

डोंबिवली : मुंबई पोलिस दलात अधिकारी असल्याच्या थापा मारून ठाण्यात राहणाऱ्या एका बदमाशाने कल्याणकर तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून लुबाडल्याचे पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीतून उघकिस आले आहे.
तरूणीकडून साखरपुडा व इतर कारणांसह रोख रक्कम असा एकूण ७० हजार रूपयांचा ऐवज उकळणाऱ्या ठाण्यातील या तोतया पोलिस अधिकाऱ्याच्या विरोधात तरूणीने महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात शुक्रवारी (दि.25) तक्रार दाखल केली आहे. गेल्या महिनाभरात हा सारा प्रकार घडला आहे.
यातील ३२ वर्षांचा तोतया पोलिस अधिकारी ठाण्यातील कॅडबरी जंक्शन परिसरात राहणारा आहे. तर कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी भागात राहणारी ३० वर्षीय पिडीत तरूणी कल्याण रेल्वे स्थानक भागातील एका व्यापारी संकुलातील कार्यालयात नोकरी करते. या संदर्भात पिडीत तरूणीने पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की आपली ठाण्यातील एका व्यक्ती बरोबर ओळख झाली होती. या व्यक्तीने आपण मुंबई पोलीस दलातील कुलाबा गुन्हे अन्वेषण शाखेच्या कार्यालयात सहाय्यक पोलिस निरीक्षक असल्याचे सांगितले होते. तरूणी अपेक्षित वराच्या प्रतिक्षेत होती. तथापी या व्यक्तीने आपण तोतया पोलिस अधिकारी असल्याचे तरूणीला दाखवून दिले नाही. हा इसम तरूणीच्या कार्यालयात कधी साध्या वेशात, तर कधी पोलिसी गणवेशात जात असे. या इसमाने तरूणी कार्यरत असलेल्या कार्यालयात सतत जाऊन ओळख वाढवली. संवाद साधून तिचा विश्वास संपादन केला. विश्वास संपादन केल्यानंतर सदर इसमाने तरूणीला लग्नाची मागणी घातली.
पोलिस खात्यामध्ये सरकारी नोकरी करणारा वर मिळत असल्याने पिडीत तरूणीने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर इसमाने तरूणीचे नातेवाईक, मित्र मंडळींना आपण मुंबई पोलिस दलात सहाय्यक पोलिस निरीक्षक असल्याचे वातावरण निर्माण केले. हा इसम पिडीत तरूणी आणि नातेवाईकांसमोर पोलिसी रूबाबात वावरत होता. या इसमाच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन तरूणीने त्याच्या सोबत लग्नाला संमती दिली. त्यानंतर लग्नाच्या प्रक्रिया पार पाडण्यासाठी पिडीत तरूणीकडून साखरपुड्याचे निमित्त करून चार ग्रॅम वजनाची सोन्याची ४० हजार रूपये किंमतीची अंगठी या इसमाने उकळली. त्यानंतर अन्य कामांसाठी ३० हजार रूपये उकळले. या सगळ्या प्रकारानंतर तरूणीने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावला. मात्र वेगवेगळी कारणे सांगून हा भामटा तरूणीला उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला.
काही दिवसांनी त्याने पिडीत तरूणीच्या संपर्काला उत्तर देण्यास टाळाटाळ सुरू केली. पोलिस अधिकारी असल्याच्या थापा मारणाऱ्या भामट्याकडे तीन मोबाईल होते. हे तिन्ही मोबाईल नंतर बंद येऊ लागले. आपली फसवणूक करणारा इसम तोतया पोलिस अधिकारी असल्याची खात्री पटल्यानंतर पिडीत तरूणीने त्याला अद्दल घडविण्यासाठी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. अद्याप या भामट्याला अटक करण्यात आली नसून सहाय्यक पोलिस निरीक्षक भुजबळ आणि त्यांचे सहकारी त्या भामट्याचा शोध घेत आहेत.