डोंबिवली : कल्याण-मलंगगड रोडला असलेल्या आडीवली गावातील एका इमारतीच्या आवारात मैत्रिणींसह खेळणाऱ्या 9 वर्षीय चिमुरडीशी त्याच इमारतीत राहणाऱ्या उत्तरभारतीयाने घरात नेऊन अश्लील चाळे केल्याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर डोंबिवलीचे शिवसेना शहरप्रमुख तथा ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. चिमुरड्यांवर लैंगीक अत्याचार करणारे कुणीही असो, अशांना कायद्याचा हिसका दाखवा, दोषींवर कठोर कारवाई करा, याकडे आमदार मोरे यांनी पोलिसांचे लक्ष वेधले आहे.
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात असलेल्या आडवलीतील एका इमारतीमध्ये राहणाऱ्या मराठी आणि परप्रांतीय कुटुंबांमध्ये शनिवारी (दि.21) रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास वाद झाला. ही दोन्ही कुटुंब शेजारी राहतात. मुलांच्या खेळण्यावरून वाद झाला होता. तक्रारदार कुटुंबाने त्यांच्या अल्पवयीन मुलीचा शेजारी राहणाऱ्या परप्रांतीयाने अश्लील चाळे केले. त्याचा जाब विचारण्यासाठी मुलीचे पालक गेले असता त्यांना मारहाण करण्यात आली. उत्तम आणि त्याची पत्नी रिना पांडे या दाम्पत्याने मराठी कुटुंबावर हात उचलला. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
मात्र सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, याकडे आमदार राजेश मोरे यांनी पोलिसांचे लक्ष वेधले आहे. या संदर्भात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी माणसाला त्रास देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आमदार राजेश मोरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली.