

जळगाव (यावल तालुका) : मोहराळा गावात गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या १९ वर्षीय तरुणाचा मृतदेह शुक्रवारी (दि.20) रोजी विहिरीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. संतप्त जमावाने एका चारचाकी वाहनाची तोडफोड केल्याने परिस्थिती अधिक चिघळली.
मृत तरुणाचे नाव साहिल शब्बीर तडवी (वय १९, रा. मोहराळा) असे असून, तो १६ जूनपासून बेपत्ता होता. कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तो न सापडल्याने यावल पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. अखेर शुक्रवारी (दि.20) रोजी सायंकाळी त्याचा मृतदेह मोहराळा ते वड्री रस्त्यालगत असलेल्या एका शेतातील विहिरीत आढळून आला.
मृतदेह सापडताच गावात तीव्र संताप उसळला. ग्रामस्थांनी संशयित कुटुंबावर रोष व्यक्त करत त्यांच्या घराबाहेरील चारचाकी वाहनाची तोडफोड केली. जमाव आक्रमक झाल्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, हवालदार वासुदेव मराठे, सुनील पाटील, अमित तडवी यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
साहिलच्या कुटुंबीयांनी शवविच्छेदन इन कॅमेरा पद्धतीने करण्याची मागणी केली असून, पोलिसांनी मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. सायंकाळी सुमारे ८.१५ वाजता मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला.
सध्या गावात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हवालदार नीलेश चौधरी, मोहन तायडे, अल्लाउद्दीन तडवी, भरत कोळी, सागर कोळी यांच्यासह अतिरिक्त पोलीस कर्मचारी गस्त घालत आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासासाठी काही जणांना ताब्यात घेण्यात आले असून, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, गावात संताप आणि अस्वस्थतेचं वातावरण पसरलं असून, प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सतर्कता बाळगण्यात येत आहे.