

वासिंद : वासिंदजवळील कासणे गावात बुधवार (दि.11) सकाळच्या सुमारास एक वर्षाच्या बाळाला घरावरील पाण्याच्या टाकीत फेकून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घडलेल्या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून गाव व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतक मुलाचे वडील संदेश भोई हे रात्रपाळीची ड्युटी करून बुधवार (दि.11) सकाळी घरी आल्यानंतर ते आपल्या मुलाजवळ झोपले होते. तर त्यांची पत्नी ही आंघोळीसाठी गेली होती. परंतु आंघोळीवरून त्याची आई आल्यानंतर तिला आपला मुलगा दिसत नसल्याचे पाहून दोघांनी मुलाचा शोध घेतला असता तो त्यांच्या घरावरील पाण्याच्या टाकीत मृत अवस्थेत आढळून आला.
सदर, मयत मुलाचे नाव पार्थ संदेश भोई असे असून ही घटना सकाळी साडेपाच-सहाच्या दरम्यान घडली आहे. तर या घटनेमुळे कासणे गावात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती पडघा पोलीस ठाण्याला मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शहापूर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला तर सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा नोंद प्रक्रिया सुरु असल्याचे सांगण्यात आले. लवकरच आरोपीचा तपास करून जेरबंद केले जाईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.