Terrorist Saqib (File Photo)
क्राईम डायरी

Maharashtra ATS Combing Operation | 'तो' गजाआड, पण त्याचे छुपे नेटवर्क ॲक्टिव्ह, कोण आहे साकीब नाचण?

Maharashtra ATS Raid | महाराष्ट्र एटीएस पथकाने सोमवारी पहाटे भिवंडी तालुक्यातील पडघानजीकच्या बोरिवली गावात पूर्व तयारीनिशी छापेमारी करून दिवसभर कोम्बिंग ऑपरेशन राबवले.

पुढारी वृत्तसेवा
विशेष प्रतिनिधी, ठाणे

Maharashtra ATS Combing Operation

ठाणे : महाराष्ट्र एटीएस पथकाने सोमवारी पहाटे भिवंडी तालुक्यातील पडघानजीकच्या बोरिवली गावात पूर्व तयारीनिशी छापेमारी करून दिवसभर कोम्बिंग ऑपरेशन राबवले. मुंबई बॉम्बस्फोटात सहभागी असलेला कुख्यात दहशतवादी साकीब नाचण याच्या घरासह गावातील २२ ठिकाणी झाडाझडती एटीएस पथकाने घेतली. या कारवाईत तलवारी, सुरे, कट्टरता पसरवणारी भाषणे, पत्रके व इतर दस्तावेज जप्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा ठाण्यातील जिहादींचे दहशतवादी कनेक्शन समोर आले आहे. यापूर्वदिखील ठाण्यातील मुंब्रा, कल्याण, पडघा-बोरिवली येथून अनेक संशयित दहशतवादी तपास यंत्रणांनी वेळोवेळी पकडले आहेत.

ऑपरेशन सिंदरनंतर पाकिस्तान व दहशतवादी संघटनांशी संबंधित गद्दारांची देशभरात धरपकड सुरू झाली आहे. दहशतवाद्यांशी व पाकिस्तानशी संबंधित असणाऱ्यांच्या जुन्या फाईल ओपन करण्यात आल्या असून, संशयितांवर तपास यंत्रणांनी करडी नजर रोवली आहे. त्या पार्श्वभूमीवर

मुंबई-ठाण्यासह राज्यभरात यापूर्वी पकडले गेलेले दहशतवादी व त्यांच्याशी संबंधित नेटवर्कची पाळेमुळे शोधण्यास पुन्हा एकदा केंद्रीय तपास यंत्रणांसह राज्य दहशतवादविरोधी पथकाने सुरुवात केली आहे.

याच कारवाईअंतर्गत सोमवारी सकाळीच राज्य दहशतवादविरोधी पथकाचे शंभरहून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या टीमने ठाणे ग्रामीण पोलिसांच्या मदतीने भिवंडी तालुक्यातील पडघानजीकच्या बोरिवली गावात सर्च ऑपरेशन राबवले. यावेळी स्थानिक पोलिसांसह ३०० पोलिसांच्या एटीएस पथकाने गावातील २२ घरांची तपासणी केली. त्यात तलवारी, सुरे, देशविरोधी कारवायांशी संबंधित दस्तावेज, मोबाईल व इतर साहित्य मिळून आले आहे.

भिवंडी तालुक्यातील पडघा-बोरिवली गाव हे साकीब नाचणचे हेडक्वॉर्टर म्हणून कुख्यात आहे. याच बोरिवली गावाला नाचण एक स्वतंत्र इस्लामिक गाव म्हणून ओळख देणार होता. त्यासाठी त्याने या गावास आपले एक स्वतंत्र नाव दिले होते. त्याच्या जाळ्यात अडकलेल्या कट्टरपंथी युवकांना याच नावाने तो लोकेशन देऊन या गावात बोलावत होता, असे तपासातून समोर आले आहे. साकीब नाचण हा बंदी घालण्यात आलेल्या स्टुडंट इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या संघटनेचा पदाधिकारी आहे. २००२ आणि २००३ साली मुंबई सेंट्रल, विले पार्लेसह इतर ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटांच्या कटात हाच

साकीब नाचण सहभागी होता. त्याला यापूर्वी दोनवेळा दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याप्रकरणी तुरुंगवास भोगावा लागला आहे; पण तो दरवेळी तुरुंगाबाहेर येऊन आपले नीच कृत्य पुन्हा सुरू करतो. २०२३ साली त्यास एनआयए पथकाने पुन्हा दहशतवादी कृत्यात सामील असल्याच्या आरोपाखाली अटक केली. तेव्हापासून तो तुरुंगात आहे.

साकीब नाचण सध्या गजाआड असला तरी त्याचे छुपे नेटवर्क अद्यापदेखील ॲक्टिव्ह असल्याचे एटीएसच्या तपासातून समोर आले आहे. भारतात 'सिमी'वर बंदी आल्यानंतर तो 'इसिस' या दहशतवादी संघटनेशी जोडला गेला. त्याने 'इसिस'मध्ये सहभागी होण्यासाठी अनेक कट्टरपंथी तरुणांना प्रोत्साहन दिले होते. इतकेच नव्हे, तर या तरुणांना बॉम्ब बनवण्याचे व नकली नोटा छापण्याचे प्रशिक्षणदेखील तो ऑनलाईन द्यायचा.

साकीबच्या अटकेनंतरदेखील पडघा गावात त्याचे नेटवर्क सुरूच असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती. त्यानंतर यंत्रणांनी पडघा गावावर करडी नजर ठेवली होती. पडघा गावात साकीबचे काही समर्थक भावना भडकावणारे भाषण देऊन देशविरोधी कृत्य करीत असल्याची माहिती समोर आल्यानंतर सोमवारी एटीएस पथकाने पोलिस फौजफाट्यासह पडघा गावात छापेमारी केली. दहशतवादी कनेक्शन अनेकवेळा उघड ठाण्यातील मुंब्रा, कल्याण, भिवंडी परिसरातून अनेकवेळा संशयित दहशतवादी पकडण्यात आले आहेत.

२०१९ सालीदेखील मुंब्रा येथील अलमास कॉलनीत राहणारे काही तरुण दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर एटीएस पथकाने मजहर शेख, फहाद शहा, जमन, मोहसीन आणि सलमान या पाचजणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली होती. त्यापैकी एक तरुण पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेशी संबंधित असल्याचीदेखील माहिती समोर आली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT