Retro AI Trend | रेट्रो ट्रेंडमध्ये सहभागी होण्याचे काय आहेत धोके?  
क्राईम डायरी

Retro Look AI Photo App Scam | 'रेट्रो लूक'च्या नादात 75 हजारांचा गंडा! कोल्हापुरात व्हायरल फोटो ट्रेंडच्या नावाखाली भयंकर सायबर फ्रॉड

Retro Look AI Photo App Scam | सोशल मीडियावर सध्या एका वेगळ्याच ट्रेंडने धुमाकूळ घातला आहे.

पुढारी वृत्तसेवा

सोशल मीडियावर सध्या एका वेगळ्याच ट्रेंडने धुमाकूळ घातला आहे. स्वतःचे फोटो थेट १९८० च्या दशकातील रेट्रो स्टाईलमध्ये म्हणजेच त्या काळातील हेअरस्टाईल, रुंद कॉलरचे शर्ट, बेलबॉटम पॅंट आणि जुन्या गाड्यांसोबत बदलण्याचा फिव्हर. संकेतलाही (नाव बदलले आहे) आपल्या मित्रांचे असे व्हिंटेज फोटो पाहून हा मोह आवरला नाही.

इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपवर स्क्रोल करत असताना त्याच्या नजरेसमोर एक मेसेज आला 'फक्त एका क्लिकवर मिळवा तुमचा ८० च्या दशकातील बॉलिवूड हिरोसारखा रेट्रो फोटो. खालील लिंकवरून ॲप इन्स्टॉल करा.' जुन्या सिनेमांतील अभिनेत्यासारखा स्वतःचा फोटो पाहण्याच्या उत्साहात संकेतने विचार न करता त्या लिंकवर क्लिक केले आणि आलेली एक एपीके (APK) फाईल डाऊनलोड करून फोनमध्ये इन्स्टॉल केली.

ॲप सुरू करताच स्क्रीनवर 'कॅमेरा, गॅलरी, संपर्क आणि स्टोरेज' या सर्व परवानग्या मागण्यात आल्या. संकेतने कोणतीही पडताळणी न करता परवानग्या देऊन टाकल्या आणि स्वतःचा हाय रिझोल्युशन फोटो अपलोड केला. स्क्रीनवर प्रोसेसिंगचे चक्र फिरत राहिले. पण हवा तसा फोटो काही जनरेट झाला नाही.

काही वेळातच संकेतचा फोन अचानक हॅंग झाला आणि स्क्रीन वारंवार ब्लॅंक होऊ लागली. ॲपमध्ये काही तांत्रिक त्रुटी असेल असे समजून त्याने फोन बाजूला ठेवला. मात्र, अवघ्या अर्ध्या तासात त्याच्या मोबाईलवर एकामागून एक बँकेचे मेसेज धडकू लागले. संकेतच्या बँक खात्यातून तब्बल ७५ हजार रुपये परस्पर दुसऱ्या खात्यांवर ट्रान्सफर झाले होते.

संकेतने कोणालाही ओटीपी दिला नव्हता. तरीही खात्यातील कष्टाची पुंजी क्षणात साफ झाली होती. मुळात त्याने डाऊनलोड केलेले ॲप फोटो बनवणारे नव्हतेच तर तो एक धोकादायक 'रिमोर्ट ॲक्सेस ट्रोजन मालवेअर' (RAT) होता. सायबर विश्वात या गुन्ह्याला 'व्हायरल ट्रेंड मालवेअर' किंवा 'फेक एआय ॲप स्कॅम' असे म्हणतात.

अशा 'व्हायरल ट्रेंड'च्या नावाखाली होणाऱ्या सायबर फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी व्हॉट्सॲप, टेलिग्राम किंवा सोशल मीडियावर कोणत्या ही अनोळखी लिंकवरून पाठवलेली एपीके (APK) फाईल चुकूनही मोबाईलमध्ये डाऊनलोड करू नका. केवळ गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअरवरील अधिकृत ॲप्सचाच वापर करा.

कोणत्याही फोटो एडिटिंग ॲपला कॉन्टॅक्ट्स, एसएमएस, स्टोरेज किंवा कॉल लॉग्सच्या अनावश्यक परवानग्या देणे टाळा. संशयास्पद ॲप डाऊनलोडनंतर बँकेतून अनधिकृत व्यवहार झाल्यास त्वरित खाते व कार्ड ब्लॉक करा आणि एका मिनिटाचाही विलंब न लावता १९३० या राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाइनवर अथवा अधिकृत पोर्टलवर तत्काळ तक्रार नोंदवा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT