

डोंबिवली : महाराष्ट्रात राहून मराठी माणसाबद्दल द्वेषभावना व्यक्त करण्याचे प्रकार कल्याणमध्ये थांबलेले नाहीत. नव्याने समोर आलेल्या प्रकरणात कल्याण-मलंगगड रोड परिसरातील आडिवली गावात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा जाब विचारल्याच्या कारणातून एका मराठी कुटुंबाला परप्रांतीयांनी बेदम मारहाण केली असून यात तिघे जखमी झाले आहेत. विनयभंग झालेल्या मुलीचे वडील पोलीस कर्मचारी आहेत.
कल्याणमध्ये गेल्या आठवड्यातच एका उच्चभ्रू सोसायटीत अखिलेश शुक्ला या पर्यटन विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्याने क्षुल्लक कारणावरून आपल्या साथीदारांना बोलावून शेजारी राहणाऱ्या मराठी कुटुंबीयांना मारहाण केली होती, तर नालासोपाऱ्यामध्ये लहान मुलांमध्ये झालेल्या वादानंतर परप्रांतीयांच्या जमावाने मराठी माणसाच्या घरावर हल्ला केला होता.
कल्याणमध्ये एका उच्चभ्रू सोसायटीत उत्तर भारतीयाने गुंडांकरवी मराठी कुटुंबीयांना काही दिवसांपूर्वी मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच आडिवली गावात अवघ्या 9 वर्षीय पोलीस कन्येचा विनयभंग करणाऱ्या परप्रांतीयांनी मराठी कुटुंबाला मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि.21) रात्री 10 च्या सुमारास घडली. यातील दोन्ही कुटुंबे परस्परांच्या शेजारी राहतात. अल्पवयीन मुलीचा अश्लील चाळे करून विनयभंग केल्याचा जाब मराठी कुटुंबाने विचारला असता उत्तम पांडे आणि त्याची पत्नी रिना या दाम्पत्याने मराठी कुटुंबावर हात उचलला, असे तक्रारीत म्हटले आहे. या मारहाणीत जखमी झालेल्यांमध्ये पीडित मुलीची आई, वडील आणि आजीचा समावेश आहे. मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाला आहे. यासंदर्भात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपीने आपणास पीडित कुटुंबाकडून मारहाण झाल्याचा आरोप केल्याचे सांगत तो केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे मानपाडाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी सांगितले.