Crime News Pudhari File Photo
क्राईम डायरी

धक्कादायक ! आजारी मुलगा जन्माला घातला म्हणून सासूचे टोमणे; सुनेनं बाळालाच संपवलं

कौटुंबिक वादातून जन्मदात्रीकडून चिमुकल्याची हत्या; हृदयविकारग्रस्त बाळावर सुरू होते उपचार

पुढारी वृत्तसेवा

भिवंडी : सासु, सुनेच्या भांडणाच्या पर्यावसानात अवघ्या एक वर्षीय बाळाला जीव गमवावा लागल्याची घटना येंथील शहापूर तालुक्यातील वासिंद शहरालगतच्या कालणे गावात घडली आहे. घरगुती भांडणातून जन्मदात्या आईनेच पोटच्या मुलाला पाण्याने भरलेल्या टाकीत बुडवून ठार मारल्याने आई अपेक्षा संदेश भोई (22) हिच्या विरोधात पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी आईला अटक केली आहे. पार्थ (वय 1) असे हत्या झालेल्या दुर्दैवी मुलाचे नाव आहे.

भिवंडी तालुक्यातील पडघा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कासणे गावात संदेश भोई (31) यांचे कुटूंब राहते. संदेश यांचा विवाह 2022 रोजी आरोपी अपेक्षा हिच्याशी झाला होता. संदेश हा जवळच्याच गोडाऊन इंडस्ट्रीत रात्रपाळीत सुरक्षारक्षकाचे काम करतो. दरम्यान आरोपी अपेक्षा व संदेश या दाम्पत्याला वर्षभरापूर्वी पार्थ (वय वर्षे एक) हा मुलगा झाला होता. परंतु त्याला जन्मतःच हृदयविकार असल्याने त्याच्यावर मुंबईतील वाडीया रुग्णालयात उपचार सुरु होते.

आजारी मुलगा जन्माला घातला...

आजारी मुलगा जन्माला घातला यावरुन अपेक्षा व तीची सासू यांच्यात नेहमीच खटके उडत होते. तर दुसरीकडे मृत मुलगा मीच सांभाळ करून या मुलावर माझाही हक्क असल्यानं सासू सुनेत नेहमीच घरात वाद होत होते. त्यातच आरोपी अपेक्षा हीची सासू मंगळवारी (दि.10) पार्थ याला घेऊन टिटवाळा येथे नंनदेकडे गेली होती. तेथील हवामान आजारी पार्थला काही मानवले नाही. बदललेल्या हवामानामुळे त्याला ताप आला. म्हणून सासू पार्थ ला घेऊन पुन्हा मंगळवारी (दि.10) रात्री घरी कासणे गावी आल्या.

पार्थ ची प्रकृती बिघडल्यावरुन अपेक्षा व सासूमध्ये रात्री जोरदार भांडण झाले. हे भांडण मिटवून संदेश कामावर गेला होता. त्यानंतर बुधवार (दि.11) पहाटे रात्रपाळीवरुन संदेश घरी आल्यानंतर मुलासोबत खेळता खेळता गाढ झोपला असतांनाच आई अपेक्षा हिने सर्वांची नजर चुकवून पहाटेच्या सुमारास घराच्या पहिल्या माळ्यावर ५ हजार लिटर पाण्याने भरलेल्या टाकीत पार्थला बुडवून त्याची हत्या केली.

दरम्यान नंतर मृतक मुलाचे वडील संदेश यांनी आपला (बाबू) पार्थ दिसत नसल्याने सर्वच कुटूंबासह मित्रांनी त्याचा शोध घेतला. तर दुसरीकडे पार्थ हरवल्याचा कांगावा आरोपी आईने केला. मात्र पती संदेशला पत्नीवर ती कांगावा करून खोट बोलत असल्याचा संशय आला. तिच्याकडे पती संदेशने अधिक चौकशी केली असता, तिने मुलाला पाण्याच्या टाकीत बुडून मारल्याचे सांगितले. त्यानंतर संदेश भोई यांच्या फिर्यादीवरून पडघा पोलीसांनी अपेक्षाला ताब्यात घेऊन अटक केली आहे.

तर पार्थ याच्या मृतदेहावर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात शवचिकित्सा करण्यात आली आहे. या गुन्ह्या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती पडघा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळा कुंभार यांनी दिली असून गुरुवारी आरोपी आईला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचीही माहिती कुंभार यांनी दिली आहे. मात्र या घटनेमुळ गावात एकच खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT