

बीड : शहरातील अतिशय गजबजलेल्या साठे चौकामध्ये दोन गटात बुधवारी (दि.४) रात्री नऊ वाजता मारामारी झाली. यामध्ये कोयत्याचा वापर झाला असून यातील जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बीड शहरातील अतिशय वर्दळीच्या असलेल्या साठे चौकामध्ये एका वाहनांमधून मासे नेले जात होते. परंतु या वाहनातून गोवंशाच्या मासाची वाहतूक होत आहे का ? याचा संशय काहींना आला आणि त्यांनी हे वाहन थांबवले. यावेळी वाहनातील लोक व या वाहनाला थांबवणाऱ्या लोकांमध्ये यावेळी शाब्दिक बाचाबाची झाली. यानंतर थेट कोयत्याने मारामारी देखील झाली. हा प्रकार परिसरात असलेल्या पोलिसांना लक्षात येताच त्यांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. तोपर्यंत या मारहाणीत दोघेजण जखमी झाले होते. त्यांना तातडीने बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतिशय वर्दळीच्या चौकामध्ये ही घटना घडल्याने मोठी गर्दी झाली होती. दरम्यान आता या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.