Pune Crime news
काही वेळाने गोरख भानावर आला. त्याला आता समजले होते की, आपण स्वातीचा खून केलाय. त्याने तिचा मृतदेह खंडाळे गावाकडे जाणार्या रस्त्यालगत एका निर्जन ठिकाणी टाकला. इकडे आई दिसेनाशी झाल्यामुळं दोन्ही मुलं रडू लागली. गोरख याने त्यांचादेखील विचार न करता दोघांचे गळे घोटले. त्यानंतर जेथे स्वातीचा मृतदेह फेकून दिला होता. तेथे या दोघा मुलांचे मृतदेह टाकले. गोरखला पोलिसांपासून आपली सुटका करून घ्यायची होती. त्यासाठी त्याने योजना आखली. तेथूनच जवळ असलेल्या एका पेट्रोल पंपावर तो गेला. तेथे त्याने पेट्रोल विकत घेतले. त्यानंतर तिघांच्या मृतदेहावर पेट्रोल टाकून काडी लावली. त्यानंतर साळसुदाप्रमाणे तो घरी निघून गेला.
स्वाती घरी परतली नाही, ती गोरखच्या घरीदेखील नाही हे लक्षात आल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी गोरखला विचारले. त्यावेळी त्याने सांगितले की, मी पैसे देऊन तिला रस्त्यावर सोडले होते. तिच्या घरच्यांना वाटले गेली असेल कोठे तरी येईल परत. त्यांनीसुद्धा स्वातीला शोधले नाही.
दरम्यान, रांजणगाव गावच्या हद्दीत एकाचवेळी तिघांचे मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य पाहता पोलिस अधीक्षक गिल्ल यांनी स्वतः घटनास्थळी भेट दिली. हा प्रकार तिहेरी खुनाचा असल्याचे एव्हाना पोलिसी नजरेने हेरले होते. मात्र, आरोपीने अतिशय सिराईतपणे हे कृत्य केले होते. त्यात पावसामुळे घटनास्थळी पोलिसांना प्राथमिक पुरावे हाती लागले नव्हते. खरं तर या गुन्ह्याचा छडा लावण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. पोलिस अधीक्षक गिल्ल तपास पथकांना मार्गदर्शन करत होते.
खून झालेल्या महिलेच्या हातावर एक टॅटू होता. तोच काय एक तपासाचा धागा पोलिसांच्या हाती होता. महिलेची ओखळ पटविणे सर्वात मोठे दिव्य त्यांच्यासमोर होते. गिल्ल यांनी सात तपास पथके तयार केली. 250 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. एवढेच नाही, तर 16 हजार 500 भाडेकरूंची चौकशी केली. औद्योगिक वसाहतीत काम करणारे कामगार धुंडाळले. खबर्यांची चाचपणी केली. परंतु, हाती काही लागले नाही.
आता पोलिसांनी राज्यात बेपत्ता असलेल्या महिलांची माहिती शोधण्यास सुरुवात केली. राज्यातील सर्व पोलिस ठाण्यांत दाखल असलेल्या बेपत्ता महिलांच्या तक्रारींचा आढावा घेण्यात आला. स्वाती बेपत्ता झाली, त्यावेळी तिचा नवरा केशव याने याबाबत माजलगाव पोलिसांत तक्रार दिली होती. स्वाती मिळून आल्यानंतर त्याने ही माहिती पोलिसांना दिली नव्हती. त्यामुळे त्याची तक्रार कायम तपासावर होती. पुणे ग्रामीण पोलिस तपास करत असताना त्यांना माजलगाव पोलिस ठाण्यात स्वाती नावाची महिला 9 मे 2025 रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार दिसून आली. पोलिसांच्या एका पथकाने थेट माजलगावात धडक दिली. माजलगाव पोलिस ठाण्यातील हवालदाराने स्वातीची माहिती दिली. परंतु, दोन मुलांबाबत काही माहिती नव्हती. पुणे पोलिसांनी माजलगाव पोलिसांना खून झालेल्या महिलेच्या हातावर एक टॅटू असल्याचे सांगितले.
त्या टॅटूने आपले काम चोख बजावले होते. माजलगाव पोलिसांकडील तक्रार आणि स्वातीच्या हातावरील टॅटूचे वर्णन जुळले. स्वातीची आता पुणे पोलिसांना काहीशी ओळख पटली होती. त्यांनी थेट स्वातीच्या आई-वडिलांचे आळंदीतील घर गाठले. तिथे तिचा नवरा केशव त्यांना मिळून आला. परंतु, त्याने आपल्याला काही माहिती नसल्याचे सांगितले. यावेळी पोलिसांना स्वाती 23 मे रोजी रात्री आळंदी येथून गोरख बोखारे याच्यासोबत गेल्याचे तिच्या घरच्यांनी सांगितले. क्षणाचाही विलंब न करता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, रांजणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहायक पोलिस निरीक्षक दत्ताजी माहिते, अंमलदार अक्षय यादव, दरशथ बनसोडे, महादेव साळुंखे, गणेश वानकर, सुमीत वाघ यांच्या पथकाने गोरख याला ताब्यात घेतले.
सुरुवातीला त्याने आपण काहीच केले नसल्याचे सांगितले. परंतु, पोलिसांनी त्याच्या अमानुष कृत्याची कुंडलीच त्याच्यासमोर मांडली. त्यावेळी त्याने स्वाती आणि तिच्या दोन्ही मुलांचा गळा आवळून डोक्यात दगड घालून खून केला. त्यानंतर तिघांचे मृतदेह पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची कबुली दिली. पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण पोलिसांनी एका क्लिष्ट गुन्ह्याचा छडा लावून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. त्यामुळे गुन्हेगार कितीही हुशार असला तरी पोलिस त्याच्यापर्यंत पोहोचतात हे मात्र नक्की!
(उत्तरार्ध)