Panvel Diesel Theft pudhari photo
क्राईम डायरी

Raigad Crime : रातराणीची ‘कव्हर’ गँग! हायवे अन् एमआयडीसीत डिझेल माफियांचा धुमाकूळ

तळोजा एमआयडीसी भागातील फोर ट्रेन स्टील कंपनीसमोरील रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनाच्या डिझेल टाकीतून विकी साहू यांचे तब्बल २२० लिटर डिझेल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले.

पुढारी वृत्तसेवा

जयंत धुळप, रायगड

पनवेल आणि तळोजा एमआयडीसी परिसरात सध्या उभ्या असलेल्या अवजड वाहनांमधून डिझेल चोरी करणाऱ्या रातराणीची कव्हर गँग सक्रीय झाली आहे.तळोजा एमआयडीसी भागातील फोर ट्रेन स्टील कंपनीसमोरील रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनाच्या डिझेल टाकीतून विकी साहू यांचे तब्बल २२० लिटर डिझेल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. चालक गाफील असल्याचा फायदा उठवत चोरट्यांनी ही चोरी केली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर तळोजा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सध्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास करत आहेत.

पनवेल व परिसरात ४५ हून अधिक गुन्ह्यांची नोंद

गेल्या काही महिन्यांचा विचार करता पनवेल शहर, पनवेल तालुका, तळोजा आणि कळंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत डिझेल चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. आतापर्यंत या संपूर्ण परिसरात डिझेल चोरीचे सुमारे ४५ हून अधिक गुन्हे नोंदवले गेले आहेत. महामार्गालगतचे सर्व्हिस रोड, एमआयडीसीतील निर्जन रस्ते आणि रात्रीच्या वेळी उभ्या असलेल्या ट्रकला हे चोरटे प्रामुख्याने लक्ष्य करत आहेत. सतत होणाऱ्या या चोऱ्यांमुळे या भागातील ट्रान्सपोर्टर आणि चालक यांच्यात भीतीचे व चिंतेचे वातावरण पसरले आहे.

१८ गुन्हे उघडकीस तर २४ आरोपींना बेड्या

वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पनवेल व तळोजा पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून धडक कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत पोलिसांनी केलेल्या विविध कारवायांमध्ये १८ गुन्हे यशस्वीरीत्या उघडकीस आणले असून याप्रकरणी २४ आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या चोरट्यांकडून चोरीचे डिझेल, डिझेल ओढण्यासाठी वापरले जाणारे हाय-स्पीड इलेक्ट्रिक पंप, पाइप्स तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली पिकअप व्हॅन आणि कार असा सुमारे १५ ते १८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आतापर्यंत या टोळ्यांनी परिसरातून सुमारे १२ हजार ५०० लिटरहून अधिक डिझेल चोरल्याचे तपासात समोर आले आहे.

अशी आहे चोरट्यांची ‘हाय-टेक’ मोडस ऑपरेंडी

डिझेल चोरटे अत्यंत संघटित आणि नियोजनबद्ध रीतीने गुन्हे करतात. रात्री २ ते पहाटे ५ च्या सुमारास, जेव्हा चालक केबिनमध्ये गाढ झोपलेला असतो, तेव्हा चोरटे स्वतःच्या चारचाकी वाहनातून किंवा पिकअप व्हॅनमधून ट्रक जवळ पोहोचतात. त्यांच्या वाहनांमध्ये प्लास्टिकचे मोठे ड्रम आणि बॅटरीवर चालणारे हाय-स्पीड पंप बसवलेले असतात. अवघ्या काही सेकंदांत डिझेल टाकीचे लॉक तोडून पाइपद्वारे काही मिनिटांत शेकडो लिटर डिझेल ओढून घेतले जाते. चालक जागा होईपर्यंत चोरटे तिथून पसार झालेले असतात.

चोरीच्या डिझेलची काळ्या बाजारात विक्री

चोरी केलेले हे डिझेल चोरटे काळ्या बाजारात अत्यंत स्वस्त दराने विकतात. स्थानिक पातळीवरील बेकायदेशीर धाबे, गॅरेज मालक, खाजगी ट्रॅव्हल्स किंवा स्थानिक डंपर चालकांना ६० ते ६५ रुपये प्रति लिटर या दराने हे डिझेल विकले जाते. पोलीस आता केवळ डिझेल चोरणाऱ्यांवरच नव्हे, तर हे चोरीचे डिझेल विकत घेणाऱ्या ‘रिसीव्हर्स’वरही कडक कारवाई करत आहेत. एमआयडीसी आणि हायवे परिसरात पुरेशी प्रकाशयोजना आणि सीसीटीव्ही बसवण्याची मागणी आता वाहनचालकांकडून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT