेल्या पादचाऱ्याला देखिल झोडपून लुटल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. मात्र पोलिसांनी अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी धाव घेऊन दोघा बदमाशांची जागीच गठडी वळली.
डोंबिवली पूर्वेकडील सावरकर रोड परिसरात राहणारे राहूल चौरासिया हे शनिवारी रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास टिळक रोडने पायी जात होते. याचवेळी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेच्या एटीएममध्ये दोघे बदमाश एकाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील रोकड हिसकावण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले. सदर इसम मदतीसाठी ओरडत असल्याने राहूल व त्यांचे मित्र राघव या दोघांनी लुटारूंना रोखण्याचा प्रयत्न केला.
लुटारूंच्या तावडीतून सदर इसमाला सोडण्यासाठी गेलेल्या राहूल यांना देखील चाकूचा धाक दाखवत त्यांच्या खिशातील दोन हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. शिवाय लुटारूंनी अनोळखी व्यक्तीच्या खिशातून देखील दोन हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. याच दरम्यान जागरूक डोंबिवलीकर प्रदिप भणगे यांनी तात्काळ या घटनेची माहिती डोंबिवली पोलिसांना दिली. रामनगर पोलिस ठाण्याच्या गस्त घालणाऱ्या पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही लुटारूंना ताब्यात घेतले. प्रदिप भणगे यांच्या सतर्कतेमुळे दोघेही बदमाश पोलिसांच्या हाती लागले. त्यामुळे पोलिसांनी भणगे यांच्या हजरजबाबीपणाचे कौतुक केले.
तेजस देवरूखकर आणि सुजित थोरात अशी अटक करण्यात आलेल्या लुटारूंची नावे आहेत. कल्याण कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांना अधिक चौकशीसाठी पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हे दोघेही बदमाश कल्याण-शिळ महामार्गावरील सोनारपाडा परिसरात राहणारे आहेत. या दोघांविरोधात यापूर्वी देखिल गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यापूर्वी देखिल अशा पद्धतीने लूट केल्याचा संशय असून पोलिस त्यांचा कस्सून तपास करत आहेत.