छत्रपती संभाजीनगर : स्कूलबस चालकाने व्हॅनमध्ये इयत्ता चौथीत शिकणाऱ्या ९ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. ही घटना ३० जुलै रोजी दुपारी मुकुंदवाडी भागात घडली. गणेश संपत म्हस्के (रा. दोनवाडा, आंबेडकर नगर) असे आरोपीचे नाव असून त्याला तात्कळ अटक केल्याची माहिती मुकुंदवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन इंगोले यांनी दिली.
फिर्यादी २९ वर्षीय महिलेच्या तक्रारीनुसार, त्यांची ९ वर्षाची मुलगी इयत्ता चौथीत शिकते. ३० जुलै रोजी दुपारी दोनच्या सुमारास ती नेहमी प्रमाणे शाळेतुन घरी आली. महिला रात्री कामावरून घरी आल्यानंतर स्वयंपाक आवरून सर्वांनी जेवण केले. बेडरूममध्ये गेले तेव्हा मुलीने आईला सांगितले की, मी शाळेतून घरी येतेवेळी शाळेतील सोडण्यास येणाऱ्या व्हॅनच्या ड्रायव्हरच्या सीटच्या पाठीमागे असलेल्या पहिल्या सीटवर ती बसलेली होती.
व्हॅनचा ड्रायव्हर गणेश म्हस्के याने सीटच्या पाठीमागील असलेल्या मोकळ्या जागेतून मागे हात करून तिचा हात पकडला. उद्या आपण दोघे फिरायला बाहेर जाऊ, तू घरी तुझ्या आई वडिलाना सांग शाळेतून येण्यास उशीर होणार आहे, असे म्हस्के म्हणाल्याने मुलगी प्रचंड घाबरली. स्वतःला सावरून ती लगेच मागे सरकून बसली. स्टॉप आल्यानंतर ती घाबरून उतरून घरी आली, असे रडत रडत सांगितले.
मुलीने आईला सांगितले की, या घटनेमुळे मला व्हॅनमधून शाळेत जाण्यास भीती वाटते आहे. हा प्रकार ऐकून आईला मोठा धक्का बसला. तिने तात्कळ पती व दिराला सांगितले. त्यानंतर मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यावरून पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या सूचनेप्रमाणे उपनिरीक्षक पुंडलिक डाके यांनी तक्रार नोंदवून घेतली. याप्रकरणी कलम ७५ बीएनएस सहकलम ८,१२ पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला. म्हस्केला अटक करण्यात आली असून अधिक तपास महिला उपनिरीक्षक बोचरे या करत आहेत.