

छत्रपती संभाजीनगर : बडतर्फ पोलिस कर्मचारी सराईत गुन्हेगार लहू गटकाळसह चौघांनी बिअरबार मध्ये राडा करत एका महिलेसह तिच्या भावाला जबर मारहाण केली. ही घटना रविवारी (दि.३) रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास बजाज हॉस्पिटलमागील कपिल बिअर बारमध्ये घडली. लहू गटकाळ, राणी बडे व अन्य एक महिला अशी आरोपींची नावे आहेत.
फिर्यादी मनीषा रवींद्र ढिल्पे (२७, रा. गारखेडा परिसर) यांच्या तक्रारीनुसार, रविवारी (दि. 3) त्यांचा मित्र गयास खान हा कपिल बिअर बारमध्ये बसलेला होता. तेव्हा मनीषा तिचा भाऊ अमित हे बारमध्ये गेले. गयास खान याला येथे बसू नको, सोबत चल असे म्हणत मनीषा त्याच्यावर ओरडली. तेव्हा मनीषा यांच्या बाजूच्या टेबलवर बसलेल्या आरोपी राणी तिची मैत्रीण या दोघांनी व लहू गटकाळ विनाकारण मनीषाच्या अंगावर धावून आले. तिला जबर मारहाण केली. राणीने काटेरी चमच्याने तिच्या हातावर मारून जखमी केले. लहू गटकाळने तोंड दाबून मनीषाला मारहाण केली. तिचा भाऊ अमित मध्यस्थीसाठी आला तेव्हा त्याला देखील गटकाळ आणि बडे या दोघांनी मारहाण केली. मनीषा आणि अमित बारमधून निघून गेले. काही अंतरावर तिला पैसे असलेली तिची बॅग बारमध्येच विसरल्याचे लक्षात आल्याने ती पुन्हा बारमध्ये आली. गटकाळला बॅग कोठे आहे अशी विचारणा केली मात्र, त्याने माहिती नसल्याचे सांगितल्याने सातारा पोलिस ठाण्यात जाऊन मनीषा यांनी तक्रार दिली. त्यावरून गटकाळसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बडतर्फ पोलिस लहू गटकाळ याच्यावर २०१९ मध्ये मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली होती. तो वाळू व्यावसायिक असून टोळीप्रमुख आहे. खुनाचा प्रयत्न, दंगा, चोरी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे आदी गुन्ह्यांमध्ये तो आरोपी आहे. १८ जून २०२४ रोजी आडगावजवळ वाळू ट्रकवर कारवाई करणाऱ्या चिकलठाणा पोलिसांच्या अंगावर त्याने स्कॉर्पियो गाडी घालण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होऊन त्याला अटक झाली होती. त्यानंतर गटकाळवर हा आणखी एक गुन्हा दाखल झाल्याने तो पोलिसांच्या रडारवर आला आहे,