छत्रपती संभाजीनगर ( गंगापूर ) : गंगापूर- वैजापूर रोडवरील वर्धमान रेसिडेन्सीमध्ये सोमवारी (दि. ४ ऑगस्ट) रात्री दहाच्या सुमारास तीन जखमी आनंद पाटील दरोडेखोरांनी कोयत्याच्या धाकावर एका ज्वेलर्स व्यावसायिकाच्या घरी घुसून सुमारे तीन लाख रुपये रोख व सोन्याचे दागिने लंपास केले. या धाडसी घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, ज्योतिर्लिंग ज्वेलर्सचे मालक आनंदराव निवृत्ती पाटील हे त्यांची पत्नी सिंधुताई सोबत वर्धमान रेसिडेन्सी येथे राहतात. ते दोघे रात्री १० वाजेच्या सुमारास जेवण करत असताना तीन अज्ञात दरोडेखोरांनी कोयत्यांसह त्यांच्या घरात प्रवेश केला. आनंद पाटील यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आला. त्यानंतर त्यांची पत्नी सिंधुताई यांनाही मारहाण करत दरोडेखोरांनी दोघांचे हातपाय बांधले आणि तोंडात कपडा कोंबून बेडरूममध्ये कोंडून टाकले. त्यानंतर दरोडेखोरांनी घरातील झडती घेत सुमारे २.५ ते ३ लाख रुपये रोख, तसेच पाटील यांच्या पत्नीच्या गळ्यातील सुमारे दोन तोळ्यांचे सोन्याचे गंठण जबरदस्तीने काढून नेले.
सुमारे अर्धा तास थैमान घातल्यानंतर आरोपींनी बाहेरून दरवाजाला कडी लावून तेथून पलायन केले. त्यानतंर पाटील यांनी खिडकीतून आरडाओरडा केल्यामुळे शेजाऱ्यांनी मदत करत पती-पत्नीची सुटका केली.
जखमी आनंदराव पाटील यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक कुमारसिंग राठोड पथकासह घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरा गंगापूर पोलिस ठाण्यामध्ये अज्ञात दरोडेखोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरोडेखोरांचा शोध सुरू आहे. घटनास्थळी दुसऱ्या दिवशी डॉग स्कॉड व फिंगर प्रिंट तज्ञ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिसांनी भेट दिली.
शहरातील वसाहतीमधील मध्यवस्तीत ही धाडसी घटना पाहता चोरट्यांनी पोलिसांना एक प्रकारे आवाहन दिले आहे. पोलिसांच्या कार्यपद्धती आणि सुरक्षा यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.