ठाणे : नागरिकांच्या अंगावरील सोनसाखळी खेचून पोबारा करणाऱ्या इराणी टोळीतल्या दोघा अट्टल चोरट्यांना तर दरोडा, घरफोडी आदी गुन्हे करणाऱ्या शिकलगार टोळीतील दोघांना वेगवेगळ्या गुन्ह्यात ठाणे गुन्हे शाखेच्या कल्याण युनीटच्या पथकाने गजाआड केले आहे.
इराणी, शिकलगार टोळीतील चोरट्यांच्या चौकशीतून 29 गुन्हे उघडकीस आले आहेत. तर पोलिसांनी अटकेतल्या चौकडीच्या ताब्यातून 36 लाख 29 हजार 725 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली.
गेल्या काही महिन्यांपासून कल्याण डोंबिवली परिसरात सोनसाखळी, वाहन चोरीचे तसेच घरफोडीचे गुन्हे वाढले होते. या गुन्ह्यांना आळा घालण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी गुन्हे शाखेच्या सर्व युनिटला दिले होते. या आदेशानुसार गुन्हे शाखेच्या कल्याण युनिटच्या पथकाने कल्याण डोंबिवली परिसरात घडलेल्या गुन्ह्यांचा समांतर तपास आपल्या हाती घेतला होता. याच तपासादरम्यान पथकाने सोनसाखळी चोरीसाठी कुख्यात असलेल्या इराणी टोळीतील अट्टल चोरट्यांवर पाळत ठेवली. यावेळी इराणी टोळीतील दोन सक्रिय सदस्य सोनसाखळी व वाहन चोरीचे गुन्हे करीत असल्याची माहिती पथकास मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने वसीम युसूफ अली सय्यद उर्फ वसीम काला (30 इराणी मोहल्ला, आंबिवली, कल्याण) आणि कौसर युसूफ अली जाफरी उर्फ बुशी (33, इराणी मोहल्ला, आंबिवली, कल्याण) या दोघा चोरट्यांना सापळा लावून अटक केली.
तर कल्याण परिसरात घरफोडी सारखे गुन्हे करणाऱ्या शिकलगार टोळीवर देखील गुन्हे शाखेच्या पथकाने करडी नजर ठेवली होती. शिकलगार टोळीतील दोघे अट्टल चोरटे कल्याण गावातील खोणीगावात लपून असल्याचे पोलिसांना कळताच पथकाने शिवासिंग अमिरसिंग बावरी (25, खोणीगाव, कल्याण), आणि पूनमकौर अमिरसिंग बावरी (37, खोणीगाव, कल्याण) या दोघांना अटक केली. या चारही अटकेतल्या आरोपींच्या चौकशीतुन दरोड्याचा एक, सोनसाखळी चोरीचे 20, वाहन चोरीचे 5, घरफोडीचे 3 असे एकूण 29 गुन्हे उघड झाले आहेत. तर आरोपींच्या ताब्यातून सोन्याचे दागिने, सहा चारचाकी वाहन व इतर ऐवज असा एकूण 36 लाख 29 हजार 725 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. ही कारवाई गुन्हे शाखा कल्याण युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे व त्यांच्या पथकाने केली.