जळगाव : शहरातील रामेश्वर कॉलनीतील स्वामी समर्थ चौकात मंगळवारी (दि.22) रात्री किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाली. या घटनेत दोन जण किरकोळ जखमी झाले असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन गटांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होता. मंगळवारी (दि.22) रात्री ९ वाजेच्या सुमारास काही तरुण स्वामी समर्थ चौकातील अपार्टमेंटजवळ उभे असताना १० ते १२ जणांचे टोळके दुचाकीवरून तेथे आले आणि अचानक दगडफेक सुरू केली. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि काही काळ पळापळ उडाली.
दरम्यान, गस्त घालणाऱ्या एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या येण्याने दगडफेक करणारे तरुण घटनास्थळावरून पळून गेले. पोलिसांच्या वेळेवर हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात आली.
या संदर्भात उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांनी माहिती देताना सांगितले की, स्वामी समर्थ चौकातील एका मेडिकल स्टोअरवरून एका मुलाला काढून टाकल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला होता. त्यातून ही किरकोळ दगडफेक झाली. पोलिसांनी काही संशयितांची ओळख पटवली असून त्यांचा शोध सुरू आहे. गावित यांनी नागरिकांना कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.